संत संताजी जगनाडे जयंती
दिनविशेष
संत संताजी जगनाडे जयंती
संकलन -अभय बक्षी नागपूर.
क्षमा शांती जया नराचिये देही
दुष्ट तया कांही करीत नाही
जरि ही कोणाशी राग फार आला
तरि तुं धरिरे शांती फार
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली
तेथे उडी आली यमाजाची
... संत संताजी जगनाडे
हे आहे सुखी जीवनाचे रहस्य. समोरचा वाटेल ते बोलो पण आपण शांत राहिले की वाद आणि पुढील अनर्थ टळतो. जो शांत.. क्षमाशील आहे त्याचे दृष्टही काही वाकडे करू शकत नाहीत. संत संताजी म्हणतात की कुणाचा राग आला तरीही तू मात्र शांत रहा. शांती ढळली की यमराजाकडे जावे लागते.
चाकण.. मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार गाव. आज ओळख औद्योगिक नगरी. याच्या शेजारील मावळातील सुदुंबरे हे संत संताजी जगनाडे यांचे हे जन्मगाव. त्यांचे घराणे धार्मिक संस्काराचे. संताजी हे संसारी सद्गृहस्थ. आपला व्यवसाय उत्तमपणे सांभाळणारे भक्त.
त्यांना संत लाभ झाला तो जगदगुरु संत तुकोबांचा. एकदा गावात संत तुकाराम आले. तुकोबांचे कीर्तन ऐकून संताजी एवढे प्रभावित झाले की परमार्थासाठी प्रपंच सोडायला निघाले. पण तुकोबांनी समजावले की, परमार्थ हा संसार करुनही साधता येतो. तुकोबांनी त्यांना संसार सोडण्यापासून परावृत्त केले. ते तुकोबांच्या कीर्तनात टाळकरी बनले.
संताजींचे घराणे हे विठ्ठल भक्त. संताजींचे शिक्षण व्यवसायाच्या गरजेपुरते लिहता वाचता येण्याएवढे झाले होते. संत तुकोबा कीर्तनात वेळेवरच उत्स्फुर्तपणे अनेकदा अभंग रचना ऐकवायचे. टाळकरी संत जगनाडेंचेही कौशल्य असे की हे अभंग त्यांना लगेचच मुखोदगत व्हायचे. घरी आल्यावर हे सारे अभंग लिहून ठेवायचे. आज यामुळेच संत तुकोबांचा अभंगाचा खजिना उपलब्ध झालाय.
*माझिया जातीचा मज भेटो कोणी*
*आवडिची धनी पुरवावया*
*माझिया जातीचा मजशी मिळेल*
*कळेल तो सर्व समाचार*
*संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे*
*येर गबाळाचे काम नाही*
हे व्यवहारात नेहमीच वापरले जाणारे वाक्य. जात हा व्यापक अर्थाचा शब्द. 'जात' म्हणजे असा समुदाय ज्यांच्या धार्मिक श्रद्धा, आचारविचार.. रुढीपरंपरा, चालीरीती, खानपान पद्धती एकसमान असतात, त्याबाबत ते एकमेकांच्या विचारांशी, भावनांशी सहमत असतात.. बोलू शकतात अशा घराण्यांचा समूह. अशाच लोकांशी आपले पटते.
भक्त्त मंडळींचे आचार विचार एक असतात. अर्थात जात एकच असते. ही जात म्हणजे वारकरी. धर्म म्हणजे भागवत धर्म. यामुळेच या जातीचे सगळे लोक एकमेकांना भेटतात. तेव्हा विषय एकच असतो तो विठ्ठल भक्तीचा. संत जगनाडे महाराज म्हणतात, अशा भक्तांशीच मला चर्चा करायची आहे. इतर चर्चाला ना अंत ना अर्थ. पण या भौतिक जगाला विसरून विठ्ठल नामात दंग होणे हे येरागबाळ्याचे काम नाही.. त्यासाठी सच्चा भक्तच हवा.
सामान्यांना जीवनात सहवास लाभतो तो सामान्यांचाच. पण संताजींना जगाला हेवा वाटावा असा सहवास लाभला तो संत तुकोबांचा. संताजीं भक्तीमार्गात रमले. जीवन उजळले.
संत जगनाडे म्हणतात, मनुष्य जीवन सुखी व्हावे म्हणून समाजात भक्तीची लाट आणली ती मार्कंडेय ऋषी.. विदुर.. वाल्मिकी, शबरी, अर्जुन, सुदामानी. ही लाट हृदयी स्थिरावायला हवी. भक्ती मार्गाची वाटचाल सुलभ व्हायला जसा विश्वास हवा.. श्रद्धा हवी तसेच मार्गदर्शक गुरुही भेटायला हवेत.
संताजी हे याबाबतीत भाग्यवान त्यांना गुरु लाभले ते तुकोबा. गुरुकृपेचे धनी संताजींनी प्रवचने दिली. कीर्तने पण केली. अनेक अभंग लिहले. 'तेलसिंधु', 'शंकरदीपिका' हे ग्रंथही लिहलेत.
*संतांजीवर एवढी गुरुकृपा होती की त्यांच्या इच्छेप्रमाणे अंतिम समयी स्वर्गस्थ तुकोबांनी येवून त्यांना दर्शन दिले होते असे मानले जाते.
संत संताजीना गुरुकृपेने अध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले होते. भक्ती कशी करावी हे उखळाच्या रुपकातून सांगतात तेव्हा त्यांच्या उच्च प्रतिभेची साक्ष पटते. संत संताजी जगनाडे यांना जयंती निमित्य वंदन.
निर्गुण हा घाणा गुणातीत जाणा
सोहध्वनी जाणा उखळ ते
उखळ गाडीले सप्तपाताळात
विराटांची मात वेदशास्त्री
उखळ भेदीले एकवीस स्वर्गावरी
ठोकती त्यावरी धृपद
वाजती करकर अनाहत कातर
मन पवन थोर बैल फिरे
तीळा घालोनिया कुट हादरले
चेतन काढिले तेल त्याचे
संतू म्हणे तुका हाची माझा घाणा
पावलासी खुणा काय त्याचे
०८.१२.२०२५
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment