आयुष्यातले सांगाती ४४ ,प्रतापदादा सोनवणे.
आयुष्यातले सांगाती ४४.

प्रतापदादा सोनवणे
सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी याची एकच तारीख कधीच नसते. तसा योग फार थोड्या व्यक्तींच्या आयुष्यात येतो. अन्यथा बहुतेक सर्वांच्या आयुष्यात जयंती आणि पुण्यतिथी या तारखा वेगवेगळ्या असतात.
जयंती आणि पुण्यतिथी ही एकच तारीख असणारी मी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात पाहिली आहे, ती म्हणजे माझे एक सुहृद प्रतापदादा सोनवणे प्रतापदादा हे एक अभियंते होते. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. तब्बल दहा वर्ष ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले, तर पाच वर्ष देशाच्या लोकसभेचे सदस्य म्हणून देखील ते कार्यरत राहिले होते. २२ डिसेंबर ही प्रतापदादांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्हीही आहे. नुकतीच २२ डिसेंबर होऊन गेली. त्यामुळे दादांच्या बऱ्याच आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. त्या आठवणी जाग्या करून देण्याचे काम देखील फेसबुकने केले. कारण २०२३ मध्ये २२ डिसेंबरला दादा गेले, त्या दिवशी मी त्यांच्या आठवणीत एक छोटेसे संस्मरण समाज माध्यमावर व्हायरल केले होते. २२ डिसेंबरला फेसबुकने माझे ते संस्मरण पुनरमुद्रित करून मला ती आठवण करून दिली. त्यामुळेच आजचे आयुष्यातले सांगाती मी दादांवरच लिहायचे ठरवले आहे.
प्रतापदादा सोनवणे आणि माझी ओळख झाली ती १९९८ च्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन अधिवेशनात. त्यावेळी नाशिकच्या दैनिक गावकरीसाठी मी विधानपरिषद सभागृहात वृत्तसंकलन करीत असे. अधिवेशनात आल्यावर दुसऱ्याच दिवशी विधान भवन परिसरातील भाजप कार्यालयात मला नाशिकच्या एक विधान परिषद सदस्य डॉ. निशिगंधाताई मोगल भेटल्या. त्यांचा माझा आधीचाच परिचय होता. त्यांच्यासोबत प्रतापदादा सोनवणे हे देखील होते. ते नुकतेच नाशिक भागातून पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेत विजयी झाले होते. ताईंनी प्रतापदादांची माझी ओळख करून दिली. "दादा हे अविनाश पाठक, नागपूरचे पत्रकार आहेत, आणि आपल्या नाशिकच्याच गावकरीसाठी विधान परिषदेतच वृत्त संकलन करतात. हे नागपुरात आणि मुंबईत देखील वृत्त संकलनाला येतात, आणि पाठक, हे प्रतापदादा सोनवणे, आपल्या फरांदे सरांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर नाशिकहून भाजपातर्फे निवडून आलेले आहेत."
ताईंनी ओळख करून दिल्यावर लगेचच दादांनी माझ्याशी हस्तांदोलन केले आणि "गावकरीत तुमची नागपूरची वार्तापत्रे मी वाचत असतो, तुमचे रविवारच्या अंकात लेख देखील वाचतो. खूप छान असतात." असे म्हणत मला प्रतिसाद दिला. लगेचच आम्ही जवळच्याच कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला गेलो. तिथे आमच्या थोडा वेळ गप्पा रंगल्या. पहिल्याच भेटीत माझे आणि दादांचे आकडे जुळले तेव्हापासून आम्ही चांगलेच मित्र झालो. त्या अधिवेशनात मी दादांच्या एक-दोन मुद्द्यांना गावकरीत चांगलीच प्रसिद्धी दिली. गावकरीत त्या बातम्या छापून आल्यावर दादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून कळवले असावे. लगेचच दुपारी विधान भवनात भेटले की दादा," बॉस, तुम्ही पाठवलेली माझी बातमी आज गावकरी छापून आल्याचे मला कळवले. धन्यवाद" म्हणून प्रतिसाद देत असत. समोरच्या व्यक्तीला बॉस म्हणून हाक मारण्याची दादांची एक वेगळीच स्टाईल होती.
नागपूर अधिवेशन संपले त्यादिवशी दादांची भेट झाली होती. "आता नाशिकला आले की भेटूया" असे सांगून त्यांनी मला आमंत्रण दिले. "मुंबई अधिवेशनात भेट होणारच आहे" असे सांगून मी देखील त्यांचा निरोप घेतला होता.
मार्च १९९९मध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. त्याला देखील मी वृत्त संकलनाला गेलो होतो. गेल्यावर पहिल्याच दिवशी सकाळी विधान भवनातील भाजप कार्यालयात डोकावलो तेव्हा दारातच दादा भेटले. "उतरलात कुठे?" अशी त्यांनी चौकशी केली. त्यावेळी "आम्हा नागपूरहून येणाऱ्या पत्रकारांसाठी जर आम्ही मागणी केली तर मनोरा या शासकीय आमदार निवासात आम्हाला खोली मिळते. त्यामुळे मनोरातच उतरलो." असे दादांना सांगितले. तेव्हा "मी देखील मनोरातच आहे. आपण भेटत जाऊया" असे आमचे बोलणे झाले. विधान परिषदेत अमरावती विभागातून शिक्षक मतदार संघात निवडून गेलेले यवतमाळचे दिवाकरराव पांडे यांची मध्ये चांगलीच मैत्री होती. दिवाकरराव आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी असायचे. मात्र जेवायला रात्री ते मनोरा आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये येत असत. मग रोज रात्री कामकाज संपले की मी, दिवाकरराव, दादा अशी आमची जेवणासोबत गप्पांची मैफल रंगत असे. दादा नाशिक भागात आमदार म्हणून निवडून येत होते त्यांना गावकरीत बातम्या येणे आवश्यक वाटायचे. कारण त्या संपूर्ण परिसरातच गावकरीचा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात होता. मीदेखील आवर्जून दादांच्या बातम्या गावकरीत प्रकाशित करीत असे.
२००१ पर्यंत प्रत्येक अधिवेशन कव्हर करायला मी मुंबईत देखील जात असे. २००२ पासून कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यातही विशेषतः घरात असलेले वृद्ध आई-वडील लक्षात घेता मी मुंबईला विधिमंडळ वृत्तसंकलनाला जाणे बंद केले. तरीही नागपूर अधिवेशनात मात्र दादांची आवर्जून भेट होत असे. भेट झाली की एकमेकांची चौकशी होत असे आणि दररोज दुपारी कॅन्टीन मध्ये सोबत जेवण आणि गप्पा या ठरलेल्या असायच्या.
२००१ मध्ये मी नाशिक मध्ये काही कामाला गेलो होतो. मुंबईहून पहाटे नाशिकला पोहोचलो आणि शासकीय विश्रामगृहात रात्री मुक्काम केला. सकाळी उठल्यावर तयार झालो आणि एक दोन भेटी आटोपल्या. आदल्या दिवशीच मुंबई निशिगंधाताई मोगल यांची भेट झाली होती. त्यांनी मला "नाशिकला येतोच आहेस, तर घरी ये," असे निमंत्रण दिले होते. त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास मी त्यांच्या घरी पोहोचलो. तिथे चहा आणि चर्चा झाल्यावर मी सहज प्रताप दादा कुठे राहतात अशी चौकशी केली. तर इथे जवळच राहतात असे उत्तर त्यांनी दिले. मी लगेच दादांना फोन केला तर "तुम्ही ताईंकडेच आहात, तर मी तिथेच गाडी पाठवतो" म्हणून त्यांनी लगेच आपल्या मुलाला गाडी घेऊन ताईंकडे पाठवले. मग दादांकडे पोहोचल्यावर जवळ जवळ तास दीड तास आमच्या गप्पा रंगल्या. दादांचा खूपच आग्रह झाल्यामुळे त्यादिवशी त्यांच्याकडेच जेवलो. त्या दिवशी दादांनी मला दोन संग्राह्य पुस्तके देखील भेट म्हणून दिली होती. त्या दिवशी मला नाशिक परिसरातच काही खरेदी करून मग दुपारी दैनिक गावकरीच्या कार्यालयात जायचे होते. संध्याकाळच्या सेवाग्राम एक्सप्रेसने मी परतणार होतो. दादांनी निघताना लगेचच त्यांची गाडी आणि ड्रायव्हर माझ्यासोबत दिला आणि मला जे काही खरेदी करायची होती त्यासाठी योग्य जागा सुचवून तिथे घेऊन जायला ड्रायव्हरला सांगितले. मग खरेदी आटोपली की साहेबांना गावकरी कार्यालयात सोडून मगच परत ये असेही त्यांनी ड्रायव्हरला सांगितले. त्यानुसार मी माझी कामे आठवण दुपारी दोनच्या सुमारास गावकरीत पोहोचलो. दादांच्या मदतीमुळे माझी कामे अगदी झपाटून आटोपली होती.
२००२ च्या हिवाळी अधिवेशनात महापुरात दादांची माझी भेट झाली. त्यावेळी "आता इतक्यात नाशिकला येणार आहात का?" अशी त्यांनी विचारणा केली. त्यावेळी "फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे" असे मी सांगितले. तेव्हा "एक दिवस माझ्यासाठी वेळ काढून या' थोडे काम आहे" असे दादा बोलले होते. मग फेब्रुवारी २००३ मध्ये मी नाशिकला दादांसाठी वेळ काढूनच गेलो होतो. त्या दिवशी मग सकाळी तयार झाल्यावर दादांना फोन केला. शहरातल्या मार्केट प्लेस मध्येच दादांचे व्यवसायाचे ऑफिस होते. तिथे तिथला पत्ता पाठवून तिथेच तुम्ही या आपण साडेदहा वाजता भेटू असे त्यांनी सांगितले. त्यानुसार मी त्यांच्या ऑफिसला पोहोचलो. २००४ ला पदवीधर मतदार संघाच्या पुन्हा निवडणुका होत्या. दादांना पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागणार होते. मग त्यासाठी बातम्यांचे नियोजन कसे करावे आणि पक्ष स्तरावर देखील काय करता येईल या विषयावर त्यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी भाजपचे नितीन गडकरी हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते होते आणि त्याचबरोबर ते लवकरच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होणार ही चर्चा जोरात चालू होती. त्यामुळे पक्षाचे उमेदवार ठरवताना गडकरींचा शब्दही महत्त्वाचा राहणार होता. त्या दृष्टीने देखील काय करता येईल या विषयावर आमची चर्चा झाली होती. सुदैवाने त्यावेळी पक्षाने दादांना पुन्हा उमेदवारी दिली आणि दादा या निवडणुकीत देखील विजयी झाले होते.
त्या काळात दैनिक गावकरीसाठी काम करत असताना साधारणपणे वर्षातून एखादी तरी चक्कर नाशिकला होत असे. नाशिकला गेलो की दादांची हमखास भेट व्हायची. दरवेळी त्यांचा घरी येण्यासाठी आग्रह असायचा. २००७ च्या उन्हाळ्यात मी कुटुंबासहित तीन दिवसांसाठी नाशकात गेलो होतो. त्यावेळी नाशिक शहरात काही ठिकाणी फिरायचे आणि जमल्यास त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी ला जाऊन यायचे असा आमचा बेत होता. मी दादांना फोन केला आणि त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगीला जायला एखाद्या टॅक्सीची सोय होईल का असे विचारणा केली. त्यावेळी टॅक्सीची सोय कशाला आपण एखाद्या गाडीची सोय करून घेऊ असे दादा म्हणाले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव पवार हे देखील विधान परिषद सदस्य होते. दादांची त्यांची चांगली मैत्री होती. वसंतराव नाशिकच्या एका सहकारी बँकेचे अध्यक्ष देखील होते. वसंतरावंची माझी देखील चांगलीच ओळख होती. अविनाश येतो आहे आणि त्याला गाडी लागणार आहे असे दादांनी सांगताच वसंतरावंनी लगेचच बँकेची एक गाडी तीन दिवस माझ्याच दिमतीला ठेवली होती. त्यामुळे त्या तीन दिवसात आमचा नाशिकचा मुक्काम अतिशय सुकर झाला होता. आम्ही कुटुंबासह नाशिक मधली सर्व प्रेक्षणीय स्थळे तर फिरलोच, पण त्र्यंबकेश्वरला आणि सप्तशृंगी गडावर देखील जाऊन आलो. वसंतरावच्या गाडीने आम्हाला थेट स्टेशन पर्यंत साथ दिली. हे सर्व दादांमुळे शक्य झाले होते.
२००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रताप दादांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. हे वृत्तपत्रातून वाचल्यावर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन देखील केला होता. त्यावेळी विधान परिषद सदस्य म्हणून पदवीधर मतदारसंघाला दादांनी कसा न्याय दिला आणि विधान परिषदेत देखील विविध मुद्द्यांवर कसा आवाज उठवला त्यावर एक बातमीवजा लेख मी दैनिक गावकरीला पाठवला देखील होता. तो लेख गावकरीत प्रकाशित झाल्यामुळे दादा चांगलेच सुखावले होते. त्याचा आपल्याला प्रचारात फायदा झाल्याचेही त्यांनी नंतर सांगितले होते. ते अपेक्षेनुसार धुळ्यातून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. मी त्यांना अभिनंदनचा फोनही केला होता. दिल्लीत त्यांचा शपथविधी आटोपल्यावर त्यांना नॉर्थ एवेन्यू परिसरात बंगला मिळाला. लगेचच मला फोन आला. "मला इथे बंगला मिळाला आहे आणि आता दिल्लीला आलात की माझ्याच बंगल्यावर उतरायचे" असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी देऊन ठेवले. त्यानुसार लगेचच मला जुलै महिन्यात हिंदुस्थान समाचारच्या एका बैठकीसाठी दिल्लीत जावे लागले. त्यावेळी मग दादांच्याच निवासस्थानी मी मुक्काम ठेवला.
त्यानंतर वर्षभराने पुन्हा दिल्लीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देखील दादांच्याच निवासस्थानी मी मुक्काम ठेवला. त्यावेळी मी एक दिवाळी अंक काढत असे. त्याच्या जाहिरातींच्या प्रयत्नात मी दिल्लीला गेलो होतो. विविध शासकीय प्रतिष्ठानकडून जाहिराती मिळाव्या यासाठी काही खासदारांची कव्हरिंग लेटर्स लागणार होती. मी मनोहर जोशी आणि अविनाश पांडे या दोन खासदार मित्रांना बोलून ठेवले होते. अजून काही पत्रे लागणार होती. मी सहज दादांना विचारले "तुम्ही एक दोन तीन पत्रे द्याल का?" दादांनी तात्काळ उत्तर दिले "दोन-तीन काय २५-३० सुद्धा द्यायला तयार आहे. तुम्ही पत्र तयार करून आणा, त्यासाठी माझे हवे तितके लेटरहेड घेऊन जा, आणि त्यावर माझ्या सह्या घ्या." मग विविध शासकीय सार्वजनिक उपक्रमांसाठी मी दादांच्या लेटरहेडवर पत्रे तयार केली आणि त्या पत्रांमार्फत मी विविध शासकीय प्रतिष्ठानच्या जाहिराती देखील मिळवल्या होत्या. जाहिराती दादांमुळेच शक्य झाल्या होत्या. अंक तयार झाल्यावर मी दादांना प्रति पाठवल्या आणि "तुमच्यामुळेच हा अंक शक्य झाला आहे" असे त्यांना लिहिले होते. लगेचच दादांचा फोन आला. "मित्रासाठी ५-२५ पत्रे द्यायला मी कधीच मागेपुढे पाहणार नाही".
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र पक्षाने काही कारणांनी दादांना उमेदवारी दिली नाही. २०१४ च्या जून महिन्यात एका दिवसासाठीच मी रोटरीच्या बैठकीसाठी नाशिकला गेलो होतो. त्यावेळी घाईघाईत दादांना घरी जाऊन भेटलो. पुन्हा उमेदवारी न मिळाल्यामुळे ते काहीसे नाराज होते. मात्र आता पुन्हा जुन्या सार्वजनिक कामात सक्रिय व्हायचे असे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले. विद्या प्रसारक मंडळाच्या कामात मी झोकून द्यायचे ठरवले आहे असेही ते बोलले होते.
त्यानंतर वर्षभराने म्हणजेच जून २०१५ मध्ये आम्ही तिघेही नाशिकला गेलो होतो. पहाटे आम्ही शासकीय विश्रामगृहात पोहोचलो, तेव्हा आम्हाला दिलेली खोली अतिशय घाणेरडी होती. अर्थात त्या दिवशी सकाळी वेळ नव्हता. आम्हाला लगेचच दहा वाजता एक कार्यक्रम होता. त्यामुळे घाईघाईत तयार झालो आणि कार्यक्रमाला गेलो. दुपारी परत आल्यावर विश्रामगृह व्यवस्थापनाला विचारले असता दुसरी कोणतीही चांगली खोली देता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मग जवळच एखाद्या हॉटेलवर जावे असे ठरले. दातांना फोनवर विचारले असता त्यांनी एसटी स्टँड समोर राजदूत नावाचे एक चांगले हॉटेल आहे, तिथे तुम्ही मुक्काम करू शकता, असे सुचवले. त्यानुसार आम्ही राजदूतला पोहोचलो. तिथे रूम बुक करण्यासाठी मी माझे ओळखपत्र दाखवले. मात्र तिथल्या व्यवस्थापनाला माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलगी या दोघींचेही ओळखपत्र हवे होते. त्यांच्याजवळ ओळखपत्र नव्हते. मग काय करावे म्हणून दादांना फोन केला. त्यांनी अवघ्या दोन मिनिटात सूत्रे फिरवली. तिसऱ्या मिनिटाला त्या परिसरातील भाजप नगरसेवकाचा हॉटेल व्यवस्थापनाला फोन आला आणि आम्हाला न अडवता रूम उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या. मग लगेच आम्हाला रूम मिळाली. थोड्या वेळाने दादांचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी तिघांनाही घरी बोलावले. मग त्यांच्या घरी जाऊन आलो. आणि पुढले दोन दिवस काय कार्यक्रम आहे अशी त्यांनी विचारणा केली. आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचे होते आणि इतरही काही ठिकाणी जाण्याचा आमचा इरादा होता. दादांनी लगेच आपली गाडी आणि ड्रायव्हर मला उपलब्ध करून दिला. त्यामुळे ते दोन दिवस सुद्धा आमचा नाशिकचा प्रवास सुखावह झाला होता.
२०१५ नंतर माझे नाशिकला जाणे जवळजवळ थांबले होते. मात्र तरीही दादांशी अधून मधून फोनवर गप्पा व्हायच्या. मी त्यांना पुन्हा नागपूरला या असा आग्रह करत असे, तर ते तुम्हीच आता एकदा सहकुटुंब नाशिकला फिरायला या असा आग्रह करायचे. मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग नव्हता. जानेवारी २०२१ मध्ये नाशिकच्या पत्रकार संघटनेने मला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले होते. त्या कार्यक्रमासाठी मी नाशिकला पोहोचलो. एकच दिवसाचा मुक्काम होता तरीही दादांना फोन केला. त्या दिवशी त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी घरी येण्याचा आग्रह केला. मात्र मला धावपळीत जाणे शक्य नव्हते. पुन्हा आलो की नक्की येतो असे मी त्यांना सांगितले. त्या दिवशी कार्यक्रम आटोपून मी नागपूरला परत आलो आणि माझ्या व्यापात व्यस्त झालो.
नंतर अधून मधून दादांशी फोनवर बोलणे व्हायचे. मात्र नाशिकला जाणे काही झाले नाही. त्यांचेही नागपूरला येणे झाले नाही, आणि अचानक २२ डिसेंबर २०२३च्या दुपारी समाज माध्यमांवर दादा गेल्याची बातमी आली. खरे तर त्या दिवशी सकाळी मी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साठी फोन करायचे ठरवले होते. मात्र सकाळी गडबडीत फोन करायचा राहिला आणि दुपारी ही बातमी आली. या बातमीने मला चांगलाच धक्का बसला होता. एक चांगला सुहृद गमावल्याचे मला दुःख झाले होते.
दादा एक राजकारणी कमी आणि समाजसेवी जास्त असे व्यक्तिमत्व होते. सर्वांशी मैत्री जपणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराशी देखील त्यांनी मैत्री जपली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. त्यांच्या आठवणी कायम येतच राहणार आहेत.
✍️अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment