राम'व्यथा' ६.✍️विनोद देशमुख रामललाचं पुनरागमन... बंद दरवाजाआडून दर्शन.

 राम'व्यथा' ६.✍️विनोद देशमुख

रामललाचं पुनरागमन...

बंद दरवाजाआडून दर्शन.

🚩 बाबरचा अयोध्येचा सुभेदार बकी बेग ताश्कंदी यानं श्रीरामजन्मभूमी मंदिर पाडून त्या जागेवर लगोलग मशीद बांधणं सुरू केलं, तेव्हा सुदैवानं रामलला विराजमान तिथं नव्हते कारण, मंदिराचे प्रमुख श्यामानंद महाराज यांनी मंदिर विध्वंसाच्या आधीच रामललाची बालमूर्ती तेथून हटवली आणि शरयू नदीच्या पात्रात विसर्जित करून टाकली.‌ तेव्हापासून ४२१ वर्षे विजनवासात (म्हणजे नेमकं कुठं ?) राहिलेले रामलला २२-२३ डिसेंबर १९४९ च्या रात्री अचानक "आपल्या घरात" परतले पण, पुढची ४० वर्षे कुलूपबंद दाराआडूनच भक्तांना दर्शन घ्यावं लागत असे.

"काळ्या पाषाणाचे रामलला त्या रात्री बाबरी मशिदीच्या मधल्या घुमटाखालील गर्भगृहात अचानक प्रकटले", अशी वार्ता रातोरात पसरून अयोध्येतील रामभक्तांनी तेथे गर्दी केली आणि सकाळपर्यंत रामललाची प्राणप्रतिष्ठा होऊन पूजाअर्चाही सुरू झाली. ही मूर्ती प्रकटली नसून, संधी साधून आणून ठेवण्यात आली आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आजूबाजूच्या कबरी खोदण्यात आल्या, असा आरोप मशीद पक्षाने यावर केला. या घटनेची चौकशी करणारे पोलिस अधिकारी गुरुदत्त सिंग यांनी मात्र "हे श्रीरामाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची पूर्वापार श्रद्धा आहे.‌ परंतु काही मुस्लिम मशिदीचा दावा करीत आहेत. म्हणून सरकारने ही जागा मंदिरासाठी द्यावी आणि मुस्लिमांना या परिसरात येण्यास बंदी करावी" असा अहवाल दिला. 

फैजाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कंदंगलम करुणाकरन (के. के.) नायर यांनी पूजा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आणि ५०० मीटर परिसरात येण्यास मुस्लिमांना  बंदी घातली. तेव्हापासून १९९२ पर्यंत या मशिदीत कधीही नमाज पढला गेला नाही. उजवीकडचा मशीदवाला घुमट झाडेझुडे उगवून खराब आणि खिळखिळा झाला. आज ना उद्या तो पडलाच असता, अशा स्थितीत हा भाग आम्ही स्वत: पाहिला. त्या तुलनेत मधला आणि डावीकडचा हे दोन घुमट मात्र बरेच सुस्थितीत होते आणि याच भागात बंदिस्त राममंदिराचे (गर्भगृह) व्यवहार होत होते.

या मशिदीवरील नेहमीचा पहारेकरी पोलिस शिपाई अब्दुल बरकत हा त्या रात्रीही कामावर होता. त्यानं  या घटनेसंदर्भात न्यायालयात स्वच्छ जबाब दिला- "रात्री मी बंदोबस्तावर होतो. मध्यरात्री अचानक मला इमारतीच्या मध्य भागात सोनेरी रंगाचा प्रखर उजेड दिसला. त्या उजेडात चार-पाच वर्षांच्या लहान बाळाचा चेहरा दिसत होता. असा दिव्य चेहरा मी पूर्वी कधीच बघितला नव्हता. ते दृश्य बघून माझी शुद्धच हरपली. जाग आली तेव्हा दरवाजाचं कुलूप तुटून पडलं होतं आणि प्रचंड संख्येतील हिंदू भाविक मूर्ती आसनावर ठेवून आरती करीत होते."

यालाच लोक रामललाचं प्रकट होणं म्हणतात.‌ भक्त नसलेल्यांना ही घटना अकल्पनीय, अतिरंजित वाटू शकते. त्यावर अयोध्यावासीयांजवळ उत्तर तयार आहे. "१५२८ मध्ये मूर्ती शरयूत विसर्जित करणारे श्यामानंद महाराज यांनी हा प्रकार त्यांच्या विश्वासातील माणसाला सांगितला असेलच. ही माहिती असलेल्यापैकी कोणीतरी मूर्ती केव्हातरी शरयूतून बाहेर काढून जपून ठेवली, ती यावेळी कामी आली. ही मूर्ती तशीच काळ्या पाषाणाची आहे", असा युक्तिवाद एक रामभक्त आमच्याशी करीत होता.

पुढच्या भागात : श्यामानंदानी मूळ मूर्ती का हटवली ? कुलूप का लागलं ?

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.