राम'व्यथा' ५✍️विनोद देशमुख अकराव्या शतकापासूनच अयोध्येचं मंदिर 'लक्ष्य'
राम'व्यथा' ५.✍️विनोद देशमुख
अकराव्या शतकापासूनच
अयोध्येचं मंदिर 'लक्ष्य'

🚩 अयोध्येचा श्रीराम आणि द्वारकेचा श्रीकृष्ण हे केवळ विष्णूचे अवतार नाहीत. प्रत्यक्ष वावरलेले मानव आहेत. देशभर ठिकठिकाणी त्यांच्या पाऊलखुणांचे पुरावे आहेत, उत्खननात सापडले आहेत. सनातन हिंदू समाज या दोघांनाही आराध्य दैवत, राष्ट्रपुरुष, आदर्श राजा याच रूपात वर्षानुवर्षे पूजत आला आहे. ते भारतीय जनतेच्या मनामनात होते, आहेत. म्हणूनच भारतावर राज्य करायचं असेल तर येथील जनतेचं मानसिक खच्चीकरण करावं लागेल आणि यासाठी त्यांच्या मनातून राम-कृष्ण बाहेर काढले पाहिजे, हे हेरूनच परकीय आक्रमकांनी अयोध्येचं श्रीरामजन्मभूमी मंदिर, मथुरेचं श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर, द्वारकेचं द्वारकाधीश मंदिर, तसंच सोमनाथचं शिवमंदिर उद्ध्वस्त करण्याचे वारंवार प्रयत्न केले, (सोमनाथची, द्वारकेची कहाणी पुढे कधीतरी.) हे आता लपून राहिलेलं नाही.
त्यातही मुगल राजवटीचा संस्थापक बाबरने तर रामललाला ४२१ वर्षे 'वनवास' घडेल असंच कृत्य केलं. परंतु, अयोध्येवर डोळा असलेला बाबर हा काही पहिलाच आक्रमक नव्हता. अयोध्येवर हल्ल्याचा पहिला अयशस्वी प्रयत्न १०३३ मध्ये महमूद गझनीचा पुतण्या सालार मसूद यानं केला होता. या मसूदला त्याच्या संपूर्ण सैन्यासह कापून काढण्याचं शौर्य राजा सुहेल देव यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या अनेक भारतीय राजांनी दाखवलं. त्यामुळे पुढची सुमारे दोन शतकं आक्रमक या भागाकडे फिरकलेच नाहीत ! बाराव्या शतकाच्या अखेरीस मात्र गझनीचा पंजाबचा सुभेदार महमूद शाहनं हल्ल्याचा एक प्रयत्न करून पाहिला. महंमद घोरीचा भाऊ मकदूम शाह जुर्रन घोरी यानं ११९८ साली अयोध्येवर हल्ला करून जैन तीर्थंकर आदिनाथ यांचं जन्मस्थान मंदिर उद्ध्वस्त केलं. नंतर हा घोरी देखील त्याच्या सैन्यासह मारला गेला. त्यानंतरही अवतीभवतीच्या सुलतानांनी अधूनमधून हल्ल्याचे प्रयत्न जारीच ठेवले.
मात्र, बाबरनं १५२६ मध्ये दिल्लीची सत्ता बळकावल्यानंतर अयोध्येचं श्रीरामजन्मभूमी मंदिर प्रथमच धोक्यात आलं आणि उद्ध्वस्तही करण्यात आलं. १५२८ साली बाबरचा अयोध्येचा सुभेदार बकी बेग ताश्कंदी (सेनापती मीर बांकी नव्हे) यानं हे मंदिर पाडलं आणि त्याच जागेवर मशिदीचं बांधकाम सुरूही केलं. मालकाला खुश करण्यासाठी त्यानंच "बाबरी मशीद" हे नाव दिलं असावं. स्थानिक लोक मात्र तिला "मशीद-ए-जन्मस्थान" असंच म्हणायचे ! एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लढाईसाठी बाबर अयोध्येजवळच्या चंदेरीपर्यंत आला; पण अयोध्येत न येताच आगऱ्याला परत गेला आणि नंतर दोन वर्षांनी मरण पावला. तरीही त्याच्या नावाची मशीद अयोध्येत साडेचारशे वर्षे उभी होती !! याकाळात जन्मभूमी परिसराचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात पाऊणेकशे लढाया झाल्या, त्यात लाखो लोकांचे जीव गेले, मोठे आंदोलन झाले अन् शेवटी न्यायालयानं हा प्रश्न सोडवून २०१९ मध्ये या वादावर पडदा टाकला. आणि आता तर त्याचं जागेवर भव्य मंदिर बांधलं गेलं आहे.
(काही संदर्भ माधव भांडारी लिखित 'अयोध्या' पुस्तकातून)
पुढच्या भागात : रामललाचं पुनरागमन, पण पुन्हा वनवास !
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment