खलबत्ता ✍️विनोद देशमुख, ये क्या चल रहा है महाराष्ट्रमें.

 खलबत्ता:-विनोद देशमुख.

ये क्या चल रहा है महाराष्ट्रमें.

नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत बऱ्यापैकी साधलेलं युती, महायुती, आघाडी यांचं गणित यावेळच्या महानगर पालिका निवडणुकीत बिघडताना दिसत आहे. जमत आलेलं असताना न जमणं, तिकिटासाठी स्वत:च्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं, नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणं असे प्रकार सर्रास सुरू आहेत आणि त्यामुळे सारेच पक्ष ढवळून निघाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच या गोंधळाचा गाळ खाली बसून लढतींचं चित्र बरंचसं स्पष्ट होईल...

चहाचा घोट घेता घेता पाटील गुरुजी आपल्या सहकारी शिक्षकांना सांगत होते. त्यावर जगनाडे सर म्हणाले- "मुंबई, नागपूर, पुणे या तीन प्रमुख महानगरांचेच हाल पाहा ना. आज अस्तित्वात असलेली महायुती आणि महा विकास आघाडी या तीनही शहरांमध्ये एकजुटीनं आजतरी दिसत नाही. (उद्याचं सांगता येत नाही) मले त काई समजतच नाई. असे काहून आपले नेतेलोक."

यावर मानकर गुरुजींनी त्यांची समजूत काढली- "हे आजकालचं राजकारण आहे सर. इथं कोणी कोणाचा खरा मित्र नाही अन् शत्रूही नाही. पक्ष, विचार, तत्त्वज्ञान, धोरण, लागेबांधे हे सारं गंडाळून ठेवून निवडणुकीत कोणाशीही हातमिळवणी करण्याचा नवा फंडा आला आहे. आपल्या राज्यात 2019 पासून आपण सारं पाहत आहोतच की"

मानकरांचं ऐकून देशपांडेंना चेव चढला. ते उद्गारले- "आम्हीही आतापर्यंत 8-10 निवडणुका सहज पाहिल्या. ग्राम पंचायत ते लोकसभा यासाठी वेळोवेळी मतदानही केलं. पण आजच्यासारखी खिचडी नाही पाहिली, "सत्तेचं जुगाड" हे आता नवं सूत्र झालं आहे. त्यासाठी कोणासोबतही तडजोड करण्याची सर्वांचीच तयारी आहे. यामुळे भविष्यात पक्षीय, तात्त्विक राजकारण संपतं की काय, अशी मला भीती वाटते मित्रांनो."

संपतं नाही, आजच संपल्यात जमा आहे देशपांडे... जगनाडे उसळून म्हणाले- "परवाच्या नगर पालिका निवडणुकीत हे दिसलंच ना. तीन-तीन मोठ्या पक्षांचे दोन प्रमुख गट आपल्या इथं आहेत. एक महायुती (भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी-अप) आणि दुसरी महा विकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना, उबाठा-राष्ट्रवादी-शप). या दोन गटांची आणि सहा पक्षांची परवाच्या निवडणुकीत काय स्थिती होती, हे आठवा जरा. दोन गटांमध्ये थेट लढत क्वचितच ठिकाणी झाली. कुठं गटबाह्य हातमिळवणी, कुठं एकला चलो रे तर कुठं मित्रपक्षच आमनेसामने, निकालानंतर गट पुन्हा जैसे थे ! जणू काही घडलंच नाही, याचीच पुनरावृत्ती यावेळीही जास्त प्रमाणात होईल, अशी लक्षणं दिसत आहे. हे मतदारांना उल्लू बनवणं नाही तर दुसरं काय, मैत्रिपूर्ण लढतीही करायच्या अन् नंतर एक होऊन सत्ताधारीही व्हायचं, हे गणितच आमच्या पिढीच्या लक्षात येत नाही बघा."

यावर मानकरांनी विचारलं- "याची कोणाला पडली आहे, गुरुजी ? तुम्हीच तर आत्ता म्हणाले ना, सत्तेचं जुगाड आहे म्हणून. त्यात सारं काही माफ असतं राजेहो. पक्ष आपल्या जागी, युती-आघाडी आपल्या जागी, तत्त्व आपल्या जागी अन् सत्तेचं सिंहासन उंच जागी. तिथं पोहोचण्यासाठी कोणाचीही मदत घ्यायची आणि कोणालाही बाजूला सारायचं, हे आजचं राजकारण आहे. कशाला तुम्ही माथापच्ची करता ? होऊन जाऊ द्या नेत्यांच्या मनासारखं. मतदार पाहत आहे सारं. ते ठरवतील आणि निवडतील. योग्य निवड झाली तर सर्वांचाच फायदा होईल अन् चुकलं तर सारेच भोगतील. शेवटी काय, तुम्ही जे पेराल, तेच उगवेल की नाही ! बघू या काय होतं ."

चारही शिक्षक टीचर रूममधून बाहेर पडले अन् दुसऱ्या चहासाठी कोपऱ्यावरील टपरीसमोर जाऊन उभे राहिले.

+✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.