राम'व्यथा' ४.✍️विनोद देशमुख. श्रीरामजन्मभूमीची कहाणी पहिल्यांदाच जगजाहीर.
राम'व्यथा' ४.✍️विनोद देशमुख
श्रीरामजन्मभूमीची कहाणी
पहिल्यांदाच जगजाहीर.
-----------------------

🚩अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमीवर असलेल्या बाबरी मशीद ढाच्याच्या मधल्या घुमटाखाली रामललाची विग्रह मूर्ती १९४९पासून विराजमान होती आणि कुलूपबंद होती. १९८४ मध्ये मध्ये या प्रकाराला ३५ वर्षे झाली होती. याकाळात देशभरातील हजारो-लाखो रामभक्त अयोध्येला दर्शनासाठी गेले असणार. परंतु, श्रीराम अयोध्येत बंदिस्त असल्याचं कोणी कोणाला सांगितलं आणि या विषयाची चर्चा झाली, असं मला तरी आठवत नाही. (माझ्या लेखमालेचा कालचा भाग ३वाचल्यावर मात्र मला २-३ फोन आले- "आम्ही पाहिला होता कुलपात बंद राम !") एवढ्या मोठ्या घटनेचा पाहिजे तसा प्रचारच झाला नाही. कारण, सनातन हिंदू समाज अतिसहिष्णू आणि भिडस्त झाला आहे. आपली हीच दुर्बलता आहे. आपले लोक निषेध नोंदवत नाहीत. उलट, "चलता है" म्हणत आपण सहन करीत राहतो. ती जखम मग चिघळून कर्करोगाकडे जाते अन् त्रास वाढतो. कितीतरी प्रकरणांमध्ये असेच घडल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत.
१९८४ मध्ये ही स्थिती पहिल्यांदा बदलली आणि देशभरातील हिंदू समाजाचे डोळे उघडले. याला कारणीभूत ठरले पत्रकार महासंघाचे फैजाबाद अधिवेशन आणि त्यात सहभागी देशभरातील पत्रकार. आपापल्या राज्यात परत गेल्यावर त्यांनी आपल्या छोट्यामोठ्या दैनिकांमध्ये, साप्ताहिकात आणि मासिकात हा विषय छापून "श्रीरामाचा वनवास" प्रथमच जाहीरपणे जगासमोर आणला. एका अर्थाने हीच श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची खरी सुरुवात होती. नंतरच्या ८ वर्षात हिंदू समाजाचा रोष वाढतच जाऊन १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडण्यात आला, जो अपप्रसंग सामंजस्याने टाळता आला असता.
आमचे ठरल्यापमाणे, मी सविस्तर लिहिलेला "बंदिवासातील राम" हा लेख तरुण भारतच्या रविवार पुरवणीचे संपादक (स्व.) वामनराव तेलंग यांनी जयंतराव हरकरेंच्या विशेष छायाचित्रांसह 'मुखपृष्ठ कथा' म्हणून पानभर छापला. या लेखाचे सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून संघाच्या व्यवस्थेने तो देशभर पसरविला. तो अनेक भाषांमध्ये छापूनही आला. प्रतिबंधित श्रीरामजन्मभूमी क्षेत्राशी संबंधित इतकी तपशीलवार माहिती आणि छायाचित्रे पाहून देशभरातील गुप्तचर यंत्रणा हादरली.
त्यांनी शोध घेतला, तेव्हा त्यांना "या छायाचित्रांचे मूळ नागपुरात असल्याचा" सुगावा लागता. दिल्लीचे दोन सीबीआय अधिकारी तातडीने नागपुरात आले. त्यांनी तरुण भारतचे तत्कालीन संपादक (स्व.) दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांना फोनवरून विषयाची कल्पना दिली आणि भेट मागितली. मामासाहेबांनी आम्हाला सतर्क करून आधीच बोलावून घेतले होते. त्या अधिकाऱ्यांसमोर आम्हाला उभे करून ते म्हणाले- "हे दोघे पत्रकारांच्या अधिवेशनासाठी अयोध्येला गेले होते. देशमुखांनी रीतसर प्रवेश घेऊन श्रीरामजन्मभूमी पाहिली आणि परतल्यावर दीर्घ लेख लिहिला. हरकरे यांना मात्र कॅमेरा घेऊन प्रवेश नाकारल्याने छायाचित्रे काढता आली नाहीत. त्यांनी स्थानिक छायाचित्रकारांकडून काही फोटो मिळवले आणि आम्ही ते वापरले. या छायाचित्रकारांची नावे, पत्ते मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही. यासाठी तुम्ही मला बाध्यही करू शकत नाही. प्रकरण न्यायालयात गेले तरच मी ही माहिती न्यायाधीशांना (त्यांचे शब्द होते- " न्यायाधीशाच्या कानात !") सांगीन" वकिली शिकलेल्या मामासाहेबांचा युक्तिवाद ऐकून दोन्ही अधिकारी गारच झाले आणि चहापान घेऊन हात चोळत दिल्लीला परत गेले.
(स्व.) ग. त्र्यं. माडखोलकर, (स्व.) मा. गो. वैद्य यांच्यासारखेच बाणेदार संपादक मामासाहेबांच्या रूपात आमच्यासमोर शांत बसून आम्हाला दिलासा देत होते आणि आम्ही दोघेही थक्क झालो होतो.
पुढच्या भागात : सुमारे सव्वाचारशे वर्षे गर्भगृहाच्या जागेवर नसलेली रामललाची मूर्ती १९४९ मध्ये अचानक आली कुठून ?
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment