खलबत्ता -विनोद देशमुख , युती झाली... युती‌ झाली...

खलबत्ता:-विनोद देशमुख.


युती झाली... युती‌ झाली...

महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला आणि सत्तेवर पोहोचू न‌ शकलेला आंबेडकरवाद उत्तर भारतात यशस्वीपणे नेणारे आणि मायावतींना मुख्यमंत्रिपदी बसविणारे बसपानेते कांशीराम प्रारंभीच्या काळात युती संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगत असत. ते म्हणायचे- "बामसेफच्या कामासाठी एकदा मी नागपूर-विदर्भात आलो असताना रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मला सांगू लागले की, आमच्या पक्षाची कॉंग्रेसशी युती झाली आहे. मी विचारले- तुम्हाला किती जागा मिळाल्या ? उत्तर आले- एक जागा, उत्तर नागपूर विधानसभेची. किती जागांपैकी‌ एक ? तेव्हा ते म्हणाले- २८८ पैकी एक हे ऐकून मला फार वाईट वाटलं. फक्त एक (०.३४ टक्के) जागा पदरात पडल्यावरही आमचे आंबेडकरवादी कार्यकर्ते "युती झाली, युती झाली" म्हणत आनंद व्यक्त करीत असतील, तर आपलं राज्य येणार कसं ?" शेवटी कांशीरामांनी स्वत:चा बसपा हा पक्ष काढून‌ मायावतींना मुख्यमंत्री‌ बनवून दाखवलं, हा इतिहास आहे.

अर्थात् युतीची ही पद्धत आता फार बदलली आणि तुल्यबळ, मोठ्या पक्षांच्या (तरीही छोट्या भावांचे हाल तसेच आहेत. उदा.- राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षच पाहा. त्यांचं स्वत:चं मंत्रिपद सोडलं तर बाकी कार्यकर्त्यांचं काय, हा नेहमीचा प्रश्न असतो.) युत्या सर्रास होऊ लागल्या आहेत.‌ महाराष्ट्रात १९९५ ची भाजपा-शिवसेना युती, २०१४ च्या निकालानंरची हीच युती, २०१९ ची निकालानंतर बिघडलेली हीच युती आणि त्यातून जन्माला आलेली शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची महा विकास आघाडी नावाची निकालोत्तर युती, २०२२ मध्ये शिवसेनेत महाफूट पडल्यानं उदयास आलेली आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादीही अशीच फुटल्यानंतर झालेली भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांची नवी महायुती असा युती-संकल्पनेचा बराच विस्तार झालेला आहे.

विद्यमान सरकारच्या बाजूनं किंवा विरोधात अशी दोनपैकी एक भूमिका ठामपणे घेऊन युती करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. "व्यावहारिक तडजोड" हे आता युतीचं नवं सूत्र आहे. तसं नसतं तर शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली नसती आणि अजित पवार भाजपा-शिवसेनेसोबत आले नसते. भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादीलाही हे लागू पडतं. त्यामुळं आजच्या युत्यांचं हे 'चारित्र्य' महाराष्ट्रातील जनतेला भंडावून सोडत आहे, हे नाकारता येत नाही.

या पृष्ठभूमीवर परवा झालेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची झालेली 'बंधुप्रेम' उर्फ 'प्रीतिसंगम' युती आणि पुणे शहरातील शरद पवार-अजित पवार ही काका-पुतण्याची संभाव्य युती यांनी 'युतीकरणा'ला नवा आयाम जोडला आहे. त्याचं नाव आहे भाऊबंदकी आणि घराणेशाही  घरात झालेले बेबनाव विसरून, स्वत:चं पडतं राजकीय घर (लोकं मात्र याला राजकारणाचं दुकान म्हणतात) सावरून धरण्यासाठी या युत्या होत आहेत, हे सूर्यप्रकाशापेक्षाही अधिक स्वच्छ आहे. 

मूळ शिवसेनेत मनसेमुळं दोन दशकांपूर्वीची झालेली पक्षफूट विसरून उद्धव ठाकरे, आपले चुलत बंधू राज ठाकरे यांना "ठाकरे ब्रॅण्ड" साठी सोबत घेत आहेत आणि महापालिका निवडणुकीसाठी मुंबई-पुणे-नाशिक परिसरात तरी एकत्र आलेले दिसत आहेत. तिकडं, राष्ट्रवादीचं मुख्यालय असलेल्या पुणे जिल्ह्यात पवारकाका आणि पुतण्या यांचं मनोमीलन झालं आहे. या दोन्ही नव्या युत्यांचा मविआ आणि महायुती या दोन्ही गटांवर मनपा निवडणुकीत आणि निकालानंतर काय परिणाम होईल, ते १६ जानेवारीलाच कळेल. "संक्रांत कोणावर येणार" तेच आता पाहायचं.

एक महत्त्वाची गोष्ट. १५ जानेवारीच्या निवडणुकीत मतदान करताना प्रत्येकानं नवीन युत्या, महायुती, मविआचे उरलेसुरले घटक या सर्वांच्याच उमेदवारांची 'घराणेशाही' तपासून मगच मतदान केलं पाहिजे. आपल्याला लोकशाही टिकवायची आहे अन् मजबूतही करायची आहे, एवढं लक्षात ठेवा राजेहो.

+✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.