दिनविशेष. साने गुरुजी जन्मदिन

दिनविशेष.

 साने गुरुजी जन्मदिन



               पालगड हे ता. दापोली जि. रत्नागिरी जवळील दुर्गम भागातील गाव. इथे लोक आवर्जून भेट देतात कारण "जगाला प्रेम अर्पावे" म्हणत देशभरातील लोकांना सर्वच भाषा समजाव्यात.. त्यांचे एकमेकांशी हृदयस्थ नाते जोडले जावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या.. "बलसागर भारतासाठी" भूमिका मांडणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म झालाय (१८९९-१९५०). त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले आणि जीवनातील अखेरच्या काळात वास्तव्यही झाले.*

        *साने गुरुजी म्हणून जगाला त्यांची ओळख. अत्यंत कोमलहृदयी.. संवेदनशील.. निष्ठावंत व्यक्तीमत्व. त्यांच्या शब्दाशब्दातून मातृभूमिवर प्रेम व्यक्त होते. अत्यंत सुलभ भाषा.. समाजाविषयी कळवळा.. स्नेह.. प्रेम ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये. ज्या आईच्या संस्कारानी ते घडले, तिच्यावरचे लिहलेले 'श्यामची आई' हे बालसंस्कारी पुस्तक तर सदासर्वकाळ सर्वोत्तम पुस्तक ठरले आहे.*

        *१९२४ साली एम.ए. झालेले गुरुजी अंमळनेरला शिक्षक आणि वसतीगृह प्रमुख झाले. पण नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेत जनजागृती केल्याने तुरुंगवास भोगला. आधी गांधीवादी तर पूढे समाजवादी झाले.*

        *गुरुजी जातीयवाद.. अस्पृश्यता.. अनिष्ट प्रथेविरुद्ध  लढले. धुळ्यात कारावासात त्यांनी विनोबाजींची गीताप्रवचने लिहून काढली. संस्कारी.. वैचारिक.. प्रेरणादायी असे त्यांचे विपूल साहित्य आहे. राष्ट्रसेवादलाचे संस्थापक तसेच साधना मासिकाचे संपादक ही पण त्यांची ओळख.*

        *बालसाहित्य.. कथा.. कविता.. निबंध.. चरित्रलेखन.. अनुवाद असा विविधांगी ७३ पुस्तकांचा त्यांचा अनमोल ठेवा आहे. देशातील आदर्श लोकांना ठाऊक व्हावेत म्हणून नामवंत व्यक्तीवरचे चरित्र लेखनही केले. भारतीय संस्कृतीवर त्यांचे नितांत प्रेम. त्याचे महत्त्व सांगणारा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथही लिहलाय.*

        *‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील "बलसागर भारत होवो.." सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.*

        *देशातील प्रत्येकाला दुसऱ्या प्रांतातील भाषेची ओळख झाली.. समजली तर प्रांतिक कलहच निर्माण होणार नाही.. एकात्मता बळकट होण्यास मदत होईल हे सिद्ध करायला त्यांनी स्वतः तामीळ.. मल्याळम वगैरे भाषा शिकून 'आंतरभारती संस्था' स्थापन केली. आजही लोक अनेक परदेशी भाषा शिकतात पण देशातील अन्य प्रांतातील भाषा शिकत नाहीत. देशातील इतर भाषांमधील साहित्याची माहिती पण नसते. देशातील सर्वांना देशातील सर्वच भाषा याव्यात यासाठी ते आग्रही होते.* 

        *माणगाव.. रायगड जिल्ह्यात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक संस्था त्यांचे कार्य पूढे चालवत आहे. अन्य भाषांतील साहित्य अनुवादचे महत्त्वाचे कार्य तसेच अनेक लोकोपयोगी उपक्रम ही संस्था आजही करतेय.* 

        *स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ते लढलेच. त्यानंतरही जातीभेद विरहीत.. प्रांतीयभेद विरहीत.. सुशिक्षित आदर्श समाज निर्माणासाठी कार्य केले. त्यांचे जीवनकार्य.. लिखाण सदासर्वकाळ मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी आहे. अश्या या थोर स्वातंत्र्य सैनिक.. देशप्रेमी साहित्यिकास विनम्र अभिवादन.*    

        *साने गुरुजीनी स्वातंत्र्य लढ्यात जनजागृतीसाठी लिहलेले हे गीत..*

 *भारतमाता माझी*

  *लावण्याची खाण*

  *गाइन तिचे गान,* 

  *मी गाइन तिचे गान*

  *करिन तिचे ध्यान,*

  *मी करिन तिचे ध्यान*


  *मांडिन निर्भय ठाण,*

  *मी मांडिन निर्भय ठाण*

  *देइन माझे प्राण,* 

  *मी देइन माझे प्राण*

  *हाती घेतले आहे*

  *सतिचे मी वाण*


  *जाळिन सारी घाण,* 

  *मी जाळिन सारी घाण*

  *काटिन रुढिरान,*

  *मी छाटिन रुढिरान*

  *मातेला जगामध्ये*

  *देईन पहिले स्थान*


  *नुरविन कसली वाण,*

  *मी नुरविन कसली वाण*

  *काढिन रुतले बाण*

  *मी काढिन रुतले बाण*

  *मातेला घालीन माझ्या*

  *हातांनी मी स्नान*


  *सर्वस्वाचे दान,*

  *करिन मी सर्वस्वाचे दान*

  *घेतो आज आण,* 

  *मी घेतो आज आण*

  *मातेला घडविन माझ्या*

  *मोक्षामृतपान*

संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.