खलबत्ता:-विनोद देशमुख , विदर्भ सख्खा भाऊ की सावत्र.

 खलबत्ता:-विनोद देशमुख.



विदर्भ सख्खा भाऊ की सावत्र.

प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला, रामायण-महाभारतात उल्लेख आलेला, श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोघांशीही प्रत्यक्ष नातेसंबंधानं जुळलेला, सर्वच क्षेत्रांमधील अनेक दिग्गजांना जन्मास घातलेला विदर्भ प्रदेश हा भारतातील सर्वात दुर्दैवी प्रदेश म्हटला पाहिजे. सर्वच बाबतीत संपन्न असूनही या प्रदेशावर स्वातंत्र्योत्तर काळात गेली पाऊणशे वर्षे सतत अन्याय होत आहे. तो एवढा की, आता हाच विदर्भ देशभरात शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात झाला आहे🥺 मराठी भाषेच्या नावावर 'राज्य'पदाचे आणि नागपूर राजधानीचे बलिदान देणाऱ्या विदर्भाची महाराष्ट्रात गेली ६०-६५ वर्षे अवहेलनाच झाली, हे लपून राहिलेलं नाही. स्वातंत्र्यात राजधानीपद गमावलेलं नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे.

सुदैवानं, अधूनमधून का होईना, वैदर्भीय नेत्यांना वेगळ्या विदर्भाची आठवण होत असते. त्यातही दरवर्षी हिवाळ्यात नागपूरला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशन काळात तर हा मुद्दा येतोच येतो. यावेळीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो काढला. "वेगळा विदर्भ भाजपाच्या अजेंड्यावर आहे आणि त्यावर आमचं कामही सुरू आहे" असं ते बोलून गेले. कधी नव्हे ते, कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते, सध्याचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही "वेगळ्या विदर्भाबद्दल पक्षश्रेष्ठींशी बोलू," अशा शब्दात त्यांचं एकप्रकारे समर्थनच केलं.‌

मग काय, उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत खवळले आणि त्यांनी भाजपा, शिवसेना, वडेट्टीवार या तिघांवरही हल्ला चढविला- "भाजपाला महाराष्ट्र तोडायचा आहे... मुंबई गुजरातच्या घशात घालायची आहे... एकनाथ शिंदे हे अमित शहांचे मिंधे असल्यामुळे गप्प आहेत... काँग्रेस वेगळ्या विदर्भाची समर्थक नसल्यानं वडेट्टीवारांना आम्ही मोजत नाही..."  वगैरे वगैरे. मग "आम्हीही राऊतांना मोजत नाही" असा पलटवार वडेट्टीवारांनीही केला आणि मविआतील बेबनाव चव्हाट्यावर आणला.

तिकडे, राऊतांचे आका उद्धव ठाकरे यांनी, "विदर्भ हा महाराष्ट्राचाच आणि महाराष्ट्र विदर्भाचा आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत" असा मुद्दा मांडत वेगळ्या विदर्भाला नेहमीप्रमाणं विरोध केला. पण, त्यांचं हे विधान 'पावसत्य' आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकल्यामुळे वऱ्हाडचा काही भाग १६८० ते १७२४ अशी फक्त ४४ वर्षे मराठेशाहीत (म्हणजे महाराष्ट्रात) राहिला. नंतरच्या राजकीय तडजोडींमुळे तो निझाम, मुगल यांच्याकडे गेला. पुढे १७३९ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे सरदार रघुजीराजे भोसले यांनी नागपूर जिंकून पहिल्यांदा मराठा राज्य विदर्भात स्थापन केलं आणि ते बंगालपर्यंत वाढवलंही. परंतु, ते महाराष्ट्रात नव्हतं. वेगळं राज्य होतं. ब्रिटिश राजवटीत विदर्भ-मध्यप्रदेश असा स्वतंत्र सी. पी. ॲण्ड बेरार प्रांत १९५६ पर्यंत होता. भाषिक प्रांतरचनेत महाराष्ट्रात जायला विदर्भ तयार नव्हता. पण, काँग्रेसच्या राजकीय स्वार्थासाठी "जबरदस्तीचा रामराम" करण्यात आला. असं असताना "विदर्भ महाराष्ट्राचा" हे कोणत्या तोंडानं म्हणता तुम्ही ? साठीला येतपर्यंत सावत्र भावासारखं वागवायचं आणि इस्टेटीच्या वाटणीच्या वेळी अनेक भाऊ गोड गोड बोलून कागदपत्रांवर बहिणींच्या सह्या घेतात तसं करण्यासारखं आहे हे.

✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.