वारसा... ✍️विनोद‌ देशमुख चतुर्भुज, चतुष्पाद महादेव .

 वारसा... ✍️विनोद‌ देशमुख

चतुर्भुज, चतुष्पाद महादेव 

भगवान शंकर आपण नेहमी दोन हात, दोन पाय असलेलेच मूर्तींमध्ये, फोटोंमध्ये पाहत आलो आहोत.‌ पण, चार हात, चार पाय असलेलं शंकर-शिल्प सुद्धा एका मूर्तिकारानं दगडातून साकारलं आहे, असं कोणी सांगितलं तर आपला विश्वास बसेल ? सहसा बसणार  नाही. प्रत्यक्षात मात्र अशी मूर्ती अस्तित्वात आहे.

ही अनोखी मूर्ती पाहण्यासाठीच मी माझ्या मित्रांसह परवा गडचिरोलीला गेलो होतो. गडचिरोलीला यासाठी की, या जिल्ह्यातील चामोर्शीजवळच्या मार्कंडादेव येथे वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिरात अशी मूर्ती आहे, हे मला कळलं होतं. परंतु, यावेळच्या पहिल्याच भेटीत ही मूर्ती आम्हाला दिसली नाही.

मूर्तिकला आणि एकूणच हिंदू धर्म, अध्यात्म या विषयांच्या गाढ्या अभ्यासक डॉ. रमा गोळवलकर यांनी नागपुरात 'शिव' विषयावर व्याख्यान देताना सातआठ वर्षांपूर्वी ही माहिती सहजपणे दिली होती. म्हणून, नागपूरला परतल्यावर त्यांनाच विचारलं, "ती मूर्ती मार्कंड्यात नेमकी कुठं आहे ?" तेव्हा त्या म्हणाल्या- "मार्कंडेश्वर मंदिरात शिवलिंग असलेलं जे मुख्य मंदिर आहे, त्याच्या प्रवेशद्वाराच्या सभोताल कोरलेल्या अनेक मूर्त्यांमध्ये ही मूर्ती वरच्या बाजूला आहे. दोन ऐवजी चार-चार हातपाय असलेली ही अशी जगातील एकमेव शिवमूर्ती आहे".

आम्ही नेमका तोच भाग बारकाईनं पाहिला नाही. कारण, आधीच त्यांना विचारून गेलो नाही आणि संधी गमावली, याची आता खंत वाटते. परंतु, याच भागाचं दुरुस्तीकाम सुरू असल्याचा एक फोटो मोबाईलनं काढला होता, तो घरी मोठा करून पाहताना उंचावर दोन राड्सच्या मध्ये तीच मूर्ती दिसली. प्रत्यक्ष मंदिरात दर्शन हुकलं, पण मोबाईल फोटोनं ते घरीच घडवलं. 

८ ते १२ व्या शतकात उभारण्यात आलेलं हे मंदिर संकुल "मिनी खजुराहो" म्हणूनच ओळखलं जात असे. २०० फूट लांब आणि १२०फूट रुंद अशा विशाल चौकोनात एकेकाळी छोटीमोठी ६० मंदिरं होती. या मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर, भिंतींवर, शिखरांवर, दाराबाहेर मिळून सुमारे आठशे विविध मूर्त्या होत्या, असं सांगितलं जातं. दुर्दैवानं अडीचशे वर्षांपूर्वी एका पावसाळ्यात अचानक या संकुलावर वीज कोसळून अनेक मंदिरांचं नुकसान झालं. काही मंदिरं धाराशायी पडली, तर काहींची आंशिक पडझड झाली. अनेक मूर्त्या विद्रूप झाल्या. मुख्य मंदिरासह थोडीफार मंदिरं थोडक्यात बचावली. आता पुरातत्त्व खात्यानं दुरुस्तीसह नूतनीकरणाचंही काम हाती घेतलं आहे.‌ परिणामी अर्ध्यापेक्षा जास्त भागात जाऊच दिलं जात नाही. वैनगंगेच्या अगदी तीरावर असलेल्या बाजूकडील थोडा भागच पाहता येतो. तरीही लोक रोज श्रद्धेनं गर्दी करतातच.

एकूण, पुरातन शिल्पकलेचा खजिना घेऊन मार्कंडेश्वर मंदिर समूह आहे त्या स्थितीत आजही, अर्धवट का होईना, उभं आहे, हा आपल्यासाठी अभिमानाचाच विषय ठरतो. त्याचं पुनरुज्जीवन लवकरच पूर्ण व्हावं आणि जुनं संपूर्ण वैभव आपल्याला पाहायला मिळावं, अशी प्रार्थना त्या मार्कंडेश्वराकडेच करू या.

"अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्च बिभीषण:। कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: । सप्तैतान् संस्मरेनित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।..." या प्रात:स्मरणातील आठवे (न मानले जाणारे) चिरंजीव महर्षि मार्कंडेय यांच्यावरूनच या मंदिराला मार्कंडेश्वर हे नाव पडलं. अठरा पुराणांमधील मार्कंडेय पुराण त्यांनीच लिहिलं आहे. मूळचे हरयाणाचे मार्कंडेय ऋषी तपश्चर्येसाठी त्याकाळी दंडकारण्यात वैनगंगे‌च्या तीरी आले होते, असं सांगितलं जातं.‌ त्यांच्यावर वयाच्या सोळाव्या वर्षीच मृत्यूची टांगती तलवार होती.‌ म्हणून भगवान शिवांनी 'कालांतक' अवतार घेऊन त्यांना यमराजापासून वाचवलं आणि अमर केलं, अशी कथा आहे. तो कालांतक म्हणजेच चार-चार हातापायांचा शिव होय.

✍️ विनोद देशमुख✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.