खलबत्ता:-विनोद देशमुख, घराणेशाहीची पायाभरणी.

खलबत्ता:-विनोद देशमुख.


 घराणेशाहीची पायाभरणी

पालिका निवडणुकीच्या बातम्या पेपरात वाचून आलेले पोट्टे आज तावातच होते. शाळेत आल्याआल्या त्यांना दिसले मराठीचे सोमलवार सर. बंड्या, चंद्या, नंद्या, पम्या या चौघांनीही व्हरांड्यातच गुरुजींना जवळजवळ घेराव घातला अन् एकसुरात विचारलं- "घराणेशाही म्हणजे काय असतं गुरुजी ?"

अरे हो, हो म्हणत गुरुजींनी मुलांना शांत केलं आणि चौघांनाही कोपऱ्यातल्या बाकावर बसवत ते म्हणाले- "आपल्या लोकशाहीत दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. स्थानिक (पंचायत किंवा पालिका), विधानसभा आणि लोकसभा अशा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये जेव्हा एकाच कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिली जाते, ते निवडून आल्यास त्यांनाच पदेही मिळतात, असं सतत घडणं याला म्हणतात घराणेशाही !"

बंड्या : म्हणजे, आमदार-खासदाराच्याच बायकोला, मुलाला, सुनेला, मुलीला, जावयाला, पुतण्याला, भाच्याला किंवा जवळच्या इतर नातेवाईकांना तिकीट मिळणं, असं म्हणा न गुरुजी.

गुरुजी : तू जास्त हुशार आहेस बंड्या. इतक्या लहान वयातही बरोब्बर ओळखलंस. घराणेशाही म्हणजे हाच प्रकार आहे. पण तो फक्त आमदार-खासदारच करतात असं नाही. सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, खासदार, मंत्री असलेले आमदार-खासदार राजकीय पक्षांचे मोठे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील मंडळी यातील बहुतांश नेतेलोक आपापली घराणेशाही पुढे चालविण्याच्या प्रयत्नात असतात. यात अपयशी ठरणाऱ्यांकडे लोक दुर्लक्ष करतात. मात्र, जे यशस्वी होतात त्यांच्या नावानं एकीकडे ठणाणा होतो आणि दुसरीकडे त्यांना डोक्यावरही घेतलं जातं.

नंद्या : हारणारे ठणाणा तर करणारच ना गुरुजी. लोकशाहीत काही लोक आपली जहागिरदारी चालवत असतील तर कोण ऐकून घेईल हो.

मध्येच पम्यानं तोंड मारलं- जहागिरदारी तर आहेच बावा त्याइची. माहा आजा सांगत होता का काल अर्ज भरलेल्या ताईचा आजेसासरा आपल्या गावचा पहिला नगराध्यक्ष होता. मंग त्याचा पोरगा झाला. अवंदा बी थ्योच असता. पन शिट झाली महिला राखीव ! तर मोठ्या बावाजीनं सुनेलेच पुढं केलं.

चंद्या : हीच ती घराणेशाही ! आपल्या गटातल्या, पक्षातल्या माणसांना पुढं करायचं सोडून बहुतांश नेते आपल्या नात्यातलंच घोडं (ते कितीही गाढव असलं तरी) पुढं दामटतात आणि एकामागून एक पदं कुटुंबाच्या पदरात पाडून घेतात. ही कसली लोकशाही ? ही तर आप्पलपोटेशाही ! कार्यकर्त्यांच्या भरोशावर स्वत:च्या कुटुंबाची पोळी भाजून घेणाऱ्या अशा नेत्यांमुळेच आज लोकशाही धोक्यातही आली आहे अन् बदनामही झाली आहे.

गुरुजी : आपण फक्त दिल्ली-मुंबईच्या घराणेशाहीची चर्चा करतो, वाचतो, ऐकतो, पाहतो. पण त्याची मुळं रुजवली जातात आपल्या लोकशाही व्यवस्थेच्या तिसऱ्या  आणि सर्वात खालच्या स्तरावर, म्हणजे पंचायत आणि पालिका स्तरावर. घराणेशाहीची रंगीततालिम इथंच सुरू होते आणि इथं मुळं पक्की झाली की पुढे मोठा फायदा देणारे प्रयोग विधानसभा, लोकसभा स्तरावर केले जातात. या चढत्या भाजणीनं घराणेशाही गेली पाऊणशे वर्षे आपल्या देशात सुखानं नांदत आहे, बहरत आहे. तिचा अतिरेकही आपण पाहत आह़ोत.

(उसासा टाकत) मतदारांचं दुर्दैव असं की, आपल्या पक्षीय लोकशाहीतील जवळजवळ सर्वच पक्ष घराणेशाहीच्या या आजारानं ग्रस्त आहेत कोणी तीनही स्तरांवर, कोणी दोन, तर कोणी एकाच- थेट दिल्लीच्या.

यात लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे आणि सत्तेचा, त्यातून येणाऱ्या पैशाचा माज सर्वत्र जाणवत आहे. याला आणखी एक कारण आहे. स्वत:ला विकायला तयार असलेले मतदार निवडणूक आली रे आली की सौदेबाजी सुरू होते. एका मताचा दर ठरतो. त्याप्रमाणे पैसे/दारू/वस्तू यांचं सर्रास वाटप होतं. यात जो उमेदवार वरचढ ठरतो, तो जिंकतो. 

अर्थात् हे असं सर्वच मतदारसंघांमध्ये घडतंच असं नाही. परंतु बहुतांश ठिकाणी असंच होतं. याला लोकशाही म्हणायचं का, मुलांनो ? याचं मूळ त्या, घराणेशाहीच्या प्रवृत्तीत दडलं आहे आणि घराणेशाहीचं मूळ पालिका-पंचायत निवडणुकीत कुठं आहे खरी लोकशाही, सांगा !

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.