कथा "वंदे मातरम्" च्या जन्माची...
कथा "वंदे मातरम्" च्या जन्माची...
-@विनोद देशमुख
भारताचे राष्ट्रगीत जन गण मन आणि राष्ट्रगान वंदे मातरम् ही दोन्ही गीते बंगाली कलावंतांची देण आहेत, दोन्हीमध्ये संस्कृत-बांगला भाषांचे मिश्रण आढळते आणि दोघांनीही स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली, हा विलक्षण योगायोग आहे. वंदे मातरम् आज दीडशे वर्षाचे झाले, तर जन गण मन लाही ११४ वर्षे झाली आहेत.
यातही वंदे मातरम् ची कहाणी थरारक आहे. ब्रिटिश सरकारविरुद्ध संन्याशांनी केलेल्या उठावावर आधारित 'आनंदमठ' कादंबरीचा भाग म्हणून हे गीत समोर आले असले तरी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्याची रचना स्वतंत्रपणे केली आणि नंतर त्याचा समावेश कादंबरीत करण्यात आला. संन्याशांचा उठाव आणि १८५७ चे पहिले स्वातंत्र्ययुद्ध यांचा बंकिमचंद्रांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, ७ नोव्हेंबर १८७५ यादिवशी एकाच बैठकीत त्यांनी हे ५ कडव्यांचे गीत लिहून काढले. पुढे १८८२ साली 'आनंदमठ' कादंबरीतून ते प्रकाशित करण्यात आले.
मात्र त्याआधीच, गीतरचनेनंतर लगेच बंकिमचंद्रांच्या सूचनेवरून संगीतकार यदुनाथ भट्टाचार्य यांनी वंदे मातरम् ला चाल लावली आणि हे गीत बंगबांधवांच्या तोंडी बसू लागले होते. परंतु त्याचे पहिले अधिकृत जाहीर गायन मात्र जन गण मन चे निर्माते गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर यांनी स्वत: १८९६ च्या कोलकाता काँग्रेस अधिवेशनात करून हे गीत चालीसह सार्वजनिक केले. त्यानंतरचे अर्धशतक हे या गीताचेच होते ! स्वातंत्र्य आंदोलनाला स्फूर्ती देणारा मंत्र, अशी त्याची ख्याती झाली. काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनात आणि अधिवेशनात या मंत्राचा आवर्जून उच्चार होऊ लागला. एवढेच काय, फाशी जाणारा प्रत्येक क्रांतिकारक "वंदे मातरम" म्हणतच फासावर जाऊ लागला. या दोन शब्दांना त्याकाळी विलक्षण शक्ती प्राप्त झाली होती.
असे असूनही काँग्रेसला १९३७ च्या फैजपूर अधिवेशनात या गीताच्या पहिल्या दोनच कडव्यांना 'राष्ट्रगान' असा दर्जा देणारा ठराव करावा लागला. कारण, हे गीत संकृत भाषेतील हिंदूंचे धार्मिक गीत आहे, त्यात देवीदेवतांचे गुणगान आहे, असे सांगत काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी (मूर्तिपूजेच्या नावाखाली) विरोध केल्यामुळे हे घडले आणि "वंदे मातरम्" स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यापासूनही वंचित राहिले. (योगी अरविंद या गीताला "बंगालचे राष्ट्रगीत" म्हणाले होते.) वास्तविक, "वंदे मातरम्" च्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये देवीदेवता नव्हे, तर माता, मातृभूमी यांचे संदर्भ आहेत. नंतरच्या ३ कडव्यांमध्ये मात्र दुर्गा देवीची स्तुती आहे. शेवटी, स्वातंत्र्यलढ्यात फूट पडू नये म्हणून काँग्रेसने दोनच कडव्यांचे 'राष्ट्रगान' म्हणून या गीताला स्वीकारले. तरीही शेवटी याच धार्मिक कारणावरून झालेले देशाचे विभाजन टळू शकले नाही, हेही ऐतिहासिक सत्य आहे.
राष्ट्रगीताचा मान रवीन्द्रनाथ ठाकुरांच्या "जन गण मन" ला मिळाला. परंतु तेही गीत "भारत भाग्य विधाता" या शब्दांवरून नाकारण्याचा खुटीउपाड प्रयत्न काही बंगाली विद्वानांनी करून पाहिला. हे भारत भाग्य विधाता ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज हे असून, त्यांचेच गुणगान रवीन्द्रनाथांनी केले आहे, असा आरोपवजा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरून वाद झाले. मात्र, रवीन्द्रनाथांनी समर्थपणे हे खोडून काढल्यानंतरच वादळ शमले आणि "जन गण मन" भारताचे राष्ट्रगीत म्हणून गेली पाऊणशे वर्षे प्रतिष्ठित झाले आहे.
"वंदे मातरम्" चे सर्वात मौठे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे रचयिता बंकिमचंद्र हे ब्रिटिशांचे नोकर होते ! कोलकाता विद्यापीठाच्या प्रारंभीच्या काळातच ते पदवीधर झाले आणि नोकरीला लागले. सुरुवातीला उपजिल्हाधिकारी आणि नंतर उपन्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते. परंतु, संन्याशांचा उठाव आणि १८५७ चे पहिले स्वातंत्र्ययुद्ध या दोन घटनांनी त्यांचे मन विचलित झाले होते. त्यात एक भर पडली. ती म्हणजे, "God Save the King" हे इंग्लंडचे राष्ट्रगीत भारतातही राष्ट्रगीत म्हणूनच रुजू करण्याचे प्रयत्न ब्रिटिश प्रशासनाने चालविले होते. या तीनही घटनांच्या संतापातूनच त्यांनी 'आनंदमठ' कादंबरी लिहिली आणि "वंदे मातरम्" ही रचले. ब्रिटिशांच्या सेवेत असताना !! शेवटी कारावासाची धमकी देत ब्रिटिशांनी या दोन्ही कलाकृतींवर बंदी घातली आणि बंकिमचंद्रांना नोकरी सोडायला भाग पाडले. ही बंदी स्वातंत्र्य मिळाल्यावरच १९४७ साली उठली. पण तोवर "वंदे मातरम्" या मंत्राने अर्धशतकभर भारतीयांच्या मनावर गारूड केले होते😀
मूळ गीत आणि गेय मराठी रूपांतर
------------------------------
वन्दे मातरम्
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
शस्यश्यामलाम् मातरम्।
*वंदितो आईला*
*वंदितो आईला*
*सुजळा सुफळा चंदनगंध-शीतळा*
*बहुधान्य-सावळ्या ,आईला l*
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
*शुभ्र चांदणे पुलकित रजनीस*
*प्रफुल्ल कुसुमे वृक्षदल शोभिनीस*
*सुहासिनीस , सुमधुरभाषिणीस*
*सुखदा वरदा आईला ॥ १ ॥*
*वंदितो आईला l*
कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।
*(हे )कोटिकोटि कंठांनी घनगर्जीत घोष विक्राळे !*
*(हे )कोटिकोटि भुजांनी धरल्या तीक्ष्ण तलवारे !*
*अबला कशी ? ना.., ह्या बळे l*
*बहुबळधारिणी नमितो तारिणी*
*शत्रुदळवारिणी आईला ll२ll*
*वंदितो आईला l*
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।
*तूच विद्या, तूचि धर्म*
*तूच हृदयी, तूचि मर्म*
*तूच प्राण शरीरी*
*बाहूत तूचि मम शक्ति,*
*हृदयात तूचि मम भक्ति,*
*तुझीच मूर्ती उभी (मन)मंदिरमंदिरा ॥ ३ ॥*
*आईला , वंदितो आईला l*
त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।
*तूच दुर्गा ,दश-प्रहरास्त्र-धारिणी*
*कमळा , कमळदळ-विहारिणी*
*वाणी , विद्यादायिनी*
*नमन तुला, नमितो कमळा*
*अमळा अतुळा सुजळा सुफळा* *आईला ॥ ४ ॥*
*वंदितो आईला l*
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ।
*सावळ्या सरला सुस्मिता भूषितेला*
*धरणी भरणी आईला ॥ ५ ॥*
*वंदितो आईला l*
अनुवाद : नारायण विलास देशपांडे
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment