मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळाची मान्यता.
मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळाची मान्यता.
दीपक देशपांडे
चंद्रपूर जिल्हयातील मूल येथे पदविका अभियांत्रीकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत मूल येथील जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रीक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मूल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नविन पदविका अभियांत्रीकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून नविन शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याकरिता टप्पाटप्पयाने ३९ शिक्षकीय व ४२ शिक्षकेतर कर्मचारी पदे मंजूर करण्यात आली आहे. मूल येथे नविन शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याकरिता टप्पाटप्प्याने होणारा आवर्ती खर्च रू.२२६९.५८ लक्ष व अनावर्ती खर्च रू.१५१२१.५ लक्ष अशा एकूण रू.१७३९१.८ लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंत्रीमंडळासमोर सादर केला. या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाने आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.
मूल येथे सुरजागड इस्पात प्रा.लि. ही कंपनी लोहनिर्मीती कारखाना उभारणार आहे. तसेच बरीच औद्योगिक संस्थाने त्यांच्या कारखान्याची उभारणी करणार आहेत. खनिकर्म, ऑटोमेशन, दुध संचार, बांधकाम, विज निर्मीती, लोह निर्मीती इत्यादी क्षेत्रामध्ये मोठा औद्योगिक विस्तार लक्षात घेता मूल येथील शासकीय तंत्रनिकेतन महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मूल येथे खाणकाम व्यवसाय व त्या आधारीत उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत यासाठी कुशल मनुष्यबळ व स्थानिक युवकांना रोजगारासाठी तांत्रीक शिक्षण देण्याच्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर रेटली. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सतत बैठकी घेवून या विषयाचा पाठपुरावा त्यांनी केला. फलस्वरूप मूल येथे पदविका अभियांत्रीकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य सचिव राजेशकुमार मिना, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव आदींचे आभार व्यक्त केले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment