राम'व्यथा' २.✍️विनोद देशमुख 'बंदिवान' रामलला देखवेना डोळा...

 राम'व्यथा' २.✍️विनोद देशमुख

'बंदिवान' रामलला 

देखवेना डोळा...

🚩आजपासून ४० वर्षांपूर्वी, १९८४ साली अयोध्येत जाऊन बाबरी मशिदीच्या मधल्या घुमटाखाली 'बंदिवासा'त असलेल्या रामललाचं (बाल विग्रह मूर्ती) दर्शन घेतलं, तेव्हा आमचे डोळे आपोआपच पाणवले😭 आमचे म्हणजे, तरुण भारतातील माझे ज्येष्ठ सहकारी (स्व.) राजाभाऊ पोफळी आणि वृत्त छायाचित्रकार (स्व.) जयंतराव हरकरे अशा तिघांचेही.  आपल्या आराध्य दैवताची ही स्थिती पाहून आम्ही अश्रू आवरू शकलो नाही. १९४९ पासून आजपर्यंत किती लाख/कोटी रामभक्तांचे अश्रू असेच वाहिले असतील, या कल्पनेनं मन शहारलं. परंतु, लगेच आम्ही स्वत:ला सावरलंही. कारण, आम्ही होतो  कर्तव्यावर ! आणि, कर्तव्य होतं- कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या बाबरी मशीद परिसराची रामललासह छायाचित्रं काढणं आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करणं. हे होतं संघाचं "मिशन अयोध्या"😷

हो. संघाच्या योजनेतूनच आम्ही अयोध्येला गेलो होतो. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रमुख तीन शिलेदारांपैकी एक (स्व.) मोरोपंत पिंगळे यांनी आम्हा तिघांवर हे मिशन सोपवलं होतं. भारतीय श्रमिक पत्रकार संघाचं (IFWJ) राष्ट्रीय अधिवेशन अयोध्येचा तेव्हा जिल्हा असलेल्या फैजाबाद (आता अयोध्या जिल्हा) येथे २३ ते २६ जून १९८४ याकाळात होणार, हे कळल्यावर मोरोपंतांनी ही मोहीम आखली असावी. त्यांनी आम्हाला बोलावून सांगितलं- " देशभरातील जास्तीत जास्त पत्रकार बाबरी ढाचा पाहतील, असा प्रयत्न करा. बाळू (म्हणजे हरकरे) तू 'बंदिस्त' रामललाचं छायाचित्र जमव !" 

नागपूर श्रमिक पत्रकार संघ (NUWJ) ही शाखा तेव्हा देशात प्रबळ होती. त्यामुळे आमचे राष्ट्रीय नेते आणि महासंघाचे सरचिटणीस (स्व.) मनोहरराव अंधारे यांच्यासह नागपूरहून अनेक पत्रकार अयोध्येला आले होते. अधिवेशनाच्या कार्यवाहीत आम्ही तिघे इतरांसोबत सहभागी होत होतोच. पण आमचं सारं लक्ष लागलं होतं बाबरी मशिदीवर. आमचं मिशन पूर्ण करण्याला पत्रकार महासंघाची अप्रत्यक्ष मदतच झाली. कारण, महासंघाचे अध्यक्ष (स्व.) के. विक्रम राव (टाइम्स ऑफ इंडिया) यांच्याशी मनोहरराव अंधारे यांची घनिष्ठ मैत्री होती. अधिवेशनासाठी भारतभरातून आलेल्या सर्वच पत्रकारांना वादग्रस्त श्रीरामजन्मभूमी दाखवा, असा आग्रह आम्ही अंधारे यांच्यामार्फत राव यांच्यापर्यंत आधीच पोहोचवला होता. त्यांनी एक बैठकच अयोध्येच्या हनुमान गढी भागात ठेवली आणि बसेसद्वारे इच्छुक पत्रकारांना फैजाबादहून अयोध्येला नेलं. त्यामुळे बाबरी मशीद पाहणं सोपं झालं; तसंच इतर राज्यांमधील पत्रकारांनाही बंदिवासातील रामललाचं दर्शन घडलं.

बाबरी परिसराला त्यावेळी बंदूकधारी जवानांच्या छावणीचं स्वरूप आलं होतं. सर्वत्र बॅरिकेड्स लागलेले. श्रीरामजन्मभूमी हा आधीच संवेदनाशील विषय. त्यात इंदिरा गांधीनी अमृतसरच्या स्वर्णमंदिरात "ऑपरेशन ब्ल्यू स्टार" ही कारवाई नुकतीच (३ ते ६ जून १९८४) केल्यानं वातावरण तंग होतं. कडक तपासणीनंतरच बाबरी परिसरात प्रवेश दिला जायचा. या स्थितीत हरकरेंचा कॅमेरा आत न्यायचा कसा, हा आमच्यासमोर यक्ष प्रश्न होता आणि आम्ही तिघंही चिंतित झालो होतो. आत शिरल्याशिवाय छायाचित्रं मिळणार नाही आणि बाहेरचे जवान कॅमेरा क्लिक करू देणार नाही. धर्मसंकटच ! येथे कामी आलं माझं तंबाखूचं व्यसन.

पुढच्या भागात : हरकरेंची कमाल !

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.