राम'व्यथा' १ ✍️विनोद देशमुख.
अयोध्यापती श्रीरामाच्या जन्मभूमी मंदिरावर ४९६ वर्षांपर्यंत गुदरलेल्या बिकट प्रसंगांची कर्मकहाणी सांगणारी नवीन लेखमाला- रामकथा नव्हे, राम'व्यथा'च.
राम'व्यथा' १ ✍️विनोद देशमुख
अयोध्येचे रामलला
४५३ वर्षे वनवासात.🚩परवाच्या मंगळवारी, २५ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, शके १९४७, राम-जानकी विवाह तिथी या दिवशी अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील नवनिर्मित राममंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक धर्मध्वजारोहण करून ४९६ वर्षांचा काळा इतिहास अंतिमत: पुसण्यात आला आणि श्रीरामाचा वनवास एकदाचा संपला ! पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात मोदीजी गहिवरले आणि त्यांचे जोडलेले हात काही सेकंद थरथरले, हे दृश्य थेट प्रक्षेपणात साऱ्या देशाने पाहिले.
तथापि, सनातन हिंदू समाजाच्या प्रत्येक गोष्टीत खुसपट काढणाऱ्या मंडळींना या सोहळ्याने पुन्हा पोटशूळ उठणे स्वाभाविक होते. या समारंभावर एक प्रतिक्रिया अशी आली- "आधी देशातील अस्तित्वात असलेल्या राम मंदिरांची दुरुस्ती करा, मग अयोध्येच्या गप्पा करा !" यातील दुरुस्तीचा सल्ला चुकीचा आहे, असे कोणीच म्हणणार नाही. फक्त रामच कशाला, इतरही देवदेवतांच्या अनेक मंदिरांचे व्यवस्थापन खूप चांगले चालले आहे, असा दावा कोणीच करणार नाही. इथेच हिंदू समाज, इतरांच्या तुलनेत कमी पडतो आणि त्याला जागे करण्याचे प्रयत्नही वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहेत.
परंतु, देशभरातील राममंदिरे वेगळी अन् अयोध्येचे राम जन्मभूमी मंदिर वेगळे आणि विशेष. भारतवर्षाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाचे जन्मस्थान या जागी असल्याची मान्यता असल्यामुळेच हे मंदिर आक्रमकांचे विशेष 'लक्ष्य' राहिले, याला इतिहास साक्षी आहे. हे मंदिर पाडून त्याजागी उभारलेल्या मशिदीला सुद्धा प्रारंभीच्या काळात "मस्जिद-ए-जन्मस्थान" असे तेच लोक म्हणायचे. (मंदिर पाडून तेथे मशीद बांधल्याचा पहिला ठोस पुरावा !) बाबरी मशीद असे तिचे नामकरण नंतर करण्यात आले. कारण, बाबराच्या आदेशानेच मंदिर तोफगोळ्यांनी उडवून देण्यात आले होते. मंदिर ध्वस्त करणे, तेथे मशीद उभारणे, जागेच्या ताब्यासाठी दोन्ही गटात झालेल्या पाऊणशेवर लढाया, त्यात मारले गेलेले लाखो लोक, दीर्घकाळ चाललेले न्यायालयीन खटले, अधिकृत सरकारी संस्थेने केलेले उत्खनन, जनजागरण आणि आंदोलन, त्यातून बाबरीचा विध्वंस आणि शेवटी न्यायालयाच्या निर्णयानुसार जागेचे हस्तांतरण या सर्व घटना त्या स्थानाच्या अनन्यसाधारण महत्त्वामुळेच घडल्या ना ! श्रीराम स्वत: फक्त १४ वर्षेच वनवासात होते. परंतु त्यांच्या मूर्तीला मात्र साडेचारशे वर्षांचा वनवास (मूळ मंदिराच्या गर्भगृहाबाहेर) घडला आणि ४३ वर्षांचा बंदिवासही सोसावा लागला १९४९ ते १९९२ ही ४३ वर्षे मशिदीच्या मधल्या घुमटाखाली रामललाची मूर्ती कुलूपबंद होती आणि दरवाजाबाहेरूनच तिचे दर्शन घ्यावे लागत होते ! हे दृश्य मी माझ्या दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांसह स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले आहे. तेव्हा आम्हाला आणि ४३ वर्षे याच पद्धतीने दर्शन घेणाऱ्या लाखो-कोटी रामभक्तांना काय वाटले असेल, याची कल्पना करा. त्या बंदिवासाची कथा अन् व्यथा पुढच्या भागात...
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment