खलबत्ता:-विनोद देशमुख,उसे नेता मत बनाओ म्याडम्
खलबत्ता:-विनोद देशमुख.
उसे नेता मत बनाओ म्याडम्
आज पोट्टे शाळेत येण्याच्या बराच वेळ आधी चारपाच गुरुजी लोक आले होते. शनिवारची सकाळ. चहा पिता पिता चर्चा सुरू झाली. विषय अर्थातच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल.
पाटील गुरुजी म्हणाले- कालचा निकाल पाहिला का तुम्ही लोकांनी ? कॉंग्रेसचा तर सुपडाच साफ झाला राजेहो. इंडी आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या लालू यादवचा पक्ष राजद थोडक्यात वाचला, नाहीतर विरोधी पक्षनेतेपदही गेलं असतं तेजस्वीचं ! बाल बाल बच गए बेटा.
जगनाडे : सर, ही सारी कमाल पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या घट्ट युतीची आहे. नितीशला तुम्ही कितीही 'पलटूराम' म्हणा. या माणसानं लालूचा तख्ता पलटवून दाखवला आणि बिहारमधील जंगलराज संपवलं.
यादव : मुझे तो दालमें कुछ काला लगता है ! वोटचोरीका खुलासा ठीक ढंगसे नही किया गया। और एनडीएको इतनी सीटे ? चुनावमें जरूर गडबडी लगती है। वोटर लिस्टसे वोटिंग तक सब चीजकी फिरसे जांच होनी चाहिए !
वानकर : ओ यादवभय्या, कायले ताव खाता येवढा गतवर्षीच्या हरयाणा आन् महाराष्ट्र निकालातबी तुमचे महाआघाडीवाले हारले व्हतेच. पन, थेच करनाटक आन् तेलंगनात तुमचं ज्यमलं त तुमचं तोंड बंद ! तेथं तुमाले ईव्हीएम, व्होटचोरी न्हाई दिसली. हारले का ईव्हीएम, मतचोरी म्हनाचं आन् जिंकले का बोलाचंच न्हाई.. असं काऊन ?
यादव : ऐसा नही है वानकरजी। हमारे नेताओंने कर्नाटकमें हुई धांदलीका भी पर्दाफाश किया है। ज्यादा वोटोंका मामला वहां पर भी उठाया हमारे राहुल गांधीजीने।
जगनाडे : कर्नाटकात तर तुमचंच राज्य आहे ना यादवजी. शोधून काढा मग आणि वेशीवर टांगा मतघोटाळा. कोणी रोखलं तुम्हाला ?
पाटील : यांचा नेता काहीबाही बोलत सुटतो. प्रत्यक्षात करत काही नाही ! प्रेस काॅन्फरन्समध्येही नीट बोलत नाही. आपल्या राजुऱ्याचंच पाहा ना. एकदा म्हणतो- मतदार खूप वाढले. मग म्हणतो- मतदार बाद केले. एक काहीतरी बोल न राजा.
तेवढ्यात प्रवेशले सोमलवार गुरुजी. पाटलांचं बोलणं येतायेता ऐकून ते म्हणाले- "अहो, कायचा यांचा नेता ? त्याला राजकारण धड समजत नाही. पक्षातले अनेकजण कंटाळले आहेत. पण, स्वत:चं पद जाण्याच्या भीतीनं बोलताही येत नाही.
जगनाडे : कॉंग्रेसचा एक बंदा मात्र बोलला होता गुरुजी. तेही 11-12 वर्षांपूर्वी ! त्याचं नाव गुफरान आझम. आपल्या जवळच्या बैतुलचा खासदार, नंतर राज्यसभा सदस्य. संजय गांधीनं जवळ केलेल्या युवानेत्यांपैकी एक. त्यानं तर थेट सोनिया गांधीलाच सुनावलं राहुलबद्दल.
वानकर : काय म्हन्ले हे आझमभाऊ ?
(हस्तक्षेप करीत) पाटील : पहिले त्यानं सोनिया गांधीला एक पत्र पाठवलं- " पिछले दस सालसे (2004 ते 2014) हम देख रहे है ! राहुल गांधी नेता नही बन सकते ! आप उन्हे डॉक्टर बनाइए, एंजिनियर या वकील बनाइए, और कुछ बनाइए। कुछभी बनाइए, पर नेता मत बनाइए। वो नेता नही बन सकते।" नंतर टीव्हीवाल्यांना मुलाखती देऊन हेच पुन्हा पुन्हा सांगितलं.
सोमलवार : मग, काय म्हणाल्या सोनिया गांधी ? संतापल्या असतील ना खूप...
पाटील : नुसत्या रागावल्याच नाहीत. तर, गुफरान आझमला काँग्रेसमधूनच काढून टाकलं ! अशी 'गुस्ताखी' कोणती आई सहन करील हो !!
जगनाडे : पण, गुफरान आझमही पक्का वस्ताद ! तो उठला अन् गेला भाजपात. भाजपानं त्याला मध्यप्रदेश वक्फ बोर्डाचं अध्यक्ष बनवलं. पुढे गुफरानचं निधन झालं. पण, त्याच्या म्हणण्याचा प्रत्यय आज 11-12 वर्षानंतरही येतच आहे. राहुलबाबाच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष एकामागून एक पराभव पचवत आहे. ताजा बिहारचा..
वानकर : कितवा Shot असन हा युवराजाचा ?
जगनाडे : सेंचुरी झाली असेल.
यावर यादवसह सारे हसले अन् आपापल्या वर्गाकडे चालू लागले... यादव मात्र खिन्न बसून राहिले अन् दूरवर अन्सारी सरही उदास.
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment