खलबत्ता:-विनोद देशमुख,अन्नदाता दु:खी भव"
खलबत्ता:-विनोद देशमुख.
"अन्नदाता दु:खी भव"
--साठ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द करून त्यांच्या जागी सुटसुटीत कृषी कायदे आणण्याचा चंग बांधूनच नरेन्द्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले. शरद जोशी आणि डॉ. स्वामीनाथन यांचे पडून असलेले अहवाल नीती आयोगाला सोपवून त्यांनी नव्या कृषी कायद्यांच्या दृष्टीने आयोगाकडून शिफारशी मागवल्या. नीती आयोगानं ५ वर्षे सखोल अभ्यास करून पंतप्रधानांना अहवाल सादर केला. त्याआधारे २०२० मध्ये ३ नवे कृषी कायदे तयार झाले, संसदेत पारित झाले, राष्ट्रपतींची मान्यताही मिळाली. परंतु, पंजाब-हरयाणाचे बडे शेतकरी विरोधात उभे राहिले, त्यांनी दिल्लीच्या सीमेवर सव्वा वर्ष आंदोलन केलं, विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली, यात हिंसाचार झाला आणि शेवटी नाईलाज म्हणून मोदींनी तीनही कायदे मागे घेतले. (राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही कायदे लागू न होण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग असेल.) विरोधकांना हा मोदींचा पराभव वाटतो, तर सत्ताधारी मात्र संधीच्या शोधात असल्याचं सांगितलं जातं.
हे विचार डोक्यात घोळवतच पाटील गुरुजी शाळेत पोहोचले. त्यांच्याच मागे ते नेहमीचे चार विद्यार्थीही आले आणि पाच जणांची मैफिल सुरू झाली...
गुरुजी : कृषी सुधारणा कायद्यांवरून देशात केवढं मोठं महाभारत घडलं, हे तुम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना माहीत आहे का ? याचं कारण तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल का ?
चारही पोट्टे (ओरडत) : नाही सर ! आम्हाला तर यातलं काहीच समजत नाही. कायदे झाले, पण लागू झाले नाही, हे अजबच ऐकलं.
गुरुजी : मी सांगतो कारण तुम्हाला. अरे पोरांनो, यामागे कारण आहे, ते म्हणजे राजकारण. तेही घाणेरडं ! पंजाबमधील हितसंबंधी बड्या शेतकऱ्यांनी या कायद्यांना विरोध केला, संधिसाधू विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आणि या सर्वांनी मिळून राजधानीच्या सीमेवर तब्बल सव्वा वर्ष उपोषणादी आंदोलन घडवून आणलं. ४० हजारांवर लोक दिल्लीवर ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली चालून गेले. याकाळात सहाशेवर शेतकऱ्यांचा बळी गेला, तर गोंधळाचा फटका बसून अनेक मालमत्तांचं नुकसान झालं.
याचा अर्थ कळला का तुम्हाला ? नवीन कायदे अंमलात आले असते तर सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात हळूहळू चांगला बदल व्हायला सुरुवात झाली असती. ती प्रक्रिया सुरूच होऊ नये यासाठी हे सारं केलं गेलं आणि, याला जबाबदार आहेत काँग्रेससह डावे, समाजवादी वगैरे विरोधी पक्षांचे टोळके. हेच आपल्या शेतकऱ्यांचे खरे शत्रू आहेत, हे नीट समजून घ्या.
बंड्या : ते कसं काय गुरुजी ?
गुरुजी : मुलांनो, जोशी किंवा स्वामीनाथन यांचे अहवाल ही काही आजची गोष्ट नाही. शरद जोशी कार्यदलाचा राष्ट्रीय कृषिनीती अहवाल १९९२ मध्ये सादर झाला, तर डॉ. स्वामिनाथन यांचा शेतमाल उत्पादनवाढीसंबंधीचा अहवाल २००७ साली आला. परंतु, पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग या तीन पंतप्रधानांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत दोन्ही अहवालांवर काहीही कार्यवाही झाली नाही. कारणं वेगळी असतील. पण परिणाम एकच झाला- दोन्ही अहवाल आलमारीत धूळ खात बंद.
मुलं (आश्चर्यानं) : काय ? काहीच झालं नाही अहवालांचं इतक्या वर्षात ?
गुरुजी : नाही. काही म्हणजे काहीच नाही. या २० पैकी नंतरची १० वर्षे तर आपले, शेतकऱ्यांचे तथाकथित कैवारी शरद पवारच देशाचे कृषिमंत्री होते आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते. पण या दोघांनीही शेतकऱ्यांची मूळ समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी फक्त मलमपट्ट्या करण्यावरच भर दिला.
चंद्या : आमच्या मायबापांची मूळ समस्या कोणती आहे गुरुजी ?
गुरुजी : ती आहे उत्पन्नाची अन् भावाची. शेतमाल पिकविण्याचा खर्च आणि त्याला मिळणारी किंमत यांचं गणित आपल्याकडे जमतच नाही अन् शेतकरी कायम कर्जबाजारी राहतो. शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच हे दुष्टचक्र थांबू शकतं. ते करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा तात्पुरता उपाय करणं म्हणजे रुग्णाला थोडासा दिलासा, पण दुखणं कायम.
पम्या : शेतमालाले रास्त हमीभाव तर सर्वात आधी शेतकरी संघटनावाले शरद जोशी सायबानंच मांगितला, असं माहा बाप सांगे...
पम्याला मध्येच थांबवत गुरुजी म्हणाले- तेच शरद जोशींनी आपल्या अहवालातही सुचवलं आहे. पण ते अजून लागूच झालं नाही. (सरकारी हमीभाव आजही पुरेसा मिळत नाही.) मोदी सरकारनं केलेल्या ३ कायद्यांमुळे त्या शिफारशींचा शेतकऱ्यांना लाभ होण्याचा मार्ग मोकळा झाला असता अन् त्यांच्या जीवनात फरक पडायला सुरुवात झाली असती. नेमकं तेच घडू नये या कटात सहभागी झाले आपले विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरला गेला. ते मोदी-भाजपाचे राजकीय विरोधक असोत; पण आपल्या अन्नदात्याचेही विरोधक आहेत की काय, अशी शंका यामुळे येऊ लागली आहे.
"त्या ३ कायद्यांबद्दल पुढे सांगीन कधीतरी," असं म्हणत गुरुजी टीचर रूमकडे चालू लागले...
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment