राम'व्यथा' ३.✍️विनोद देशमुख 'तंबाखूची धमाल, हरकरेंची कमाल
राम'व्यथा' ३.✍️विनोद देशमुख
'तंबाखूची धमाल,
🚩 बाबरी मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आम्ही तिघेही (म्हणजे राजाभाऊ पोफळी, जयंतराव हरकरे आणि मी) घुटमळत होतो आणि संधीची वाट पाहत होतो. तेवढ्यात
माझं सहज लक्ष गेलं- डाव्या घुमटालगत मागून असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर पहारा देणारा एकमेव जवान तंबाखू चोळत बसला आहे. (तिकडचे लोक याला खैनी म्हणतात.) आमच्या तिघांमध्ये एकटा मीच तंबाखू खाणारा ! माझ्या डोक्यात कल्पना चमकली- या जवानालाच आपण भुरळ घातली तर क्षणाचाही विलंब न करता मी त्या जवानाजवळ गेलो आणि खैनी मागून त्याच्याशी गप्पा मारू लागलो. छोटा कॅमेरा पोटापाशी लपवून हरकरे वाटच पाहत होते. गप्पा रंगात येताच मी इशारा केला अन् हरकरे, राजाभाऊ आत जाऊ लागले. जवानानं हटकताच मी म्हणालो- "हमारे साथीदार है !" त्यावर "जाइए सर, पर जल्दी वापस आइए" म्हणत त्यानं ओळखपत्र पाहून, पण झडती न घेताच (हेच आम्हाला हवं होतं ना !) आम्हाला आत सोडलं. खैनी-मैत्री अशी कामी आली. आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. आमच्या सुदैवानं रामललाच्या आरतीची (सकाळी आणि सायंकाळी) वेळ नसल्यानं मधल्या घुमटाखालील गाभाऱ्यासमोर तुरळक लोक होते आणि ३-४ जवान जेवून खाऊन दुपारची झोप घेत होते.
जयंतरावांनी अत्यंत वेगानं हालचाल करीत (हरकरे मुळात सैनिक होते आणि भारतीय नौदलात पाणबुडीवर कार्यरत होते. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संंग्रामाच्या वेळीही त्यांनी बंगालच्या उपसागरात सेवा दिली होती.) दरवाजाला कुलूप लागलेल्या बंदिस्त रामाचे फोटो फटाफट क्लिक केले आणि आम्ही मशिदीच्या उजव्या (मागून डाव्या) बाजूला गेलो. मधल्या आणि उजवीकडील तिसऱ्या घुमटाच्या मध्ये टिनपाटाचे जुनाट बंद दार होते. हा बाबरी मशिदीचा दरवाजा ! या तिसऱ्या घुमटाखालीच एकेकाळी शुक्रवारचा नमाज पढला जायचा. १९४९ पासून तो जवळ्जवळ बंदच होता. मशिदीला वळसा घालत चढावावर जाऊन कोपऱ्यातून, घुमटांवर, भिंतींवर उगवलेली झाडे, पडझड झालेला ढाचा यांची छायाचित्रे हरकरेंनी टिपली आणि कॅमेरा पुन्हा व्यवस्थित लपवून आम्ही घाईघाईनं निघालो, तेव्हा आम्हाला जग जिंकल्याचा आनंद झाला होता.
या आनंदाचे अश्रू एका डोळ्यात अन् रामललाच्या दुरवस्थेचे दु:खाश्रू दुसऱ्या डोळ्यात घेऊनच आम्ही बाहेर पडलो ! १९४९ ते ९२ याकाळात अशा किती रामभक्तांचे अश्रू वाहून गेले असतील, याची आज कल्पनाही करवत नाही .निघताना त्या जवानासोबत पुन्हा खैनी-पान करून त्याचे आभार मानायला मी विसरलो नाही. कारण, त्याचे हे उपकार पुढे डोंगराएवढे मोठे सिद्ध झाले.
बाहेर आल्यावर राजाभाऊंचं लक्ष एका पंडितावर पडलं. तो बाहेरच्या रामचबुतऱ्याजवळ लोकांना राम-कहाणी, संघर्ष आदी गोष्टी रंगवून सांगत होता आणि राममंदिराच्या निर्माणासाठी "अखंड रामायण पाठ" नावाचं आंदोलन सुरू असल्याची आठवण करून देत होता. रामभक्त आणि काही पत्रकारही त्याच्या भोवती गोळा झाले होते. अयोध्येत नेमकं काय सुरू आहे, याचा अदमास राजाभाऊंना त्यावरून आला. आमचं कर्तव्य भविष्यातील मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरेल, याचा मात्र मागमूसही आम्हाला लागला नव्हता.
पुढचा भाग : या मोहिमेच्या परिणामस्वरूप भारतभर पसरली रामललाच्या बंदिवासाची कुवार्ता !
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment