आज कार्तिकी एकादशी
आज कार्तिकी एकादशी
*पवित्र ते कुळ पावन तो देश ।*
*जेथे हरीचे दास जन्म घेती ॥*
*कर्म धर्म त्याचे जाला नारायण ।*
*त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥*
... संत तुकाराम महाराज
आज भागवत एकादशी.. आज तुळशी विवाह प्रारंभ. ही मोठी एकादशी. आज संत नामदेव जयंतीही.
भारतीय भाग्यवान. सगळे सण.. उत्सव हे निसर्ग बदलाशी सकारात्मक सुसंगत असे आहेत. आमच्या संतानी भक्ती मार्ग प्रदान करत दिशा दिलीय.
पुण्य प्राप्तीचा हा कार्तिक मास कार्तिक स्नानाचा. महिनाभर भक्तांचे सूर्योदयापुर्वी ऊर्जा प्रदान करणारे कार्तिक स्नान सुरु आहे. कुठे नदीत तर कुणाचे घरी. मग तुळशी पूजन करीत.. मंदिरात काकडा आरती सुरू आहे. आज तर भक्तांना प्रिय अशी कार्तिकी एकादशी ही विष्णू भक्तांसाठी आनंद पर्वणी.
आज सर्वच तीर्थ क्षेत्रात नदीत स्नान करून भक्त देवदर्शन घेत आहेत. श्री विष्णूची आराधना करत आहेत. पंढरीस पवित्र चंद्रभागेच्या वाळवंटात अंधारात थंडीची पर्वा न करता लाखो भक्तांनी कार्तिक स्नान करुन विठुरायाच्या मंदिरात गर्दी केलीय. गावोगावही कार्तिकी एकादशीच्या काकड आरतीचा लाभ हा भक्तांना जीवन कृतार्थतेचा ठरतो. शेकडो वर्षे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला पंढरपूर यात्रेची परंपरा आहे. गावोगावच्या दिंडी पताकासह पंढरपूरात गर्दी झालीय.
पहाटे विठ्ठल दर्शनास चंद्रभागेच्या वाळवंटापासून ते महाव्दारापर्यन्त फक्त वैष्णवांचीच नाही तर ऋषी.. मुनी.. इंद्रासह सर्व देवदेवता विठ्ठलाच्या दाराशी दर्शनासाठी जमलेत. सामान्य भक्तच नाही तर देवदेवता.. नारद मुनींही नाचत गात केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने पंढरी दुमदुमलीय.
भारतीय संस्कृतीने जगाला धर्माचा.. भक्तीचा खरा अर्थ शिकवला. "मातृदेवो भवः पितृदेव भवः" हे महात्म्य जगाला पटविण्यासाठी श्रीकृष्णानं हा विठ्ठल अवतार घेतला. भक्त पुंडलिकाचे आईवडीलांच्या सेवेचे धर्म कर्म बघून प्रत्यक्ष कृष्णाला पंढरपूरला यावे लागले. या गोष्टीचे कौतुक स्वर्गस्थ देवदेवतानाही वाटले.
काकड आरतीत श्रीकृष्णाच्या भक्तप्रेमाचे.. आईवडीलाविषयीच्या आदर्शाचे.. आदराचे स्मरण विठ्ठल भक्तीत होते. जगातील आईवडीलांचा सन्मान करतो तोच विठ्ठल भक्त. हजारो वर्षे चाललेली ही काकड आरतीची अभिमानास्पद परंपरा.
आज भक्त एकादशीचा उपवास करणार अर्थात श्रीविष्णुच्या.. विठ्ठलाच्या सानिध्यात, भक्तीत रममाण होणार. पूजन.. नाम जप.. तप करणार. गरजूंना दानधर्म करणार. पंढरपूरला जावू न शकणारे भक्त मनाने पंढरपूरातच आहेत. म्हणताहेत.. नाम विठोबाचे घ्यावे मगच जीवनात पुढे पाऊल टाकावे.
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment