मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई जशा दिसल्या तशा
श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांना विद्यापीठाची सर्वोच्च पदवी प्रदान करण्याचे नोटिफिकेशन काल दिनांक ११ नोव्हेंबर रोजी त्यांना प्रदान केले आहे. त्यानिमित्त...
मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई
जशा दिसल्या तशा
गवई परिवारासाठीच नव्हे तर सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी काल दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घडून आली आहे .ती म्हणजे अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मातोश्री मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांना विद्यापीठाची सर्वोच्च पदवी डि.लीट. ही देऊन गौरविण्याचे ठरविले आहे. ताई साहेबांचे वय सध्या ८४ वर्ष आहे .त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री मिलिंद बारहाते प्र. कुलगुरु मा.डॉ. ढोरे परीक्षा नियंत्रक डॉ. नितीन कोळी आणि पीएच.डी. सेलच्या असिस्टंट रजिस्टर डॉ. श्रीमती मालधुरे यांनी स्वतः ताईसाहेबांकडे येऊन या डि.लीट.चे रितसर नोटिफिकेशन त्यांना दिले आहे. एका समर्पित जीवनाला विद्यापीठाने डि.लीट. जाहीर करून स्वतःचाही सन्मान करून घेतला आहे.
गवई परिवारासाठी हे वर्ष खरोखरच भाग्यशाली आहे. याच वर्षात श्री भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. मागील महिन्यात अमरावती विद्यापीठाच्या परिसरात माजी राज्यपाल मा.श्री रा.सू. गवई यांच्या ३५ कोटी रुपयांच्या स्मारकाचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आणि आज ताईसाहेबांना डि.लीट. जाहीर झाली. येणाऱ्या दीक्षांत समारंभात ही डि.लीट. प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून माननीय लेडी गव्हर्नर प्राचार्य
या डॉ.कमलताई गवई या मिशन आयएएसमध्ये सक्रिय सहभागी झाल्या आहेत. खरं म्हणजे त्यांना आमचे हे मिशन आय.ए.एस. आवडलं. रोजच्या पाच स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा आमचा संकल्प आहे. पण कमलताई साहेबांचे असे म्हणणे आहे की यांची संख्या अजून वाढवा .मग आम्ही समाज कल्याणचे वसतीगृह आदिवासी वसतिगृह यामध्ये शाळा सुटल्यानंतर देखील कार्यक्रम घ्यायला लागलो. एवढे कार्यक्रम घेऊनही त्या थकत नाहीत. खरं म्हणजे आज त्यांचे वय ८४ आहे .शिवाय त्यांच्या पायाचे ऑपरेशन देखील झालेले आहे. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नातीच्या लग्नाला त्या मुंबईला गेल्या होत्या. आणि मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरच त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या. ऑपरेशन्स करावे लागले. पण त्यांच्या आत्मविश्वास प्रचंड असल्यामुळे त्या लवकर ठणठणीत झाल्या. आजही वयाच्या मानाने त्या ठणठणीत आहेत. त्यांचे श्रेय मी विपश्यनेला देतो . विपश्यनेच्या त्या वरिष्ठ आचार्य आहेत.त्यांच्या परोपकाराला देतो .त्यांच्या सकारात्मक विचारसरणीला देतो. त्यांच्या मंगल मैत्रीला देतो .
३६५ दिवसांपैकी किमान शंभर दिवस आम्ही ताईसाहेबांबरोबर असतो. कार्यक्रम कुठेही असो सोलापुरला असो की परभणीला . गडचिरोलीला असो की कोल्हापूरला. निमंत्रण आले की ताई नाही म्हणत नाहीत.परवा त्यांना बेंगलोर आणि चेन्नईचे निमंत्रण आले .ते कार्यक्रम चार आणि पाच जुलैला होते आणि मला सहा तारखेला जीवन गौरव पुरस्कार अमरावतीला मिळणार होता .त्यानिमित्त प्राचार्य डॉ. शोभाताई रोकडे यांनी परिवर्तन प्रबोधिनी तर्फे विचार वेध साहित्य संमेलनामध्ये त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रा.गो.चवरे हे होते. प्रा.डॉ.शोभा रोकडे यांनी कमलताईची ही तारीख खूप आधी घेतली होती .
चेन्नईचे निमंत्रण आल्यानंतर चेन्नईवाल्या संयोजकांचे असे मत होते की ताईसाहेब तुम्ही या इकडे येत आहात तर दोन-तीन दिवस राहा .पण त्यांनी चक्क नकार दिला. त्या म्हणाल्या मी ६ जुलै ही तारीख अमरावतीला दिलेली आहे. मी दिलेली तारीख टाळू शकत नाही. आणि त्या धावत पळत विमानाने आमच्या कार्यक्रमासाठी चेन्नई वरून अमरावतीला आल्या .वाटेत बंगलोर विमानतळावर त्या खुर्चीवरून पडल्या. हाताला दुखापत झाली. पण लगेच ड्रेसिंग करून त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली .
ताई मला त्यांचा मानसपुत्र म्हणतात .माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट झाली. आमचा परिचय ५० वर्षे जुना आहे .दादासाहेब गवई यांच्यामुळे तो झाला. पुढे माझी बहीण निर्मला काठोळे त्यांच्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये मराठीची प्राध्यापिका म्हणून रुजू झाली. म्हणजे काय त्यांनीच तिला लावून घेतले .त्यावेळेस आमची परिस्थिती चांगली नव्हती. त्यांना मी शब्द टाकला. आणि त्यांनी तो पाळला .
त्यांनी या ८४ वर्षात जे काम केले आहे त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होऊ शकतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्या सतत काम करीत असतात. आम्ही थकतो. पण त्या थकत नाहीत. त्याला कारण विपश्यना हे आहे. रोज पाच झाडे लावायचा त्यांचा संकल्प आहे. अमरावतीच्या काँग्रेसनगर मधील आपल्या घराच्या डिव्हायडर पासून त्यांनी सुरुवात केली .आज तुम्ही जर काँग्रेसनगरमधील त्यांच्या कमलपुष्प या निवासस्थानी गेले तर तुम्हाला इथून तिथपर्यंत झाडे लावलेली दिसतील. उन्हाळ्यातील या झाडांना जगण्याचे काम कमल ताईंनी केलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे की आपण वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केले नाही तर कोरोना परत यायला वेळ लागणार नाही. त्यापासून बचाव करायचा असेल तर आपण झाडे लावली पाहिजेत .पण या कामाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे
महाराष्ट्रातील इगतपुरीचे विपश्यना केंद्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे गोयंका गुरुजींनी या जगाला एक आगळीवेगळी अमूल्य भेट दिलेली आहे. अमोल ताईंनी या इगतपुरीच्या विपश्यना केंद्राची शाखा अमरावतीच्या छत्री तलाव जवळील भानखेड भागातील मोगरा या गावी केलेली आहे .या विपश्यना केंद्रात बाराही महिने विपश्यनेची वेगवेगळी शिबिरे सुरू असतात. विपश्यना शिबिराला शुल्क नसते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटेल ते दान तुम्ही देऊ शकता .नाही दिले तरी कोणी काही म्हणत नाही. आपल्या विदर्भातील लोकांची देण्याची प्रवृत्ती थोडी नाजूकच आहे. प्रत्येक शिबिरामध्ये तूट येते आणि कमलताई साहेब ही तूट स्वतः भरून काढतात .शिबिराच्या शेवटच्या दिवशी ताई आवर्जून जातात. सर्व पेमेंट करतात. विपश्यना उपक्रमाला त्यांनी जे वाहून घेतले आहे ते शब्दातीत आहे .त्यामुळे त्यांचे आयुष्य दिवसेंदिवस वाढत आहे .त्यांचा उत्साह त्यांची काम करण्याची प्रवृत्ती त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा आत्मविश्वास याही वयात कायम आहे आणि तो कायमही राहणार आहे .
त्यांचे यजमान माजी राज्यपाल श्री दादासाहेब गवई यांना समर्थपणे साथ कमलताईंनी दिली आहे. दादासाहेब राजकारण पाहायचे .आमदार खासदार राज्यपाल अशा विविध पदावर ते कार्यरत होते. पण शैक्षणिक संस्था घरदार नातेवाईक कार्यकर्ते कमलताई सांभाळायच्या .सुरुवातीला परिस्थिती चांगली नव्हती. पण त्याही परिस्थितीत त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे योग्य आदर तिथे केले आहे. आजही त्यांच्याकडे तुम्ही केव्हाही गेले तर ताई जे आदरतिथ्य करतात ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही.
गवई परिवारामध्ये एक चांगला पायंडा ताईने पाडलेला आहे .दादा साहेबाबरोबर किंवा त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांबरोबर सर्वांची तर त्या काळजी घेत होत्या. पण त्यांच्याबरोबर आलेल्या काय चालकाचे देखील आदरतिथ्य झाले की नाही याचीही त्या आवर्जून चौकशी करायच्या. दादा साहेबांबरोबर आलेले पोलीस कर्मचारी जेवले की नाही ते ताई स्वतः पाहत होत्या .नाही तर अनेक लोक प्रतिनिधीकडे पोलिसांच्या वाट्याला उपासमारच येते .ताई जर बाहेर पडल्या आणि त्यांना पाहुण्यांचा कार चालक दिसला तर ताईचा हात पर्स कडे जातो .त्यातून त्या एक नोट काढतात आणि चालकाच्या हातात देतात .
ताईंचा आणि आमच्या दौरा सकाळी साडेसहाला सुरू होतो .त्या वेळेचे तंतोतंत पालन करतात. एक मिनिट पण लेट होत नाहीत .आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो. मी स्पर्धा परीक्षा व आयएएसबद्दल सांगतो. ताई त्यांच्या सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई हे कसे घडले याविषयी प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांना सांगतात . एक शाळा संपली की दुसरी. दुसरी संपली की तिसरी. अशा किमान पाच शाळांना आम्ही रोज भेटी देतो .तिथे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतो .जेवण मात्र कुठेच करीत नाही .त्यांचे म्हणणे आहे की जेवण करण्यात एक तास घालविण्यापेक्षा त्यापेक्षा त्या वेळात एक शाळा जास्त होते .आम्ही उपाशी राहू नये म्हणून त्यांच्या गाडीमध्ये जेवणासाठी अल्पोपहारासाठी आवश्यक ते सर्व साहित्य सदैव असते .
आज त्यांचे सुपुत्र न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश झाले आहेत .दादा साहेबांना तर राजकारणामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. पण ते काम समर्थपणे ताईंनी केले .भूषण सर अमरावतीत सर्वसामान्य महानगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये शिकले. ती शाळा अमरावतीच्या फ्रेजरपुरा या भागातील होती. ते मराठी माध्यमातूनच शिकले .पण त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड लागली. त्यामुळे त्यांनी शालेय जीवनातील स्वतःचे ग्रंथालय तयार केले. त्यांच्यावर त्यांनी योग्य संस्कार केले. त्यामुळे आज भारताच्या एवढ्या मोठ्या उच्च पदावर भूषण सर विराजमान झालेले आहेत. त्यांची विनम्रता त्यांचे आदरतिथ्य
कोमलता त्यांच्या ठिकाणी सातत्याने दिसून येते. त्यामुळे अल्पावधीमध्ये त्यांनी भारतभर लोकप्रियता मिळविली आहे. याचे गुपित म्हणजे कमलताई साहेबांनी भूषण सरांवर केलेले योग्य संस्कार आहेत. म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. या म्हणीप्रमाणे त्यांनी काम केले आहे आणि आज ते समाजासमोर आहे .
त्यांच्याकडे जे पाहुणे येतात त्यांचाआदर करण्याची त्यांची आगळीवेगळी पद्धत आहे. पद्धत अशी आहे की तो माणूस ती आयुष्यभर विसरू शकत नाही. ताईकडे जेव्हा पाहुणे येतात. तेव्हा ताई प्रवेशद्वारापासून तर स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या घरातील स्मारकापर्यंत वाटेवर फुलांच्या गालीचा तयार करून ठेवतात .पाहुण्यांनी जसा प्रवेशद्वारावर प्रवेश केला की त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या उधळण्यात येतात. सुरुवात ताई पासून होते. आणि स्मारकापर्यंत जाईपर्यंत त्यांचे सहकारी ते मग स्त्री असो की पुरुष पाहुण्यांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात. स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर तिथे पाहुणे थांबतात .ताई पाहुण्यांची आरती करतात. आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांना शाल देऊन त्यांचे स्वागत करतात. पाहुणे जर पुरुष असले तर त्यांचे सत्कार करण्याचा मान मला प्राप्त होतो. तत्पूर्वी महात्मा गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या छोटेखानी पुतळ्यासमोर प्रार्थना होते. आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. पाहुणे घरी आल्यावर त्यांच्यासाठी फुलांच्या पाकळ्यांच्या गालीचा तयार करणे त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या उधळणे त्यांना आरतीने ओवळून त्यांचे स्वागत करणे व प्रत्येकाला शाल देणे ही गोष्ट मला वाटते अमरावती शहरात फार कमी ठिकाणी आहे .जवळ जवळ नाहीच आहे .पण ताईने तो एक चांगला पायंडा पाडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला माणूस त्यांना आयुष्यभर विसरत नाही.
ताई आता ८४ वर्षाच्या आहेत. पण त्यांच्या उत्साह अजूनही कायम आहे. सतत कार्यक्रमांना जातात .कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. सर्वांना मंगल मैत्री देतात. वृक्षारोपण वृक्ष संवर्धन विपश्यना याचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करतात आणि एवढे करूनही त्या थकत नाहीत. हे सर्वात महत्त्वाचे .या आईसाहेबांना डि.लीट. मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आय ए एस अमरावती कॅम्प.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment