खलबत्ता:-विनोद देशमुख 'एक्स' म्हणजे 'माजी' ना रे भाऊ...

खलबत्ता:-विनोद देशमुख.

'एक्स' म्हणजे 'माजी' ना रे भाऊ.

नाम्या पेपर वाचत बसला होता. (आजही लोक पेपर वाचतात बरं का😀) एका ठळक मथळ्याकडे त्याचं लक्ष गेलं- "सोशल मीडियावर जादू चालेना". त्याचे डोळे विस्फारले गेले. काय भानगड आहे बा ही, असं म्हणत त्यानं बातमीत डोकं खुपसलं. वाचतो तर काय, ही आपल्या हर्षवर्धन साहेबांची बातमी. काय विचारता ? कोण हर्षवर्धन- इंदापूरचे पाटील, अमरावतीचे देशमुख की बुलढाण्याचे सपकाळ ? नाम्या चंद्रपूरचा. त्यामुळे त्याला रस असणार विदर्भातील हर्षवर्धनमध्येच. अमरावतीचे हर्षवर्धन देशमुख आता सक्रिय राजकारणात जवळजवळ नसल्यानं ते बातमीचा विषय होऊ शकत नाहीत. (कारण, बातमीचा मुख्य स्रोत आजकाल राजकारणच असतं. वाटल्यास संजय राऊतांना विचारा🤔) राहता राहिले बुलढाणेकर हर्षवर्धन सपकाळ. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी आमदार.

तर, बातमी अशी आहे की, सतत गाजत राहणाऱ्या 'एक्स' (पूर्वीचं ट्विटर) या समाजमाध्यमावर सपकाळ यांच्या पोस्ट्सना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे म्हणे ! नाम्याला हेच समजेना की, यात बातमीसारखं काय आहे ? नाही मिळाला तर नाही मिळाला.‌ त्याची एवढी मोठी बातमी चालवायची ? पेपरवाले (म्हणजे पेपर काढणारे, पेपर वाटणारे नव्हे🧐) काहीही का करतात आजकाल ! नाम्या डोकं खाजवत असतानाच बंड्या आणि नंद्या आले. बंड्यानं विचारलं- "काय चाललं नामदेवराव ? फार चिंतेत दिसता !"

नाम्या : (चिडून) आपल्या हर्षवर्धनभाऊचा अपमान कराय लागले हे पेपरवाले ! म्हंत्यात- त्याइच्या एक्स का फेक्स पोस्टले लोकं जास्त मोजत नाही. गल्लीतल्या कार्यकर्त्याईले शेकडो लाईक का बाईक भेटते अन् हा बोवा काँग्रेसचा मुख्य नेता असतानाही त्याईले भेटणाऱ्या लाईक, कमेंट, इम्प्रेशन याईची झाली बोंब ! हे का व्हय् मले त काई समजून नाही राह्यलं, बंड्या.

बंड्या : अबे नाम्या, तुझ्या बसची बात नाही आहे ही ! 'एक्स'ला मोठं महत्त्व आलं आहे आजकाल. ज्याचे फाॅलोअर जास्त, ज्याला लाईक, कमेंट जास्त, ज्याची पोस्ट जास्त लोक रिट्विट करतात तो मोठा ! कारण, त्याचं म्हणणं जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. सपकाळ साहेब याबाबतीत फारच मागे आहेत, असं आढळून आलं. म्हणून बातमी बनवली असल पेपरवाल्यांनी.

नाम्या : म्हणजे ? म्या नाही समजलो ! यात बातमीसारखं का हाये ?

बंड्या : अरे बाबा, कॉंग्रेसमधल्याच अनेक नेत्यांचे फाॅलोअर, लाईक, कमेंट, इम्प्रेशन यांचे आकडे खूपच जास्त आहेत. त्यामानाने सपकाळ यांचे खूपच कमी ! म्हणजे अगदी तीन-चार-पाच-दहा लाईक्स. या काय लाईक झाल्या ! काही पोस्ट्सवर तर एकही लाईक नाही म्हणे !! हा त्यांच्या पोस्ट्सचा 'स्कोअर' पत्रकारांना चिंताजनक वाटतो. यातून त्यांची 'लोकप्रियता' सिद्ध होते, म्हणून😩

नाम्या : म्हंजी सपकाळ साहेबाले मोठ्या आशेनं काँग्रेसनं आणलं, पण त्याईचा फार काही फायदा व्हईल, असं वाटत न्हाय, असं सांग न सरळसरळ.‌

बंड्या : खरं म्हणजे फायदा झाला असता. बाकी कॉंग्रेसनेत्यांच्या मानानं हर्षवर्धनभाऊ स्वच्छ माणूस. पण अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा संघद्वेष उफाळून आलेला दिसतो.‌ मोदी, भाजपा यांच्यापेक्षा संघावर टीका करण्यातच त्यांचा जास्त वेळ जाताना दिसतो ! पक्ष राहिला बाजूला. मविआच्या राजकीय घडामोडीत त्यांचा सहभाग इतर नेत्यांच्या तुलनेत कमीच दिसतो. काही प्रमुख काँग्रेस नेतेही त्यांना भाव देताना दिसत नाही. मग पोस्टला चांगला प्रतिसाद कसा मिळणार ? अन् अशा माणसाचा पक्षाला उपयोग काय ? त्यामुळेच 'एक्स' चे अंकगणित सपकाळांवर उलटू शकते अन् ते स्वत:च "एक्स प्रेसिडेंट" होऊ शकतात बघ !

बंड्याचं प्रवचन ऐकून नंद्या अन् नाम्या जोरात ओरडले- "म्हणजे "एक्स मुळे एक्स" असंच म्हण ना"

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.