शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-३ अशी कशी ‘जात’ नाही ?
शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-३
अशी कशी ‘जात’ नाही ?
🕉️ सारे हिंदू एक, हीच संघाची सुरुवातीपासून भूमिका होती आणि आज शंभर वर्षांनीही आहे. परंतु श्रीगुरुजी धार्मिक प्रवृत्तीचे, काहीसे परंपरावादी असल्याने कधी कधी संभ्रमाचे कोलीत विरोधकांच्या हाती लागायचे आणि सकल हिंदुत्ववादी संघाला जातीयवादी ठरविण्याची संधी त्यांना मिळायची. त्यांच्या काळात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचा संघावर वरचष्मा असल्याचे जाणवतही होते. परंतु संघाच्या डोळ्यांपुढे मात्र सकल हिंदू समाजच होता. हेडगेवारांच्या कारकीर्दीतच वर्धा संघशाखेला भेट देऊन स्वत: महात्मा गांधींनी संघाच्या या जातविहीन रचनेचा अनुभव घेतला आणि कौतुकही केले होते. तरीही संघावरील जातीयवादाचा ठप्पा पुसला जात नव्हता. ते काम श्रीगुरुजींचे उत्तराधिकारी बाळासाहेब देवरस यांनी केले.
श्रीगुरुजींच्याही आधीपासून हेडगेवारांच्या तालमीत तयार झालेल्या बाळसाहेबांना संघाची जातविरोधी मूळ भूमिका माहीत असल्याने त्यांनी त्यासंदर्भात स्पष्ट पवित्रा घेतला. पुण्याच्या प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत बोलताना बाळासाहेबांनी जातिव्यवस्थेचा जाहीर निषेध केला आणि आंतरजातीय रोटीबेटी व्यवहाराचा पुरस्कार केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जातिअंताच्या लढ्याचे दालन संघात अधिकृतपणे उघडले गेले ते याच घोषणेने !
बाळासाहेबांच्या काळात संघात येणार्या ब्राह्मणेतर जातीतील स्वयंसेवकांची आणि प्रचारकांची संख्या लक्षणीय वाढली. सामाजिक समरसतेचा नारा देऊन बाळासाहेबांनी त्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. हिंदू समाजातील सर्व जाती-जमातींच्या एकोप्याचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. स्वयंसेवकांपासून अखिल भारतीय पदाधिकार्यांपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर अनेकानेक जातींचे लोक संघात मोठ्या संख्येत दिसू लागले आहेत.
मुळात संघात जात पाळलीच जात नाही, जातीचा उल्लेखही केला जात नाही. (महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघशाखेला दिलेल्या भेटीत ही गोष्ट स्वत: अनुभवली.) कोणीच कोणाला जात विचारायची नाही, हा संघात अलिखित नियमच आहे आणि गेली शंभर वर्षे तो सर्व स्तरांवर पाळला जात आहे. असे दुसरे संस्थात्मक/संघटनात्मक उदाहरण भारतात क्वचितच सापडेल. संघाचे हे सर्वात मोठे यश आहे. पण, आंधळ्या संघविरोधकांना ते दिसत नाही. खरं म्हणजे पचवता येत नाही !
ऐतिहासिक बदल-------यासंदर्भात बाळासाहेब देवरसांनी सर्वाधिक मोलाची कामगिरी केली. सामाजिक समरसता वाढीस लागण्याच्या दृष्टीने पदाधिकार्यांना, प्रचारकांना, स्वयंसेवकांना त्यांनी पूर्ण मोकळीक दिली. एवढेच नव्हे तर, स्वत:ही आदर्श घालून दिला, तो उत्तराधिकार्याच्या निवडीत ! आधीची परंपरा मोडीत काढत त्यांनी ब्राह्मणेतर व्यक्तीची (रज्जूभय्या) सरसंघचालकपदी नियुक्ती केली. ठाकूर समाजाचे रज्जूभय्या यांनीही संघाचे संचालन समर्थपणे करून एकत्वच सिद्ध केले. सरकार्यवाहांना पदोन्नत करून सरसंघचालकपदी बसवण्याची प्रथाही बाळासाहेबांनी बाजूला सारली आणि सरकार्यवाह हो. वे. शेषाद्री यांच्याऐवजी त्यांचे सहसरकार्यवाह असलेल्या रज्जूभय्यांना थेट सरसंघचालक नेमले. #३
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment