शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-१० ...हिंदीचा प्रचार-प्रसार
शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-१०
...हिंदीचा प्रचार-प्रसार
.🕉️ संघाचे विचार आणि कृती यात सहजता, स्पष्टता, सुसंगतता सातत्याने प्रवाहित होत आहे. आपल्याला काय करायचे आहे, याची स्वच्छ कल्पना आद्यसरसंघचालकांपासून आजपर्यंत कायम आहे आणि सर्व सरसंघचालकांनी आपापल्या पद्धतीने तिचे पालन केले आहे. पुढच्याने आधीच्याला काट देणे, असे अन्यत्र आढळणारे प्रकरणच संघात नाही. उलट, आधीच्या प्रमुखाला पुढे चालवून संघकार्य विस्तारत नेणे, हेच काम प्रत्येक सरसंघचालकाने केले. म्हणून संघ मोठा झाला अन् हिंदुराष्ट्राच्या भौगोलिक सीमा ओलांडून विश्वव्यापी बनला. आज संघ जगातील सर्वाधिक मोठी आणि सर्वाधिक चर्चित स्वयंसेवी संघटना आहे.
संघाचे एक मोठे योगदान हिंदी भाषेसाठीही आहे, ही गोष्ट अनेकांच्या ध्यानात येत नाही. हिंदीला भारताची राष्ट्रभाषा बनविण्याचे सरकारी प्रयत्न अनेकांच्या विरोधामुळे फसले. परिणामी तिला राष्ट्रभाषेचा अधिकृत दर्जा अजूनही मिळू शकलेला नाही. ती देशात सर्वाधिक बोलली जाणारी संपर्क भाषा जरूर आहे. परंतु राष्ट्रभाषा नाही. सर्व राज्यांमध्ये प्रत्येकाची मातृभाषा, इंग्रजी यांच्यासोबत हिंदी ही तिसरी भाषा (काही राज्यांमध्ये तेही नाही !) होऊन बसली आहे. स्वातंत्र्य आंदोलनाची मुख्य भाषा असूनही आणि महात्मा गांधींनी स्वत: प्रचार करूनही हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळू शकलेला नाही, हे विदारक सत्य आहे.
हिंदीला तो मान मिळवून देण्याच्या प्रयत्नांमध्ये संघाचेही मोलाचे योगदान आहे, हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते. संघाची संपर्क भाषाच हिंदी आहे. देशाच्या कोणत्याही प्रांतातील, कोणताही भाषिक स्वयंसेवक प्रामुख्याने हिंदीचाच वापर करतो. प्रचारक, पदाधिकारी हे सारे आवर्जून हिंदी बोलतात. ज्या दक्षिणेत हिंदीला प्रारंभीच्या काळात तीव्र विरोध झाला आणि आजही होत आहे, त्या दक्षिण भारतीय प्रांतांमध्ये संघाने हिंदीचे चलन वाढविले, हे मान्यच करावे लागेल. माजी सरसंघचालक सुदर्शनजी, माजी सरकार्यवाह शेषाद्रीजी, माजी बौद्धिक प्रमुख रंगा हरीजी, सूर्यनारायण राव यांच्यासारखे दिग्गज संघाने दक्षिणेतूनच राष्ट्रीय स्तरावर आणले. याचा किती मोठा परिणाम झाला असेल, याची कल्पना करा.
महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, काश्मीर, ईशान्य राज्ये यासारख्या इतर अहिंदीभाषी राज्यांमध्येही संघाने हिंदीचा प्रसार करण्यात मोठा हातभार लावला आहे.. या सर्व भागांमध्ये हिंदी बोलणार्यांची सर्वाधिक संख्या संघाच्या स्वयंसेवकांचीच असणार, असा दावा सहज करता येऊ शकतो.
संघाची प्रार्थना, संघ शाखेतील बहुतांश आज्ञा संस्कृतमध्ये असल्या तरी, उर्वरित सर्व कामकाज हिंदीत चालते. सर्व पदाधिकारी, प्रचारक, बहुतांश स्वयंसेवक हिंदीतच बोलतात. संघाच्या गीतांमध्येही हिंदीचा वापर सर्वाधिक आहे. त्या त्या राज्यात स्थानिक भाषेचा वापर होतोच. पण, हिंदीला आवर्जून महत्त्व दिले जाते. भाषांवरून देशभर होणारे सततचे तंटे पाहता संघाचे हे 'जोडणारे' काम किती मोलाचे आहे, ते लक्षात येते. प्रस्तावित राष्ट्रभाषेचा मानसन्मान वाढविण्यात संघ वठवित असलेली ही भूमिका इतिहासाला कधीही विसरता येणार नाही. #१०
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment