शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-५ ..दैनंदिन शाखा नावाची शाळा !
शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-५
..दैनंदिन शाखा नावाची शाळा !
--🕉️ स्वयंसेवक घडविण्यासाठी दररोज एक तासाची शाखा आणि शाखेत स्वयंसेवक आणण्यासाठी विनावेतन प्रचारक हे दोन अफलातून प्रयोग डॉ. हेडगेवारांनी सुरू केले आणि त्यांच्या यशामुळेच संघाचे प्रचंड जाळे आज निर्माण होऊ शकले आहे. शाखा आणि प्रचारक हे दोन्ही संघकार्याच्या मजबूत कण्याचे महत्त्वाचे भाग आहेत. नव्हे, याच दोन चाकांच्या भरोशावरच संघ वेगाने शतक पार करू शकला.
चोवीस तासातील एक तास एकत्र येणे, खेळणे, गीते म्हणणे हे ढोबळमानाने शाखेचे स्वरूप आहे. दररोजच्या या सहवासातून आपुलकी वाढते, संबंध दृढ होतात आणि कोणतेही काम एकीने करण्याची वृत्ती वाढते. असे स्वयंसेवक देशासाठी काहीही करू शकतात. प्रत्येक नैसर्गिक आपत्तींच्या आणि भीषण अपघातांच्या संकटकाळात संघाचे स्वयंसेवक ज्या सहजतेने धावून जात देशवासीयांना मदत करतात, त्याचे मूळ आणि यश या शाखेत दडलेले आहे.
डॉ. हेडगेवार काँग्रेसचे काम करीत असतानाच्या काळातील एका घटनेमुळे ‘एकीचे बळ’ त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आले आणि अशी एकी निर्माण करण्यासाठी हिंदू संघटना स्थापन करण्याचा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. नागपूरच्या टाऊन हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची एक सभा होती. ती उधळून लावण्यासाठी इंग्रजांच्या हस्तकांनी (पोलिस किंवा गुप्तचर किंवा घरभेदी) या सभेत प्लॅस्टिकचा नकली साप सोडला. त्याला घाबरून लोक पळाले आणि सभा होऊ शकली नाही. बाहेरगावाहून परत आलेल्या डॉ. हेडगेवारांना हा प्रकार कळला, तेव्हा त्यांनी एकेका कार्यकर्त्याला बोलावून चौकशी केली. सर्वांचे उत्तर एकच- ‘‘मी काय करणार होतो ? मी एकटा होतो !’’ इतके लोक असूनही प्रत्येक जण एकटा असल्याचे सांगतो, यावरून एकजूट आवश्यक असल्याचे डॉक्टरांना तीव्रतेने जाणवले. आणि त्या एकजुटीसाठी त्यांनी संघशाखेचा अनोखा मंत्र दिला. मा. गो. वैद्य यांनी सांगितलेला हा किस्साच संघस्थापनेची त्वरित प्रेरणा ठरला, हे कोणाच्याही लक्षात यावे." # ५
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment