शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-८ मुस्लिम-ख्रिश्‍चनांशी संपर्क.

 शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-८

मुस्लिम-ख्रिश्‍चनांशी संपर्क


🕉️  लौकिकार्थाने हिंदू असलेल्या समाजाच्या घटकांमध्ये संघाचे काम वाढत असले तरी, मुसलमान आणि ख्रिश्‍चन या समाजांसोबत संघाचा संपर्क गोळवलकर गुरुजींच्या काळापर्यंत नव्हताच. कारण, "मुसलमान, ख्रिश्‍चन आणि कम्युनिस्ट हे हिंदुराष्ट्राचे तीन शत्रू आहेत", असे श्रीगुरुजींच्या 'विचारधन' (बंच ऑफ थॉट्स) या ग्रंथात स्पष्टपणे म्हटले होते. त्यामुळे संघाने या दिशेने काही प्रयत्न करण्याचा प्रश्‍नच नव्हता. संघविरोधकांनी याचा कोलितासारखा वापर करून संघाला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचे सतत प्रयत्नही केले. -आणि, आज श्रीगुरुजींच्या निर्वाणानंतर पंचेचाळीस वर्षांनी, 2018 मध्ये त्यांच्या पुस्तकातील वरील विधान नाकारल्याचे जाहीर करीत सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी संघविरोधकांना धक्काच दिला !  या बदलाची सुरुवात मात्र बाळासाहेब देवरस यांच्या काळातच झाली आणि योग्य कारवाईच्या दिशेने पावले टाकायला सुदर्शनजींनी प्रारंभ केला. एवढे दीर्घकाळ विचारमंथन या विषयावर झाल्यानंतरच हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला, यावरून संघाच्या संयमित कार्यशैलीची कोणालाही कल्पना यावी.

मुस्लिम आणि ख्रिश्‍चन नेत्यांशी चर्चा करण्याचे, इतर लोकांना धाडसी वाटणारे पहिले पाऊल देवरस यांनी उचलले. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अब्दुल्ला बुखारी यांच्यासह अनेक मुस्लिम नेत्यांशी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. आणिबाणीतील एकत्र तुरुंगवास आणि नंतरचा जनता पार्टी प्रयोग यातून भेटीगाठीचे मार्ग मोकळे झाले. "सध्याचे भारतीय मुस्लिम आणि ख्रिश्‍चन हे मूळचे या भूमीतीलच असल्याने हिंदुराष्ट्राच्या व्यापक अर्थामध्ये त्यांना सामावून घेता येईल", अशी भूमिका देवरसांनी घेतली आणि त्यादृष्टीने योग्य व्यासपीठ निर्माण करण्याचे ठरविण्यात आले. सुदर्शनजींच्या काळात या प्रक्रियेने वेग घेतला आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच, तसेच इसाई राष्ट्रीय मंच या दोन संस्था स्थापन झाल्या. इन्द्रेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही मंचांचे कार्य जोरात सुरू असून, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्मगुरूंशी, सामाजिक नेत्यांशी संबंध वाढविण्याचे सतत प्रयत्न केले जात आहेत. त्याला हळूहळू का होईना, यशही येत आहे.

मात्र, 'विचारधन’मधील वरील उल्लेख काढण्याचा निर्णय संघाने कसा काय घेतला, याबद्दल संघाबाहेर प्रचंड उत्सुकता आहे. हा उल्लेख वगळून विचारधन नव्या रूपात आल्याचे स्वत: विद्यमान सरसंघचालकांनीच जाहीर केले. प्रत्यक्षात, दुरुस्तीसह हे नवे पुस्तक सुदर्शनजींच्याच काळात 2007 मध्येच प्रसिद्ध झाले आहे. मुस्लिम-ख्रिश्चन नेत्यांना या बदलाची कल्पनाही देण्यात आली. पण त्याची फारशी वाच्यता संघाने केली नाही. २०१८ च्या दिल्लीतील ३ दिवसांच्या भाषणमालेत सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी पहिल्यांदा ही गोष्ट जाहीर केली. कोणताही प्रश्न अतिशय संयमाने हाताळण्याची संघात ही जी पद्धत आहे, ती दीर्घ काळासाठी परिणामकारक ठरते, हे वेगळे सांगायला हवे का ?. 🚩 # ८.


✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.