शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-४ ...आम्ही बि घडलो, तुम्ही बि घडाना !

 शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-४

...आम्ही बि घडलो, तुम्ही बि घडाना !

🕉️  स्वत:च्या हयातीतच सरसंघचालकांनी आपला उत्तराधिकारी नेमण्याचा नवाच पायंडा बाळासाहेब देवरस यांनी पाडला आणि त्यांच्या नंतरच्या दोन सरसंघचालकांनीही (रज्जूभय्या आणि सुदर्शनजी) तो पाळला. बाळासाहेबांनी सहसरकार्यवाह रज्जूभय्या यांना वारस नेमले, तर रज्जूभय्यांनी सुदर्शनजींना सरसंघचालक बनविले. या दोन्ही वेळी सरकार्यवाह असलेले शेषाद्रीजी यांनी हा प्रथाबदल सहजतेने स्वीकारला आणि नंतरच ते पदावरून निवृत्त झाले. संघाच्या शिकवणीचे हे सौंदर्य आहे, तसेच ते संघाचे शक्तिस्थानही आहे.

असे कालपरिस्थितीनुसार बदल हे संघाचे वैशिष्ट्य आहे. प्रारंभीच्या काळात खाकी हाफ पँट आणि खाकीच शर्ट हा संघाचा गणवेश होता. त्यावर इंग्रजांची वक्रदृष्टी आहे आणि ती बंदीस कारणीभूत होऊ शकते, हे लक्षात येताच खाकी शर्टच्या जागी पांढरा शर्ट असा बदल करण्यात आला. चामडी पट्ट्यावर प्राणिप्रेमींचे आक्षेप येताच, नायलॉन/प्लॅस्टिकचा पट्टा आला. हाफ पँटची जागा आता फुल पँटने घेतली आहे. त्यामुळे संघवाल्यांना ‘चड्डीवाले’ म्हणून हिणवण्यात विरोधकांना अडचण निर्माण झाली आहे !

स्वयंसेवक घडविणे

--वास्तविक, संघाचे काम हे देशासाठी, संपूर्ण भारतीय समाजाच्या भल्यासाठी उपयुक्त असेच आहे. संस्थापकाच्या काळापासूनच संघाने ती दिशा घेतली आहे. परकीय राजवटीच्या जागी स्वकीयांचे राज्य आणून ते चालविण्यासाठी सक्षम माणसे तयार करणे, हे संघाचे ध्येय हेडगेवारांनी ठरविले होते. ‘आम्ही बि घडलो, तुम्ही बि घडाना’ हेच संघाचे मुख्य सूत्र आहे. संघाचे सर्वाधिक चर्चित भाष्यकार आणि पहिले अधिकृत प्रवक्ते मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य सांगायचे- ‘‘संघ म्हणजे काय? तर, संघ म्हणजे स्वयंसेवक. आम्ही स्वयंसेवक घडवतो आणि तो समाजाला देतो. व्यक्तिनिर्माण हे आमचे काम आहे. या व्यक्ती मग वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.’’ हा आहे संघ.

संघाने घडविलेले स्वयंसेवक समाजाला कसे उपयोगी पडतात, याचे सुंदर उदाहरण मा. गो. वैद्य नेहमी देत असत- "ज्या भागात सरकार किंवा अन्य यंत्रणा सहजासहजी पोहोचू शकत नाही, अशा देशभरातील एक लाखावर ठिकाणी संघाच्या माध्यमातून एकल विद्यालये चालविली जातात. एकल विद्यालय म्हणजे एकशिक्षकी शाळा ! अत्यंत अल्पवेतनात हे शिक्षक, आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायातून वेळ काढून, गरजू मुला-मुलींना सुशिक्षित बनविण्याचे प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय हे काम देशभर वर्षानुवर्षे सुरू आहे. यातून लाखो मुले-मुली साक्षर होत आहेत. स्वयंसेवकांच्या माध्यमातून समाजाचे हित साधणे, हाच खरा संघ आहे." #४

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.