खलबत्ता -विनोद देशमुख. मोठा कोण- अजगर की ॲनाकोंडा ?

 खलबत्ता:-विनोद देशमुख.

मोठा कोण- अजगर  की ॲनाकोंडा ?

जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी दोघे- अजगर आणि‌ ॲनाको़डा सध्या चर्चेत आले आहेत. या विषयाच्या अनुषंगानं गुरुजी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला...

गुरुजी : प्रमोद, सांग बरं सर्वात मोठा साप कोणता आहे ?

पम्या : हा काय प्रश्न झाला गुरुजी ? अर्थातच अजगर. अजगराएवढा मोठा साप दुसरा नाही.

बंड्या : अबे पम्या, अजगराचाही बाप साप आहे. त्याचं नाव ॲनाको़ंडा ! तो जगातील सर्वात मोठा साप आहे. म्हणजे सर्पराज ! त्याच्याशी टक्कर घेईल असा दुसरा साप जगात नाही.

गुरुजी : तुमचं दोघांचंही एका अर्थानं बरोबर आहे. हे दोन्ही साप मोठे आहेत. त्यांची लांबीही खूप असते आणि वजनही खूप जास्त असते. दोघांयध्ये उन्नीस-बीसचा काय तो फरक !

चंद्या : पण सर, मी तर ऐकलं की, ॲनाको़ंडा खूपच मोठ्ठा, जाडजूड असतो. माणूस आणि त्यासारखे प्राणी तो अख्खाच्या अख्खा गिळतो म्हणे.

पम्या : आपला अजगरही हरीण वगैरे गिळतोच की. त्याला लहान म्हणायचं का ?

गुरुजी : मुलांनो, या दोन्ही सापांची शास्त्रीय माहिती तुमच्या प्राणिशास्त्र पुस्तकात आहे. ती आधी वाचून काढा. म्हणजे तुम्हाला या दोन्ही सापांची माहिती मिळेल.

बंड्या : गुरुजी, मी ते पुस्तकच आणलं आहे. आम्ही तिघेही एकत्रच वाचतो.

असं सांगत तीनही पोट्टे एकाच टेबलवर पुस्तक वाचायला लागले आणि गुरुजी बाजूच्या खोलीत जाऊन बसले.

थोड्या वेळानं तीनही मुलं गुरुजींच्या खोलीत गेली अन् एका सुरात बोलली- "सर, आम्ही वाचले दोन्ही धडे. त्यातून आम्हाला कळलं की, अजगर नंव्हे, तर ॲनाकोंडाच जगातील सर्वात मोठा साप आहे. सर्वात लांब अन् सर्वात 

वजनदार सुद्धा !

गुरुजी : अभ्यासानं असाच गैरसमज दूर होतो आणि आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच कोणत्याही विषयाचं पुस्तक मन लावून वाचलं पाहिजे. अजगर आशिया, आफ्रिका, आस्ट्रेलिया या खंडांमध्ये आढळतो, तर ॲनाकोंडा फक्त दक्षिण अमेरिकेतच दिसतो.

बंड्या : पण गुरुजी, पेपरात तर अजगर अन् ॲनाकोंडा म्हणून माणसांची नावं छापून आली आहेत !

गुरुजी : म्हणजे ?

बंड्या : आपले माजी मुख्यमंत्री, उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले म्हणे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ॲनाकोंडा आहेत ! त्यांनी महाराष्ट्र गिळला आहे !! आपले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला उत्तर दिलं- उद्धव ठाकरे अजगर आहेत ! सर्वकाही गिळून बसले आहेत !! पेपरात हे वाचताना खूप मजा येते गुरुजी..."

गुरुजीनं बंड्याला झापलं- "तू आपल्या अभ्यासाचं पाहा बंड्या. पेपरात वाचून डोकं खराब नको करून घेऊ. ते मोठे लोक आहेत, पण लहान मुलांसारखे भांडत असतात ! त्याचं राजकारण आहे ते. आपण लक्ष देऊ नये.

तीनही पोट्टे (एकासुरात) : पण गुरुजी, हे लोक त्यांच्या भांडणात प्राण्यांना का ओढतात ?

गुरुजी : अबे पोट्टेहो, ते नेते असले तरी प्राणीच आहेत की नाही ! माणूस नावाचे प्राणी !! पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात अजब प्राणी !!!

आपणही प्राणी आहोत, हा शोध मुलांसाठी नवा होता. ते कांगारूंसारख्या उड्या मारत वर्गातून बाहेर पडले.

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.