शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची पस्तीसावी बैठक संपन्न
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची पस्तीसावी बैठक संपन्न
मूल ३० : दीपक देशपांडे.कृषी महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित पस्तीसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक २९ जुलै, २०२५ बुधवार रोजी ग्राम सिंतळा ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, प्रगतशील शेतकरी श्री विजय गुरुनुले, श्री घनश्याम वासेकर, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने "भात काढणीनंतर रब्बी हंगामात तेलबिया पिकांची लागवड व व्यवस्थापन" या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, भात काढणीनंतर रब्बी हंगामात पडीत राहणाऱ्या क्षेत्रात तेलबिया लागवड करण्याचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच जवस व मोहरी या तेलबिया पिकांचे आरोग्यातील महत्व सांगितले. डॉ. आर. पी. गजभिये, सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक धान पिकाऐवजी फणस, सीताफळ, जाभूळ व शेवगा यासारख्या कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येणाऱ्या या फळझाडांची व भाजीपाला पिकांची लागवड सुधारित तंत्रज्ञानाच्या वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्नील ठाकरे, कृषिविद्या विषयतज्ञ यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच भात काढणीनंतर रब्बी हंगामात जवस व मोहरी या तेलबिया पिकांची पंच: सूत्री पद्धतीने लागवड व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. भात काढणीनंतर उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत या पिकांची लागवड शक्य असून यापासून शेतकऱ्यांच्या अधिक आर्थिक नफा मिळवता येतो सोबतच आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही पिके अतिशय महत्त्वाचे असल्याचे विषद केले.
सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विषयतज्ञ डॉ. भूषण अ. ठाकरे, यांनी जवस, मोहरी व करडई या पिकावरील गादमाशी, मावा या किडींच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे, ट्रायकोकार्ड इत्यादींचा वापर करण्यास सांगितले. सहाय्यक प्राध्यापिका वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ डॉ. गितांशु डिंकवार यांनी जवस व करडई पिकांवरील सुरवातीच्या काळातील मर रोगांच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. मर व मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या परोपजीवी जैविक बुरशीनाशकाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुवर्णा नगराळे यांनी रब्बी हंगामात बियाणे खरेदी करतांना घेण्यात येणाऱ्या काळजी बाबत शेतकऱ्यांसाठी सविस्तर माहिती दिली. सदर शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीस शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमास एकुण ३५ शेतकरी व ०६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता
सहाय्यक प्राध्यापक डॉ. भूषण अ. ठाकरे यांनी सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे व कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ यांचे आभार व्यक्त केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment