राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने विशेष लेख.
भारताला विश्वगुरू बनवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वप्न साकार होईल.

एकोणविसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात विविध राजकीय आणि सामाजिक विचारधारा सक्रिय झाल्या होत्या. मात्र आज त्यातील कोणतीच विचारधारा किंवा त्यानिमित्ताने सक्रिय झालेले पक्ष किंवा संघटना या फारशा अस्तित्वात असलेल्या दिसत नाहीत. असल्याच तर अगदी अखेरच्या घटका मोजत असल्यासारख्याच आहेत. मात्र त्याला अपवाद एकच आहे, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आज ही संघटना शंभर वर्षाची होते आहे, आणि एखाद्या विशाल वटवृक्षासारखी फोफावलेली दिसते आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात या संघटनेने आपले स्थान निर्माण केले आहे. आज देशाच्या प्रमुखपदी देखील याच विचारांचा माणूस स्थानापन्न झालेला दिसतो आहे. यावरून संघटनेचा विस्तार लक्षात यावा. भविष्यातही ही संघटना अशीच फोफावणार हे चित्र आज तरी स्पष्ट दिसते आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी या देशात काँग्रेसची विचारधारा सक्रिय झाली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने सहभाग घेऊन आपले स्थान देखील निर्माण केले होते. त्याच काळात कम्युनिस्टांची डावी विचारधारा देखील इथे सक्रिय झाली होती. समाजवादी विचारधारा देखील तितक्याच वेगात पुढे आली होती. हिंदू महासभा ही संघटना देखील त्याच काळात उभी राहिली, आणि आज ती कुठेही नाही. तीच गत समाजवाद्यांची देखील आहे. नाही म्हणायला जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे, तिथे त्यांच्या आधाराने ते पुढे जात आहेत. मात्र तिथेही गतिरोध होतोच आहे. काँग्रेसची विचारधाराच काय ती गतिशील राहिली होती. मात्र आज जी काँग्रेस एका काळात संपूर्ण देशावर अधिकार गाजवत होती. ती कसेबसे आपले अस्तित्व टिकवू बघते आहे. प्रसंगी त्यासाठी या संघटनेला पक्षाला फेक नरेटिव्हचाही आधार घ्यावा लागतो आहे.
याच काळात म्हणजेच १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्यावेळी हिंदूंचे संघटन करून हिंदूंना बलशाली बनवणे आणि हिंदूंवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यास सक्षम बनवणे ही मुख्य भावना डोळ्यासमोर ठेवून ही संघटना कार्यरत झाली होती. त्याचवेळी देशाचे स्वातंत्र्य आणि देशाला गतिमान आणि प्रगतिशील बनवणे हे देखील संघाचे ध्येय राहिले होते.
आधी आधी ही संघटना फक्त मैदानावर खेळ खेळण्यापूर्तीच आहे असे एक चित्र निर्माण झाले होते. मात्र तिथे देखील मैदानावर शिशु बाल आणि तरुणांनी एकत्र जमून बलशाली बनणे आणि त्याचबरोबर वैचारिक दृष्ट्याही संस्कारीत आणि सक्षम बनवणे हे कार्य देखील सुरू झाले होते. बाल आणि तरुणांमध्ये आपल्या पूर्वजांचा जाज्वल्य इतिहास लक्षात घेऊन बलशाली भारत कसा बनवता येईल या दृष्टीने मने संस्कारित करण्याचे काम संघाने सुरू केले होते.
आधी आधी या संघटनेचे काम बाल आणि तरुणांपुरतेच मर्यादित होते. नंतर १९३६ साली संघ विचाराच्याच महिलांनी एकत्र येत राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. संघाच्याच धर्तीवर या संघटनेचे काम सुरू झाले. आज राष्ट्रसेविका समिती सुद्धा देशभर विस्तारलेली आहे.
संघाचे काम बघता संघ हा भविष्यात काँग्रेसला आव्हान ठरू शकतो, हे काँग्रेसचे तत्कालीन नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येचे निमित्त करून संघाचा या प्रकरणाशी कोणताही अर्थाअर्थी संबंध नसतानाही संघावर बंदी देखील घालण्यात आली. मात्र या अग्निदिव्यातून संघ तावून सुलाखून बाहेर पडला आणि अधिक जोमाने विस्तारला गेला. यानंतर संघ विचाराच्या मंडळींनी राजकीय क्षेत्रात पुढे जाऊन संघ विचार राजकीय क्षेत्रातही रुजवावा या हेतूने भारतीय जनसंघाची स्थापना केली. नंतर १९७७ मध्ये हा पक्ष जनता पक्षात विलीन झाला होता. मात्र नंतर पुन्हा एकदा बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि आज हा पक्ष देशावर राज्य करतो आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
फक्त राजकीय क्षेत्रच नाही, तर इतर क्षेत्रातही संघाचे काम जावे म्हणून मग कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, आदिवासी क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रम, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी भारतीय किसान संघ, अशा विविध क्षेत्रात संघविचाराच्या मंडळींनी जात आपापल्या संघटना उभ्या केल्या. आज जवळजवळ विविध क्षेत्रांमध्ये ३६ संघटना कार्यरत आहेत. त्यात दलितांना सोबत घेण्यासाठी समरसता मंच आहे, स्त्री शक्ती आहे, शैक्षणिक क्षेत्रात शिक्षा भारती आहे, ग्रंथालय भारतीय आहे, साहित्य क्षेत्रात अखिल भारतीय साहित्य परिषद आहे, संस्कार क्षेत्रात संस्कार भारती देखील सक्रिय आहे. हिंदूंचे संघटन व्हावे आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी विश्व हिंदू परिषद देखील आहे. समाजातील उच्चभ्रूवर्ग आपल्याकडे यावा यासाठी रोटरी लॉयन्स या धर्तीवर भारत विकास परिषद सक्रिय झाली आहे. विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सक्रिय आहे, तर विधी क्षेत्रात अधिवक्ता परिषद,सहकार क्षेत्रात सहकार भारती, उद्योग क्षेत्रात लघु उद्योग भारती, पत्रकारितेच्या क्षेत्रात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट इंडिया, आरोग्य क्षेत्रात आरोग्य भारती, दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणारी सक्षम तितक्याच जोमाने काम करते आहे. एकूणच समाजाच्या सर्वच क्षेत्रात संघविचाराची मंडळी सक्रिय होऊन संघविचार पोहोचवण्यात यशस्वी झाली आहेत, आणि त्यानिमित्ताने जनसामान्यांना संघाशी जोडण्यात त्यांना निश्चित असे यश मिळते आहे.
या शिवाय इतर विविध क्षेत्रात संघ विचाराच्या मंडळींनी अशा छोट्या छोट्या संस्थांच्या माध्यमातून आपले काम पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. परिणामी आज अनेक सहकारी बँका, शिक्षण संस्था, महाविद्यालय मोठमोठी रुग्णालये, सहकारी तत्त्वावर चालवून रोजगार निर्माण करणारे छोटे मोठे उद्योग असे समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये त्या त्या क्षेत्रांच्या समस्या सोडवत त्या माध्यमातून संघ विचार पोहोचवणारे असे एक पक्के नेटवर्क उभे करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज यशस्वी झाला आहे. आधी हा फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. मात्र संघ विचाराच्या मंडळींच्या या संघटनामुळे आता हा संघ परिवार झालेला आहे. आणि आता हा संघ परिवार आज विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी शंभर वर्ष पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
१९२५ साली नागपूरच्या महाल भागातील मोहिते वाड्यासमोर जमलेल्या पाच पंचवीस तरुणांपासून सुरू झालेला हा विचार आणि त्या विचाराने भारलेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात पोहोचला आहे हे खरे. मात्र त्यांची शंभर वर्षांची वाटचाल ही फारशी सुकर नव्हती हे तितकेच खरे. सांगितल्यानुसार तत्कालीन काँग्रेस विचारधारेचा संघ विचाराला प्रचंड विरोध होता. त्याचबरोबर देशात सक्रिय असलेल्या डाव्या आणि समाजवादी विचारसरणीने देखील संघ विचाराला विरोधच केला होता. काँग्रेसने संघावर आतापर्यंत तीनदा बंदी आणली होती. मात्र प्रत्येक बंदी नंतर संघ तितक्याच वेगाने फोफावला." केला जरी पोत बळेची खाले, ज्वाळा तरी ती वरती उफाळे" या न्यायाने प्रत्येक बंदीनंतर संघ अधिकच विस्तारला. जनसामान्यांचा संघाला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला.त्यातूनच आज संघ विचार देशाच्या प्रमुखपदी पोहोचलेला आहे. त्याचबरोबर जर एक अंदाज घेतला तर संघाशी संबंधित या विविध संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून देशातील किमान ४० ते ५०कोटी नागरिक या विचारांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जोडलेले आहेत असे दिसून येते.
आजपासून साठ वर्षांपूर्वी माध्यमांमध्येही संघ कुठेच दिसत नव्हता. पहिल्या बंदी नंतर संघानेच आपल्या विचारांच्या पत्रकार मंडळींना एकत्र घेऊन वृत्तपत्रे सुरू केली होती. ती वगळतात इतर वृत्तपत्रांमध्ये संघाच्या बातम्या चार ओळीच्या वर कधी येत नव्हत्या. आकाशवाणी आणि दूरदर्शन या सरकारी माध्यमांवर सुद्धा संघाला कुठेही स्थान नव्हते. आज मात्र प्रत्येक वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्र यात संघावरच्या बातम्या आणि मजकूर याने नुसती गर्दी केली आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. पूर्वी कोणतही साहित्यिक कलाकार गीतकार गायक विचारवंत हा संघाबद्दल सहानुभूती असली तरी चार हात अंतर राखूनच राहायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. संघावर चित्रपट निघत आहेत. तर संघ प्रार्थना आणि संघ गीते यांचे व्हिडिओ युट्युब वर जात आहेत. एकूणच समाजाच्या सर्वच घटकांमध्ये संघाची स्वीकारार्हता वाढलेली दिसते आहे.
संघाच्या या १०० वर्षाच्या यशस्वी वाटचाली मागे संघ संस्थापकांचे दृष्टेपण आणि नंतर संघ नेतृत्वाचे सक्षम नियोजन हे जितके कारणीभूत ठरले. तितकेच या विचारांनी भारून संघासाठी सर्वस्व देणारे स्वयंसेवक देखील कारणीभूत ठरले होते. संघाने अगदी पहिल्या फळी पासून प्रचारक तयार करायला सुरुवात केली होती. हे प्रचारक अगदी तरुण वयात संघ कार्यासाठी आपले आयुष्य देत असत. संघाने गेल्या शंभर वर्षांत असे लाखो प्रचारक घडवले आहेत. देशाचे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दीर्घकाळ संघाचे प्रचारक म्हणूनच कार्यरत राहिलेले आहेत.
हे तरुण प्रचारक आपले घरदार सोडून दूर कुठेतरी जाऊन वर्षानुवर्षे राहत आणि तिथे संघाच्या कार्याचा रोपटे कसे लावता येईल आणि मग त्याचा विस्तार कसा करता येईल हाच प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे या प्रचारकांची आणि संघाशी जुळणाऱ्या या स्वयंसेवकांची संघाकडून कोणतीही अपेक्षा नसायची. "असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. मंदिर उभवणे हे असे आमचे शील" या तत्त्वाने चालणारे हे त्यागी स्वयंसेवक आणि प्रचारक होते. अशा त्यागी प्रचारकांमुळेच आज संघ उभा राहिला आहे आणि शंभर वर्षाचा झालेला आहे. या प्रचाराकांनी अगदी आजचे पाकिस्तान असलेल्या लाहोर पर्यंत जाऊन त्या काळात संघकार्याचे बीज रोवले होते. स्वातंत्र्यानंतर देखील पूर्वांचल मधील आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँड, तर खाली दक्षिणेत केरळ, कर्नाटक, पांडेचेरी, अशा सर्वच प्रदेशांमध्ये त्या काळात असे संघ प्रचारक गेले आणि त्यांनी तिथे तिथे संघाचे काम सुरू केले. आज देशाच्या सर्वच भागांमध्ये संघकार्य पोहोचले, त्या मागे या प्रचारकांचे मोठे योगदान राहिले आहे.
या प्रचारकांनी संघकार्य फक्त भारतातच पोहोचवले असे नाही, तर जगभरात जिथे जिथे हिंदू पोहोचला आहे तिथे तिथे संघ कार्य पोहोचवण्यात हे प्रचारक यशस्वी झाले. त्यामुळेच संघाचा विश्वविभागही आज जोमात काम करतो आहे, आणि परदेशात हिंदू स्वयंसेवक संघ म्हणून संघाचे काम अगदी चांगले रुजलेले आहे.
संघाने आपले एकच ध्येय ठेवले होते, ते म्हणजे माणूस घडविणे. "अखंड अविरत या ध्येयास्तव घडवू ही जीवने. दिसा दिसाला क्षणा क्षणाला संस्कारू ही मने." या तत्त्वाने संघ माणूस घडवत राहिला, आणि संघाने घडविलेला राष्ट्रभक्त माणूस विभिन्न क्षेत्र काम करायला उपलब्ध करून दिला. ते करताना संघाने कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच संघाचे आजचे विशाल रूप दिसते आहे.
विशेष म्हणजे संघाने विभिन्न क्षेत्रात अशी घडविलेली माणसं दिली. ती माणसं संघ विचारांनी प्रेरित होऊन आपापल्या संघटनेत कार्यरत राहिली. त्यांना आवश्यक ते सहकार्य संघाने निश्चित दिले. मात्र कोणतेही संघटनेच्या अंतर्गत बाबींमध्ये संघ अधिकारी कधीच ढवळाढवळ करताना दिसत नाही. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने लढा दिला. त्यावेळी संघाने त्यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी केली होती. मात्र तो संघर्ष पूर्ण होताच तिथून संघ बाजूला झालेला आहे. हेच धोरण संघाने प्रत्येक संघटनांमध्ये ठेवले आहे. त्यामुळेच सर्व काम सुरळीतपणे होताना दिसते आहे.
संघाच्या या शंभर वर्षांच्या वाटचालीत संघ कधीच प्रसिद्धीच्या किंवा श्रेयवादाच्या मागे लागलेला नाही. आज सामाजिक क्षेत्रात काम करताना ठीक ठिकाणी गरज पडते, तेव्हा संघ स्वयंसेवक धावून जातात. मग कुठे पूर आलेला असो, आग लागलेली असो, भूकंप झालेला असो, तिथे संघ स्वयंसेवक सर्वात आधी पोहोचलेला असतो. तो काम करतो, सर्वांना मदत करतो आणि काम पूर्ण होताच बाजूला होतो. नंतर राजकीय पक्षांचे नेते तिथे श्रेय घेण्यासाठी फोटो काढायला येतात. १९६२ मध्ये जेव्हा भारत आणि चीन यांचे युद्ध झाले, तेव्हा बहुतेक सर्व लष्करी आणि निमलष्करी सैनिक युद्धावर गेले होते. त्यावेळी देशांतर्गत सुरक्षा सांभाळण्यासाठी पंडित नेहरूंनी संघ स्वयंसेवकांना निमंत्रित केले होते. तत्कालीन सरसंघचालक कै. गोळवलकर गुरुजी यांनी केंद्र सरकारला तसे स्वयंसेवक उपलब्धही करून दिले होते. त्यामुळे मग १९६३ च्या गणतंत्र दिनाच्या पथसंचलनात संघ स्वयंसेवकांचे पथकही सहभागी करून घेण्यात आले होते.
संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत सहा संघ प्रचारकांचे नेतृत्व संघाला लाभलेले आहे. संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. सुरुवातीला तेच सरसंघचालक होते. १९४० मध्ये त्यांच्या निधनानंतर कै. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले. १९७३ मध्ये गुरुजींच्या निधनानंतर बाळासाहेब देवरस तिसरे सरसंघचालक बनले. त्यांचा कार्यकाळ १९९४ पर्यंत राहिला. १९९४ मध्ये प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी सरसंघचालक पदाचा त्याग केला, आणि प्रोफेसर राजेंद्र सिंह उपाध्य रज्जू भैया हे चौथे सरसघचालक झाले रज्जूभैया २००० पर्यंत सरसंघचालक होते. त्यांनीही प्रकृतीच्या कारणावरून सरसंघचालकपदाचा त्याग केल्यावर कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन हे पाचवे सरसंघचालक झाले. ते २००९ पर्यंत होते. २००९ मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणावरून आपले पद सोडल्यावर डॉ. मोहन भागवत हे सरसंघचालक झाले. आजही मोहन भागवत सहावे सरसंघचालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आधीचे बहुतेक सर्व सरसंघचालक हे तरुण वयात संघाच्या संपर्कात आलेले होते. मात्र डॉ. मोहन भागवत हे अगदी शिशु स्वयंसेवक असल्यापासून संघाच्या संबंधात आलेले असून शिशु वयातच त्यांच्यावर संघाचे संस्कार झालेले आहेत.
संघावर परंपरावादी संघटना असल्याचा आरोप होतो. मात्र संघ हा कायम परिवर्तनशील राहिलेला आहे. संघाने आपला गणवेश, आपला विचार, इतकेच काय तर स्वयंसेवकांना प्रशिक्षणात दिले जाणारे अभ्यासक्रम या सर्वात कालानुरूप बदल केलेले आहेत. आज संघातील सर्व वरिष्ठ अधिकारी हे आजच्या कालानुरूप हायटेक झालेले दिसतील. विशेष म्हणजे संघ परिवाराने सर्वच प्रकारचे परिवर्तन अगदी सहजगत्या स्वीकारले आहे. सुरुवातीला संघाचा लष्करी गणवेश होता, नंतर हाफ पॅन्ट आणि शर्ट असा झाला. त्यामुळेच काँग्रेसवाले संघ स्वयंसेवकांना चड्डीवाले म्हणून चिडवायचे. आता गेल्या पंधरा वर्षात हाफ पॅन्ट जाऊन फुल पॅन्ट आली आहे. आधी लष्कराचे काळे लॉंगबूट पायात असायचे. आता साधे काळे बूट पायात आले आहेत. असे प्रत्येक टप्प्यावर सहज परिवर्तन झालेले तुम्हाला दिसेल. त्यामुळेच आज शंभर वर्षानंतरही संघ विचार सर्वांनाच स्वीकारार्ह वाटतो आहे.
असे असले तरी आजही संघावर संघ विरोधक जोरदार टीका करतच असतात. आजही दक्षिणेतील काही राज्यांमध्ये संघाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो. आजपासून पन्नास वर्षांपूर्वी दक्षिणेत आणि ईशान्येत डावी मंडळी आणि ख्रिस्ती बांधव हे संघाला फक्त वैचारिक विरोधच करत होते असे नाही, तर हाणामारीवर देखील उतरत होते. कित्येक प्रचाराकांचे त्यात जीव देखील गेले. तरीही संघ विचलित झाला नाही. आजही कितीही टीका होवो, कितीही विरोध केला जावो, संघ आपल्या वाटेवरून निष्ठेने चालतो आहे. संघ स्वयंसेवकही आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवूनच वाटचाल करीत आहेत.
संघाने आपले विचार आणि प्रथा ,परंपरा कालानुरूप बदलल्या असतीलही. मात्र त्यांचे मूळ ध्येय जे आहे, त्यापासून संघ कधीही दूर गेलेला नाही. हिंदूंना संघटित करायचे आणि भारताला विश्वगुरू म्हणजेच जागतिक महासत्ता बनवायचे हे संघाचे ध्येय आहे. मध्यंतरी दिल्लीत संघशताब्दी निमित्ताने संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची तीन व्याख्याने झाली होती. त्यात ज्या दिवशी भारत विश्वगुरु बनेल त्या दिवशी संघाचे काम संपेल असे, त्यांनी स्पष्ट केले होते. संघाचे आज तेच ध्येय आहे. त्या दृष्टीने संघ आजही सक्रिय आहे.
हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून संघाने शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात वर्षभरात ठिकठिकाणी हिंदूंची एक लाखापेक्षा अधिक संमेलने आयोजित करण्याचे संघाचे नियोजन आहे. या माध्यमातून या देशातील बहुतेक प्रत्येक हिंदू नागरिकापर्यंत संघ पोहोचणार आहे, आणि प्रत्येकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागरूत करण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे.
विशेष म्हणजे हिंदुस्थानात जो राहतो तो हिंदू असे संघाचे धोरण राहिले आहे. इथे विभिन्न धर्म असतील, जाती जमाती, पंथ, पूजा पद्धती वेगळ्या असतील, तरी इथल्या मातीत लहानाचा मोठा होतो, आणि इथल्याच हवेवर आणि पाण्यावर जो जगतो, इथे शेतात जे काही पिकते तेच खाऊन लहानाचा मोठा होतो, तो हिंदू आहे, आणि त्याला मुख्य प्रवाहात सामावून घ्यायचे आहे हे संघाचे तत्व आहे. त्यामुळेच संघ हळूहळू सर्वसमावेशक बनला आहे.
आज संघ शंभर वर्षाचा होऊ घातला आहे. शंभर वर्षांपूर्वी जे बीज रोवले होते, त्याचा आज वटवृक्ष झालेला दिसतो आहे. संघाची अशीच वाटचाल सुरू राहिले तर येत्या काही वर्षात भारताला विश्वगुरू बनवण्याचे संघाचे ध्येय साकार होऊ शकेल यात शंका नाही.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment