डॉ. आंबेडकर आणि संघ

 डॉ. आंबेडकर आणि संघ





-- राजकारण-समाजकारण असो की व्यक्तिगत जीवन असो, तात्त्विक-वैचारिक विरोध ठीक असतो. पण हाच विरोध जेव्हा मर्यादा ओलांडून द्वेषाची पातळी गाठू लागतो, तेव्हा तो विरोध, विरोध न राहता शत्रुत्वात रूपांतरित होत असतो. देशाच्या सध्याच्या राजकारणात सध्या हेच दृश्य दिसत आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी, त्यांचा पक्ष भाजपा, संघ परिवार यांना विरोध करण्याच्या नावाखाली विरोधक अक्षरश: त्यांचा द्वेष करीत आहेत, शिव्याशाप देत आहेत, वाट्टेल तसे बोलत आहेत. सर्वात जुन्या काँग्रेस पक्षापासून उबाठा शिवसेनेपर्यंत सारे विरोधक हाच उपद्व्याप करताना दिसतात. यामुळे देशाचे समाजजीवन नासून गेल्याचे दिसत आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्धशतकापर्यंत अशी स्थिती नव्हती. महात्मा गांधींचे, काँग्रेसचे विरोधक कमी नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे अनेक मान्यवर नेते आणि त्यांचे पक्ष गांधींना विरोध करीत असत; पण एक पातळी राखून. त्यामुळे या नेत्यांमधील संवाद कधी तुटला नाही. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात आंबेडकर, मुखर्जी यांच्यासारखे कॉंग्रेसविरोधक नेते मंत्री होते, यावरून त्याकाळची विरोधाची उच्च पातळी कळते. आज तर विरोधाच्या नावाने शिवीगाळ, टिंगलटवाळी एवढी वाढली आहे की, व्यक्तिगत संबंध दुरावत चालले आहेत, द्वेषभावना वाढीस लागली आहे.

या पृष्ठभूमीवर, हिंदूंचे संघटन असलेला संघ आणि हिंदुधर्मत्यागाचा निर्णय घेणारे डॉ. आंबेडकर या दोघांमधील संबंध पाहिले म्हणजे, विरोधातही शालिनता, सोज्वळता कशाला म्हणतात, ते सहज लक्षात येते. अर्थात् आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या नेत्यांकडून ही अपेक्षा करता येईल काय, हाही प्रश्न आहेच.

अश्पृश्यतेच्या संदर्भात डॉ. आंबेडकर हिंदू धर्मावर कठोर टीका करायचे. पण त्यांनी कधीही व्यक्तिद्वेष केला नाही. संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंच या संस्था स्थापन करणारे संघाचे प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांच्याशी बाबासाहेबांचे व्यक्तिगत निकट संबंध होते. त्यांच्याशी बोलताना संघ आणि हिंदू समाजाबद्दल परखड मत ते वेळोवेळी व्यक्त करीत असत. पण, आजच्या नेत्यांसारखे खालच्या दर्जाचे शब्द त्यांनी कधीही वापरले नाहीत. याचे हे एक उदाहरण पाहा...

१९५६ च्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या काहीच दिवस आधी डॉ. आंबेडकर आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्यात संघाबद्दल बराच संवाद झाला.

ठेंगडी : इतिहासकाळात काही अत्याचार झाले. पण आम्ही काही तरुण मंडळी त्याचे प्रायश्चित्त भोगून समाजाची रचना नवीन प्रकारे करण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे आपल्या लक्षात आहे काय ?

आंबेडकर : तू संघाबद्दल म्हणतो का ? मी संघाचा विचार केला नाही, असे तुला वाटते का ? 

ठेंगडी : तुमच्याविषयी आम्ही असे कसे म्हणू शकतो ? तुम्ही सर्व गोष्टींचा विचार नक्कीच केला असणार.

आंबेडकर : सांग, संघ केव्हा निघाला ? मला माहीत आहे. पण तू सांग.‌ २७-२८ वर्षे झाली असतील. सध्या तुमची संख्या किती ? 

"मला माहीत नाही" या ठेंगडींच्या उत्तरावर बाबासाहेब म्हणाले- "असे पत्रपरिषदेसारखे उत्तर देऊ नको ! निश्चित उत्तर दे." अन् स्वत:च सांगू लागले-

"तुमची संख्या २७-२८ लाख धरून चालू. या हिशेबाने सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी किती वर्षे लागतील ? अंकगणितीय श्रेणीवाढ आणि भूमितीय श्रेणीवाढ समान नसते. याला फार वर्षे लागतील. पण, बेडूक कितीही फुगला तरी बैल होणार नाही.‌ तोपर्यंत परिस्थिती वाट पाहणार काय ? आणि, मी थोडीच वाट पाहणार आहे ! मी जाण्यापूर्वी माझ्या समाजाला काहीतरी दिले पाहिजे, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण, हा समाज आतापर्यंत दलित, पीडित, शोषित राहिला आहे. तुम्ही बोलता हे खरे की खोटे, बरे की वाईट, हा प्रश्नच नाही.‌ तुम्ही बोलत आहात म्हणूनच माझा समाज ते ऐकणार नाही. तेव्हा, जाण्यापूर्वी मला याची काहीतरी व्यवस्था करायची आहे."

बाबासाहेब कम्युनिस्टांचेही किती कडवे विरोधक होते, हेही याच संवादादरम्यान स्पष्ट झाले आहे. आता समाज जागृत झाला आहे, हे सांगताना ते म्हणाले- "या नवजागृतीमध्ये एक प्रकारची चीड, आवेश असणे स्वाभाविक आहे. आणि, अशा प्रकारचा जो समाज असतो, तो कम्युनिझमचा भक्ष्य बनतो्. कम्युनिस्टांचा बळीचा बकरा बनतो. शेड्यूल्ड कास्ट समाज कम्युनिझमच्या आहारी जावा असे मला वाटत नाही. त्यामुळे त्याला कुठेनाकुठे तरी वळविणे राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मला आवश्यक वाटते. पण एक लक्षात ठेव. दलित आणि कम्युनिझम यांच्या मध्ये आंबेडकर अटकाव आहे. सवर्ण हिंदू आणि कम्युनिझम यामध्ये गोळवलकर अटकाव आहे.  काय, बरोबर आहे की नाही ? म्हणून मी जाण्यापूर्वी समाजाला दिशा देऊ शकलो नाही, तर कम्युनिझमकडे जाणारा एक मोठा वर्ग तयार होईल आणि त्यांना पुन्हा आपल्या राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट करून घेणे तुम्हा लोकांना जमावयाचे नाही !"

विरोधी भूमिका मांडतानाही किती संयत, पण सुस्पष्ट आणि ठाम विचार. आरोप, त्रागा, शिव्याशाप असे काहीही नाही. तरीही दृढ निश्चय व्यक्त. संविधानाचे सतत नाव घेणारे संविधानकारांचा हा गुण घेतील, तो भारतीय समाजासाठी, लोकशाहीसाठी सुदिन ठरेल !

या संवादाच्या तीन वर्षे आधी, १९५३ च्या जून महिन्यात संघाचे पदाधिकारी मोरोपंत पिंगळे, बाळासाहेब साठे, प्रा. ठकार आदी औरंगाबाद (आता संभाजीनगर) येथे जाऊन बाबासाहेबांना भेटले, तेव्हाही ते तेवढेच परखड होते. ते मोरोपंतांना म्हणाले- "मी तुमच्या ओटीसीला (संघ शिक्षा वर्ग) भेट दिली, तेव्हा तुमची जी शक्ती होती, तीत इतक्या वर्षात पाहिजे तितकी प्रगती झालेली दिसत नाही. प्रगतीचा वेग फार मंद दिसतो. माझा समाज इतकी वर्षे वाट पाहायला तयार नाही !"

१९३५ मध्ये, ज्या वर्षी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली त्याचवर्षी, बाबासाहेबांनी पुण्याच्या संघ शिक्षा वर्गाला भेट दिली आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्याशी चर्चा केली. १९३७ मध्ये तर कऱ्हाड येथील विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी भाषण सुद्धा केले. १९४८ च्या सप्टेम्बरमध्ये त्यांची श्रीगुरुजींशी दिल्लीत भेट झाली होती. गांधीहत्येनंतर संघावर घातलेली बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरही एक होते.

याचा अर्थ हा की, संघ हिंदूंचे संघटन असूनही बाबासाहेब द्वेषपूर्ण वागतबोलत नसत. त्यांचा विरोध मुद्यांवर आधारितच असे. संवादाचे दरवाजे बंद करण्याचा किंवा काहीबाही बोलत सुटण्याचा बाष्कळपणा न करताही विरोध/भूमिका मांडता येते, हे सर्वात उत्तम तऱ्हेने त्यांनीच दाखवून दिले. 

संघाला डिवचण्यासाठीच त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन नागपूरला घडवून आणले, असा अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवरील समारंभातच खुलासा केला. अगदी प्रारंभीच ते म्हणाले की- "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेनेचे नागपूर हे केन्द्र आहे आणि म्हणून मी त्यांना चिडवण्याकरिता नागपूर निवडले, असा आरोप करणाऱ्यांची कल्पना खोटी व द्वेषप्रेरित आहे. नागपूरची निवड शास्त्रशुद्ध आणि एक ऐतिहासिक सत्य चरितार्थ करण्याच्या कामनेतून केली आहे." (नागपूरची नागवंशीय बौद्ध परंपरा, या पृष्ठभूमीवर हे स्थान निवडण्यात आले होते। ही गोष्ट जगजाहीर आहे.)

विरोध करतानाही संयम पाळणारे आणि संवाद टिकविणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठे अन् आजच्या काळात द्वेषपूर्ण राजकारण करणारे चव्वन्नी छाप नेते कुठे !  🕉️

(दत्तोपंत ठेंगडी लिखित "आपले बाबासाहेब" पुस्तिकेच्या आधारे साभार)

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.