निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......४.
निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......४.
दीपक देशपांडे.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती च्या स्त्री उमेदवाराला संधी मिळणार असल्याने सारे लक्ष त्या व्यक्तीकडे व निवडणुकीकडे लागले आहे कारण ती मीनी मंत्रालयाची निवडणूक आहे, पंचायत समितीचेही पद महिलेसाठी राखीव झाले असले तरीही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा पारा अधीक चढू लागला असल्याचे वातावरण सध्या जिल्हाभरात दिसू लागले असून विविध राजकीय पक्षाच्या कार्यालयांना सुगीचे दिवस आले असून कार्यकर्ते या कार्यालयात येरझारा घालू लागले आहेत , त्यामुळे या कार्यालय परिसरातील चहाटपरीवाले आणि पानटपऱ्यांवरही गर्दी वाढू लागली आहे.
निवडणुका तोंडावर आल्याने गणेश मंडळ आणि शारदा दूर्गा मंडळांना भरपूर देणगी आणि डीजेचा कर्णकर्कश आवाजातील विसर्जन सोहळा सगळ्यांनीच अनुभवला होता त्यामुळे यानिमित्ताने आणि निवडणूक संग्राम लक्षात घेऊन राजकीय मंडळी आपण वेगवेगळ्या समाजासाठी कार्यरत आहोत जनतेच्या प्रश्नांची आपल्याला किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी दररोज काही ना काही उपक्रमांच्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि आहेत. हाताशी धरलेल्या काही प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींकडून आपल्या हिताचे वृत्त प्रकाशित करवून आणून ते आपल्या पहिल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते /पदाधिकारी यांचे वतीने समाज माध्यमांवर वायरल केले जात आहेत. तर काही अती हौशी पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः ची आणि कुटुंबातील इतरांची प्रसिद्धी यंत्रणा स्वतःच सांभाळत असल्याचे समाजमाध्यमांचा आढावा घेतला असता दृष्टीपथास येत आहे ,तर काही आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी काॅपी,पेस्ट करून समाजमाध्मांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने या पदावर डोळा ठेवून आजवर मार्गक्रमण करणाऱ्या भल्याभल्या दिग्गजांना मात्र चांगलीच धोबीपछाड लावली असून त्यापैकी बरीच मंडळी नगराध्यक्ष पदासाठी आपल्यासौभाग्यवतींना पुढे करुन आपली राजकीय कारकीर्द पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत तर काही मंडळी आपल्या राजकीय कारकीर्दीची शेवटची निवडणूक म्हणत नगरपरिषद उपाध्यक्ष पदावर नजर खिळवून या निवडणूकीत आपली ताकद अजमावून बघण्याचा प्रयत्न करणार हे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
जसजशी ही निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसतशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपण स्वबळावर निवडणूक लढवू म्हणजे आपल्या अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवू शकतो अशीही स्वप्नं पडू लागली असल्याने पक्षापक्षात अधिकाधिक दावेदार तयार होऊ लागले असल्याचे चित्र दिसत आहे.
कालपर्यंत कुठल्याही मंचावर , कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या किंवा कुणाच्या तरी नेतृत्वात सहभागी होणाऱ्या मंडळींना देखील यावेळी आपल्या प्रभागात किंवा नगराध्यक्ष पदावर दावेदारी सांगणाऱ्यांची संख्या वाढली असून उमेदवारी मागीतलेल्या पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही इतर स्वबळावर निवडणूक लढवू म्हणणाऱ्या पक्षांकडून उमेदवारी मिळू शकते हा विचार करून समरांगणात उमेदवारांची भाऊगर्दी वाढू शकते , याबाबत कुणाच्या मनात शंका नाही.
यावेळी भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये खरी लढत होणार असा सूर लावणाऱ्या जनतेला आता ही निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिली नाही याचा साक्षात्कार प्रभागांचा व वार्डाचा फेरफटका मारला असताना व तेथे उपलब्ध पोस्टर व बॅनर बघितल्यावरच लक्षात येते.
याच फेरफटक्यात एकेका पक्षातील गटबाजीआणि पक्षनेतृत्व यांच्यातील असंमजस्यामुळे उद्भवणारी अदृश्य शक्ती हीदेखील चिंतन करायला लावणारी न ठरली तरचं नवल.
दोन परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या दोन प्रमुख राजकीय पक्षातील स्थानिक नेतृत्वातील जवळीक आणि त्यांची दिलजमाई एका राजकीय पक्षाला कमजोर करण्यासाठी कारणीभूत ठरु शकते याबाबत नागरिक रंगवून चर्चा करीत आहेत, ही बाब नक्कीच राजकीय पटलावर वरीष्ठांना चिंतन करायला लावणारी आहे. यावेळी नऊ वर्षांच्या दीर्घ काळानंतर आपल्या मतांचे मुल्य करणारी ही निवडणूक
बाकी सगळ्यांसोबत आपणही एंजॉय करायची बाकी दुसरे काय?
पण..
आपले अमुल्य मत कुणाच्या चारदोन रुपयांसाठी आपली अक्कल गहाण ठेवून विकायचे नाही ही बाब आपण निश्चितच ध्यानात ठेवायची आहे.
बाकी आपली मर्जी.......!
दखल मतदार राजाची
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment