शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-२ एक टक्का स्वयंसेवकांचे लक्ष्य.
शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-२
एक टक्का स्वयंसेवकांचे लक्ष्य.
🕉️ संघ स्थापन करण्याची कल्पना डॉ. हेडगेवार यांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून, प्रामुख्याने नागपूरकर भोसल्यांचे राज्य इंग्रजांनी हिसकावल्याच्या संतापातून सुचली, असे स्पष्टपणे जाणवते. हे राज्य परत मिळवायचे असेल तर (म्हणजे स्वातंत्र्यासाठी) निष्ठावान स्वयंसेवकांची फौज उभी करावी लागेल, हे त्यांनी इंग्रजांच्याच उदाहरणावरून हेरले. यासंदर्भात संघाचे गाढे अभ्यासक दिलीप देवधर सांगतात- ‘‘इंग्लंडमधील एक टक्का इंग्रज भारतावर राज्य करतात. देशनिष्ठा, शिस्त आणि स्वत:ला झोकून देऊन काम करणे, या गुणत्रयींच्या भरोशावर इंग्रजांनी हे यश प्राप्त केले आहे. आपणही एक टक्का भारतीयांना प्रशिक्षित स्वयंसेवक बनविले, तर इंग्रजांकडून राज्य परत मिळवून आपला देश आपल्यालाच चालविता येईल, हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी संघ सुरू केला आणि स्वत:च्या हयातीत पंधरा वर्षात (१९२५ ते १९४०) देशभरात सातशे शाखा आणि एक लाख स्वयंसेवक गोळा करण्यात यशही प्राप्त केले.’’
संघ परिवार
संघाचा खरा विस्तार केला तो गोळवलकर गुरुजींनी. त्यांनी सलग तेहत्तीस वर्षे (१९४० ते १९७३) पायाला भिंगरी लावल्यासारखे देशभ्रमण केले. देशाच्या प्रत्येक भागात वर्षभरात किमान दोन दौरे (सरकार्यवाहांचाही एक दौरा) या वेगाने त्यांनी अख्खा भारत पालथा घातला आणि संघकार्य वेगाने वाढविले. शाखांची आणि स्वयंसेवकांची संख्या दहापट (म्हणजे ७ हजार शाखा, १० लाख स्वयंसेवक) करण्यात ते यशस्वीही झाले. परंतु हेडगेवारांचे एक टक्क्याचे लक्ष्य गाठणे सहजसोपे नाही, असे लक्षात येताच त्यांनी '‘संघ परिवार’' हा प्रयोग हाती घेतला. स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संस्था-संघटना उभारण्याचा सपाटाच त्यांनी लावला आणि देशभरात लाखो स्वयंसेवक/सहानुभूतिदार मिळविले. आज संघ परिवाराच्या तीन डझनावर संस्था कार्यरत आहेत आणि त्यातील बहुतांश श्रीगुरुजींच्या काळात सुरू झाल्या आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या कार्याचा आवाका आणि झपाटा याची कल्पना येते.
संघाची सुरुवात हिंदू संघटन म्हणून झाली हे खरे. मात्र, हेडगेवारांच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेत सर्व भारतीयांचा समावेश होता. उपासनापद्धती वेगळी असली तरी प्रत्येक भारतीय हा व्यापक अर्थाने हिंदूच आहे आणि त्यांचे ‘आपले’ राज्य हिंदुराष्ट्रात अभिप्रेत आहे, या भूमिकेची खूणगाठ मनाशी बांधूनच त्यांनी संघ सुरू केला. तथापि, त्याचा पाया मजबूत करण्यासाठी श्रीगुरुजींनी '‘स्वत:चे घर आधी दुरुस्त करू’' हा फॉर्म्युला वापरला. त्यामुळे त्यांचा भर हिंदू धर्मावर होता. ते स्वत: आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. रामकृष्ण परमहंस यांच्या, पश्चिम बंगालमधील सारगाछी आश्रमात जाऊन त्यांनी स्वामी विवेकानंदांचे गूरुबंधू स्वामी अखंडानंद यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. तेथून परतले नसते तर ते रामकृष्ण मठाचे स्वामीच झाले असते.परंतु, आपले हिंदूंचे आणि संघाचे भाग्यच थोर की ते नागपूरला परत आले आणि पुढील आयुष्य त्यांनी संघासाठी वेचले. लौकिकार्थाने हिंदू असलेल्यांनाच संघाकडे ओढण्याचे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. विरोधकांच्या विषारी टीकांचे हलाहल पचवित श्रीगुरुजींनी संघाच्या बीजांकुराचे वटवृक्षात रूपांतर करून दाखवले. नंतरच्या ५० वर्षांमध्ये एक टक्क्याचे लक्ष्य गाठून आणि संस्थापकांचे स्वप्न पूर्ण करून संघाने शताब्दी साजरी केली, इतका महावटवृक्ष संघाचा झाला आहे, यात शंका नाही. #२
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment