अवघे ९८ वयमान...!
अवघे ९८ वयमान...!
या आहेत द्रौपदी विष्णू जोशी. फक्त ९८ वर्षांच्या तरुण हो, तरुणच. कारण, आज सकाळी त्यांनी चक्क एका समारंभाचं अध्यक्षपद भूषविलं. घरून व्हीलचेअरवर त्या कार्यक्रमस्थळी आल्यावर त्याच स्थितीत अध्यक्षीय जबाबदारी पार पाडण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि साध्या प्लास्टिक खुर्चीवर एक तासापेक्षा जास्त काळ त्या प्रसन्नवदनानं बसल्या ! या आजी आजही स्वत:ची कामं स्वत: करून घेतात ! फक्त फार वेळ बसणं त्यांना अडचणीचं जातं, एवढंच. यांना वयोवृद्ध कोण म्हणेल हो !
माझ्या मुलीच्या पुण्यातील घरच्या मुक्कामात या विलक्षण आजीचा अनुभव घेता आला, टिंगरेनगरच्या न्याती एन्व्हिरान हाऊसिंग सोसायटीत. येथील रहिवासी, माझे ज्येष्ठ मित्र दत्तात्रेय मगर यांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोसायटीतील सर्व कर्मचाऱ्यांना स्वत:तर्फे मिठाई वाटप केलं. त्याचं अध्यक्षपद भूषवून जोशी आजींनी आम्हा सर्वांनाच अचंबित केलं. त्यांनी शताब्दी पार करावी, अशा शुभेच्छा आपण सारे त्यांना देऊ या.
या कार्यक्रमाचं आणखी एक विशेष म्हणजे, आजीच्या सूनबाई लताताई जोशी आणि त्यांच्या दोन नाती सान्वी आणि सिया यांनी उत्स्फूर्तपणे संगीताची मैफिलच सादर केली ! लताताईंच्या सुरेल शारदास्तवनानं कार्यक्रम सुरू झाला. नंतर त्यांनी दोन आणि त्यांच्या नातींनी दोन गाणी म्हटली. आणखी एका भगिनीनेही गाणं सादर केलं. मिठाई वाटपाला अचानक संगीताचा सुरेल साज चढवला गेल्यानं उपस्थितांना "मिनी दिवाळी पहाट"च अनुभवायला मिळाली.
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment