शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-१..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुसऱ्या शतकाच्या प्रारंभी.....
ही बारा भागांची लेखमाला...शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-१.
मराठमोळा संघ जगभर पसरला
मराठी माणसांनी सामूहिक प्रयत्नातून केलेला जागतिक दर्जाचा चमत्कार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ! संघासारखी मोठी, जीवनाची अनेक क्षेत्रे व्यापणारी स्वयंसेवी संघटना जगात दुसरी नाही. गेली शंभर वर्षे अविरत कार्य करीत या संघटनेने काल २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी (स्थापनेची मूळ आंग्ल तारीख २७ सप्टेम्बर १९२५) शतक पूर्ण केले आहे. या यशात मराठीजनांचा वाटा सिंहाचाच आहे. या एकमेवाद्वितीय संघटनेची मुहूर्तमेढ मराठी माणसांनीच नागपुरात रोवली आणि तिच्या संचालनात आजतारखेपर्यंत तेच अग्रेसर आहेत.
शंभर वर्षांतील ६ सरसंघचालकांपैकी ४ जण (तात्पुरते डॉ. परांजपे धरून ५) मराठी आहेत, तसेच सरकार्यवाह सुद्धा बहुतांश मराठीच. RSS network चा मुख्य आधारस्तंभ असलेल्या प्रचारकांमध्येही सर्वाधिक भरणा मराठी भाषकांचाच, नागपूर-पुणे परिसरातील युवकांचा राहिला आहे. यावरून, अनोख्या संघाचा झेंडा जगभर फडकविण्याची कामगिरी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्यांनी चोखपणे पार पाडली, हे सत्य नाकारता येणारे नाही.
संघाचे संस्थापक आणि आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे मूळचे तेलगुभाषी. पण आधीच्या पिढ्यांपासून नागपुरात राहिल्यामुळे हे कुटुंब मराठी बनून गेले. ते मराठी संस्कारातच वाढले, शिकले, लढले आणि शेवटी नागपूर कर्मभूमीतच विसावले. त्यांच्या हयातीतच अल्पकाळ तात्पुरते सरसंघचालक राहिलेले डॉ. ल. वा. परांजपे, नंतरचे माधव सदाशिव उपाख्य श्रीगुरुजी गोळवलकर, मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस आणि सध्याचे डॉ. मोहनराव मधुकरराव भागवत हे सारे मराठी सरसंघचालक. (या सर्वांनी मिळून संघाच्या शंभर वर्षातील ८० वर्षे सरसंघचालकपद सांभाळले आहे.) देवरस आणि भागवत यांच्या दरम्यान १५ वर्षे दोन अमराठी सरसंघचालक झाले- प्रो. राजेन्द्रसिंह उपाख्य रज्जूभय्या आणि कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शनजी. सरकार्यवाहपदही बहुतांश काळ मराठी माणसांकडेच राहिले. (१६ पैकी १३ सरकार्यवाह मराठी) यावरून संघाच्या उभारणीत आणि प्रसारात मराठीजनांचे योगदान किती मोठे आहे, हे सहज लक्षात येते.
असे असले तरी, संघ महाराष्ट्रापुरता किंवा मराठीभाषकांपुरता मर्यादित राहिला नाही. उलट, भारताच्या सीमा ओलांडून तो आता इंग्लंड-अमेरिकेत आणि अन्य देशांमध्येही पोहोचला आहे. याचे कारण, डॉ. हेडगेवारांचे द्रष्टेपण. भारतभरातील संपूर्ण हिंदू समाज डोळ्यापुढे ठेवून त्यांनी संघाचे नामकरण ‘राष्ट्रीय’ असे केले आणि पुढच्या सर्व सरसंघचालकांनी संस्थापकाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. नव्हे, ते पूर्ण करून दाखविले.
प्रारंभीच्या अर्धशतकात सर्व प्रमुख पदाधिकारी आणि प्रचारक प्रामुख्याने मराठी होते. डॉक्टरांच्या काळात भारतभर पाठविण्यात आलेले प्रचारक मुख्यत: नागपूर-पुणे भागातूनच गेले आणि त्यांनी संघाचा मजबूत पाया रचला. पण नंतर देशाच्या सर्व भागातून, सर्व भाषांमधून संघाचे प्रचारक निघाले आणि त्यांनी देशाच्या कानाकोपर्यात संघाच्या शाखांचे विशाल जाळे निर्माण करून संघ जगातही नेऊन पोहोचवला ! १.
✍️ विनोद देशमुख.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment