शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-१२. .....कुछ मीठा, कुछ खट्टा !
शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-१२.
.....कुछ मीठा, कुछ खट्टा !
--🕉️ भाजपा हा संघ परिवाराचा सर्वाधिक चर्चित आणि जनतेसमोर सतत येणारा चेहरा आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात विश्व हिंदू परिषदेने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते खरे. मात्र, भाजपा राजकीय पक्ष असल्याने तो सातत्याने लोकांच्या नजरेत राहतो. संघाचे सारेच स्वयंसेवक भाजपात नाहीत. परंतु जे स्वयंसेवक राजकारणात आहेत, ते सर्वच्या सर्व प्रामुख्याने भाजपातच आहेत. परिणामी, संघ माहीत नसलेले सर्वसाधारण लोक भाजपाकडेच संघ म्हणून पाहतात ! संघविरोधकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. याची भाजपाला अनेक वर्षे किंमत मोजावी लागली आणि आता त्याच संघामुळे भाजपाला "अच्छे दिन" आले, ही वस्तुस्थिती आहे.
संघ-भाजपा संबंध साधारणत: सौहार्दाचेच आहेत. परंतु कधी विपरीत घडून तणावही निर्माण झाले. लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानात गेले असताना बॅ. जिनांबद्दल जे बोलले, त्याने या संबंधात तणाव आला. देशाची फाळणी करणार्या जिनांचे उदात्तीकरण संघाला मान्य होणे शक्यच नव्हते. अडवाणी सर्वात ज्येष्ठ भाजपानेते असूनही त्यांना याची किंमत मोजावी लागली. पक्षाध्यक्षपद गेले. पुढे पंतप्रधानपदावरचा दावा गेला. हे सारे संघामुळे घडले, असे लोकांना वाटते. परंतु, त्याच संघामुळे नरेन्द्र मोदी गेली 11 वर्षे पंतप्रधान आहेत, हे मात्र खुल्या दिलाने मान्य करण्याची विरोधकांची तयारी नसते. त्यामुळे भाजपाच्या संदर्भात संघ नेहमीेच श्रेय-अपश्रेयाच्या कैचीत सापडलेला असतो आणि तरीही तो आपले काम शांतपणे, निष्ठेने करीत राहतो.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना रंगेहाथ सापडले, तेव्हा एकच गदारोळ झाला. "नापास स्वयंसेवक" अशा शब्दात संघावर टीका झाली. बंगारू लक्ष्मण राजकारणात असल्याने हे घडले, हा संदर्भ हेतुपूर्वक नजरेआड करण्यात आला. भाजपात सगळेच स्वयंसेवक नाहीत. संघाशी संबंध नसलेलेही लोक आहेत. परंतु, त्यांच्याही कृतीचे खापर संघावर फोडण्याची पद्धत विरोधकांनी रूढ केली आहे. त्याला तोंड देत संघ पुरून उरला आणि दुसऱ्या शतकात पोहोचला, हेच संघाचे यश !
मात्र, जेव्हा संघातीलच कोणी भाजपाला अडचणीत आणतो, तेव्हा फार पंचाईत होते ! सरसंघचालक रज्जूभय्या यांनी एका भाषणात सोनिया गांधींचा उल्लेख ‘‘गोरी चमडीकी विदेशी लडकी’’ असा केला, तेव्हा संघ आणि भाजपा दोघांचीही अडचण झाली होती. नंतरचे सरसंघाचालक सुदर्शनजी यांनी तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाच ‘मुखवटा’ संबोधून खळबळ उडवून दिली होती. संघाने ज्या संयमाने ही सर्व प्रकरणे हाताळली, त्याला तोड नाही. हे विरोधकांनी संघाकडून शिकण्यासारखे आहे ! विपरीत परिस्थितीतही संयमित वाटचाल, हा संघाच्या शतकी प्रवासाचा मुख्य गाभा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
संघाचे मराठी उगमस्थान लक्षात घेता, मराठी नेता देशाचा प्रमुख व्हावा, असे परिवारातील मराठीजनांना आणि त्या त्या नेत्यांच्या इतरही चाहत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. असा पहिला आशेचा किरण प्रमोद महाजन यांच्या रूपाने राजकीय क्षितिजावर उदयास आला होता, हे कोणीच अमान्य करणार नाही. दुर्दैवाने विचित्र घटनेत त्यांचा अपमृत्यू झाल्याने ही संधी हुकली. 2014 पासून मात्र पुन्हा मराठीजनांच्या आशा पल्लवित होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये देशभर रस्ते-पुलांचे जाळे विणून नितीन गडकरी संपूर्ण देशात लोकप्रिय झाले आहेत. दुसरीकडे, याच काळात एक तडफदार मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्र फडणवीस यांची प्रतिमा तयार झाली आहे. यामुळे परिवार, चाहते आणि विशेषत: वैदर्भीय जनतेच्या मनात आशेचा अंकुर फुटला असल्यास नवल नाही. संघाच्या दुसऱ्या शताब्दीच्या प्रारंभकाळात नागपूर मुख्यालयाचे भाग्य फळफळते का, तेच आता पाहायचे ! # १२(समाप्त)
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment