शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी- ९ ..संघाच्या कार्यालयांमध्ये नमाज !
शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी- ९
..संघाच्या कार्यालयांमध्ये नमाज !
🕉️ मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना संघाच्या जवळ आणण्याच्या संदर्भात सुदर्शनजींच्या कारकीर्दीत मोठी प्रगती झाली. चर्चच्या नेत्यांना भेटण्यासाठी सुदर्शनजी किती उत्सुक असायचे, याचा एक मार्मिक किस्साच मा. गो. वैद्य आवर्जून सांगायचे. संघ कार्यालय किंवा चर्च याव्यतिरिक्त तिसर्या स्थानी भेटू या, असा संघाचा प्रस्ताव ख्रिश्चन धर्मगुरूंनी अमान्य केला आणि चर्चमध्येच भेटण्याचा हट्ट धरला. तो मान्य करून सुदर्शनजी चर्चमध्ये गेले. "सर्व धर्म समान आहेत, हे मान्य केले तर ख्रिश्चनही संघात येऊ शकतील", असे त्यांनी या भेटीत स्पष्ट केले. कारण, सर्वांना समान मानणारा प्रत्येक जण हिंदुत्वाच्या व्यापक व्याख्येत बसतो, ही संघाची भूमिका आहे. आम्हाला हिंदुराष्ट्रही त्याच अर्थाने अपेक्षित आहे, असे वैद्य ठासून सांगायचे.
या पार्श्वभूमीवर, गोळवलकर गुरुजींच्या विचारधन ग्रंथात मुस्लिम आणि ख्रिश्चन हे शत्रू असा उल्लेख कसा झाला, असा प्रश्न अनेक संघप्रेमींना आणि विरोधकांनाही पडतो. त्याचे उत्तरही संघाजवळ तयार आहे. विचार आणि मूल्ये दोन प्रकारची असतात. शाश्वत आणि काळानुरूप. मुस्लिम आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांचा भारतातील इतिहास, बळजबरीने धर्मांतर, देशाची फाळणी झाली त्यावेळचे अत्याचार आदींचे कालसापेक्ष वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. परंतु आज परिस्थिती खूप बदलली आहे. त्यानुसार मतपरिवर्तन शक्य आहे. कालातीत मूल्यांवर ठाम राहून प्रासंगिक गोष्टींमध्ये बदल करण्याची लवचीकता संघात प्रथमपासूनच असल्याने 'विचारधन' मधील काळानुरूप उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय घेणे सहजशक्य झाले. लोकांना त्याचे आश्चर्य वाटते, हा भाग वेगळा !
संघ मुसलमानांचा शत्रू असल्याचे विकृत चित्रण हेतुपूर्वक केले जात असताना, त्याच संघाच्या कार्यालयांमध्ये मुस्लिमांनी नमाज अदा करण्याचा चमत्कारही घडलेला आहे ! काही मुस्लिम नेते चर्चेसाठी दिल्लीच्या झंडेवाला कार्यालयात आले असतानाच नमाजाची वेळ झाली. तेव्हा, "आम्ही मशिदीत नमाज पढून परत चर्चेला येतो", असे सांगत मंडळी उठली. पण, "आपल्याला हरकत नसेल तर येथेच नमाज पढू शकता", हा सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा प्रस्ताव ऐकून ते सारे चाटच पडले ! नंतर त्यांनी कार्यालयातच नमाज अदा करून चर्चा पुढे सुरू केली. सुदर्शनजींच्या काळात तर नागपूरच्या संघ मुख्यालयातच (हेडगेवार भवन) नमाज झाला ! विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनीही मदरशाला भेट देऊन सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याची कल्पनाही कोणी करणार नाही असे दीपप्रज्वलन, वंदेमातरम्, राष्ट्रगीत यांचे गायन असे उपक्रम मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमांमध्ये सुरू झाले आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला आहे.
एकूण, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचे गैरसमज दूर करून, त्यांना हिंदुराष्ट्र संकल्पनेत सामावून घेण्याचा प्रयत्न संघ गेले अर्धशतकभर (मधला 20 वर्षांचा काळ सोडता) प्रामाणिकपणे करीत आहे. त्यालाा चांगली फळे येताना दिसताच संघविरोधक (कॉंग्रेस, समाजवादी, डावे, धर्मवादी-जातीयवादी पक्ष, तसेच संबंधित काही धर्मगुरू) त्यांची माथी भडकविण्याचा आणि आपल्या व्होट बॅंकला भडकविण्याचा स्वार्थी कार्यक्रम सातत्याने राबवून यात अडचणी आणण्याचे प्रयत्न करताना दिसतात. तथापि, संघाची संयमित कार्यपद्धती आज ना उद्या यावर मात करील, असा मला विश्वास वाटतो. कारण त्याला दुसरा पर्याय राहिलेला सध्यातरी दिसत नाही. # ९
✍️ विनोद देशमुख
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment