शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-६. ....प्रचारक आणि संघटन मंत्री.

 शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-६.

....प्रचारक आणि संघटन मंत्री

🕉️  संघशाखेप्रमाणेच प्रचारक हे संघाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. आजच्या भाषेत चोवीस बाय सात विनावेतन संघकार्य करणारे असे प्रचारक जगात दुसर्‍या कोणाकडेही क्वचितच असतील. शाखेपासून सेवाकार्यापर्यंत सर्व कामांमध्ये संजीवनी फुंकण्याची जबाबदारी या प्रचारकांकडे असते आणि हे काम ते सातत्याने इमानेइतबारे करीत असतात. याचा कुठलाही मोबदला, मानधन, वेतन त्यांना मिळत नाही. मात्र, त्यांची संपूर्ण जबाबदारी संघ स्वीकारतो. अशा हजारो प्रचारकांचे जाळे गेले शतकभर अविरत कार्यरत आहे. त्यांनीच संघ जगविला, वाढविला, विविध क्षेत्रांमध्ये नेला. या प्रचारक व्यवस्थेनेच देशाला दोन पंतप्रधानही दिले- स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे नरेंद्र मोदी !

प्रचारक अविवाहित, म्हणजे विनापाश असावे, ही अट आहे. त्यामुळे ते संपूर्ण झोकून देऊन काम करू शकतात आणि संघाने ते सिद्ध करून दाखविले आहे. प्रारंभीच्या काळात जनसंघ उभारणारे पं. दीनदयाल उपाध्याय, जनता पार्टीचे शिल्पकार नानाजी देशमुख, भाजपाचे संस्थापक अटलबिहारी आणि लालकृष्ण अडवाणी, विवेकानंद शिला स्मारकाचे ‘सब कुछ’ एकनाथजी रानडे, भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी, विश्‍व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंघल आदी सारे मान्यवर राष्ट्रीय नेते संघाच्या प्रचारक यंत्रणेनेच देशाला दिले. प्रचारक नसलेले, पण स्वयंसेवक असलेले बाळासाहेब देशपांडे यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून मोलाची कामगिरी केली. अशी कामे उभारणारे शेकडो-हजारो स्वयंसेवक देशभर आहेत.

मागणाऱ्यांना माणूस देऊ !

--संघ प्रत्यक्ष राजकारणापासून दूर आहे. संघाचे पदाधिकारी, प्रचारक राजकारणात भाग घेत नाहीत. ज्याला राजकारणात सहभागी व्हायचे आहे किंवा अन्यत्र लाभाचे पद घ्यायचे आहे, त्याला संघातील पद सोडावे लागते. हा नियमच आहे. याला अपवाद जवळजवळ नाही. एकच अपवाद आतापर्यंत झाला. तो म्हणजे लाला हंसराज गुप्ता यांचा. ते दिल्लीचे संघचालक होते आणि त्याचवेळी अनेक वर्षे महापौरही होते. गोळवलकर गुरुजींनी त्यांना  अपवादात्मक विशेष परवानगी दिली होती. असे आणखी एखाददुसरेच उदाहरण देशभरात कदाचित असेल किंवा नसेलही.

तथापि, परिवारातील कोणत्याही संस्थेला संघटक हवा असेल तर तो संघातून देण्याची परंपराच आहे. विशेषत: पूर्वी जनसंघात आणि आता भाजपात वेगवेगळ्या स्तरांवर, अगदी जिल्हा कार्यकारिणीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटन मंत्री भाजपाला संघ पुरवतो. यावर, सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या दिल्लीतील त्रिदिवसीय (सप्टेंबर २०१८) कार्यक्रमात प्रश्‍नही विचारण्यात आला होता की- "संघ फक्त भाजपालाच संघटन मंत्री का देतो ?" त्यावर क्षणार्धात उत्तर मिळाले- ‘‘ते मागतात, त्यांना देतो ! इतरांनी मागितल्यास त्यांनाही देऊ !!’’ याचा अर्थ, संघटन मंत्र्याचे महत्त्व आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.

संघटन मंत्री किती मोलाची कामगिरी बजावू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत घडले. कालपर्यंत जेथे भाजपाचे नामोनिशाण दिसत नव्हते, त्या त्रिपुरात कम्युनिस्टांची पाव शतकाची सत्ता उलथवून भाजपा एकदम सत्तेवरच आली. या चमत्काराचे शिल्पकार होते सुनील देवधर. मूळचे संघाचे प्रचारक. याआधी आसामच्या विधानसभा निवडणुकीतही असाच चमत्कार घडला. आणि पुढे तर या दोन्ही राज्यांमध्ये याची पुनरावृत्तीही झाली.

वर्षानुवर्षांच्या सलग प्रयत्नांचे हे फळ आहे आणि संघाच्या प्रचारकांनी सेवाकार्यांच्या माध्यमातून याचा पाया मजबूत केला आहे. ईशान्य भारतात, जेथे जायला सहसा कोणी तयार होत नाही तेथे, तीस-तीस वर्षांपासून संघाचे प्रचारक संघकार्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सेवाकार्यात गुंतलेले आहेत. त्यातून त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मनात आपुलकी, प्रेमभाव, विश्‍वास निर्माण करण्यात यश मिळविले. या तयार भूमीवर राजकारणाच्या चिखलात कमळ फुलवणे सहजशक्य झाले, हे भाजपालाही अमान्य करता  येणार नाही. हा सारा समन्वय संघटन मंत्र्याच्या मार्फतच होत असल्याने या पदाला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  # ६

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.