खलबत्ता:-विनोद देशमुख. पाकिस्तान तर आमचंच घर.
खलबत्ता:-विनोद देशमुख.
पाकिस्तान तर आमचंच घर
"बंड्या, आज मी तुझी इतिहास-भूगोलाची तोंडी परीक्षा घेणार आहे", असं म्हणत गुरुजींनी प्रश्न विचारला- "सांग बरं, आपल्या देशाच्या सभोवताल असलेल्या देशांपैकी आपले कट्टर शत्रूराष्ट्र कोणते ?"
"पाकिस्तान" ताडकन् उत्तर देत बंड्या म्हणाला- "पण गुरुजी, बांगलादेशही आता शत्रू झाल्यासारखा आहे. त्याला आपणच जन्माला घातलं हे विसरून तेथील जनता आणि राज्यकर्ते बेईमान झाल्यागत वागत आहेत."
गुरुजी : एकदम बरोबर. भारत स्वतंत्र झाल्यापासूनच पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान हे आपले शत्रू आहेत. 1971 मध्ये आपण पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देऊन बांगलादेश बनविल्यानं 2023 पर्यंत ते आपले मित्र राहिले.पण 2024 च्या जुलैमध्ये युवकांनी उठाव करून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना हुसकावलं, तेव्हापासून बांगलादेशातील जनता आणि नवे हंगामी सरकार यांचं भारतविरोधी वाकडं शेपूट आहे !
बंड्या : म्हणजे पुन्हा पूर्वीसारखंच झालं ना गुरुजी. दोन शत्रू- एक पश्चिमेला अन् दुसरा पूर्वेला. एक पाकिस्तान, तर दुसरा बांगलादेश. भारतके दोनो कंधोंपे फिरसे दुष्मन !
हे दोघं बोलत असतानाच पम्या कडमडला अन् बंड्याकडे संशयानं पाहत विचारू लागला- "काय गुजगुज सुरू हाय तुही गुरुजीसोबत ? आजकाल तुहवालं लय सूत जमून राह्यलं गुरुजीशी !"
बंड्यानं खुलासा केला त पम्या म्हणते कसा- "पाकिस्तानच आपलावाला एक नंबर शत्रू हाय. आपरेशन सिंदूरनं कंबरडं मोडलं तरी त्याची खोड जात नाय. आशिया कप किरकेट पाह्यलं न. कसे करत होते पाकडे !"
यावर गुरुजी म्हणाले- "अरे हो, पण आपले नेते मात्र तसे नाहीत, दिलदार आहेत. ओव्हरसीज (म्हणजे भारताबाहेरील) काँग्रेसचे प्रमुख सत्यनारायण गंगाराम पंचाल उर्फ Sam पित्रोदाच बघा. त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेश येथं गेलं की कसं घरी आल्यासारखं वाटतं, हायसं वाटतं ! तसं ते जाहीरपणे म्हणाले सुद्धा.
बंड्या-पम्या : पण गुरुजी, पाकिस्तान आणि बांगलादेश आपलं घर कसं होऊ शकते ? ते तर आपल्यावर नेहमी खार खाऊन असतात. आपल्याशी भांडण उकरून काढतात. दहशतवादी, रोहिंगे घुसखोर आपल्या देशात पाठवतात. बॉम्बस्फोट घडवून माणसं मारतात.
गुरुजी : मुलांनो, ते सर्व खरं असलं तरी एक गोष्ट तुम्ही विसरता. भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत (1947) हे देश आपलाच भाग होते ना. संपूर्ण अखंड भारत हे आपलंच घर होतं. ते पुन्हा पूर्ववत् व्हावं, असं अजूनही अनेक भारतीयांना वाटत असतं. त्याच भावनेतून Sam भाऊ बोलले असू शकते !
"तसं असेल तर मग भाजपावाले Sam
काकावर आगपाखड का करताहेत, त्यांना भलबुरं सुनावताहेत", पोट्ट्यांचा भाबडा प्रश्न !
गुरुजी : "ते त्यांचं राजकारण आहे अन् तुम्हाला नाही समजणार बे ते ! आपण मात्र Sam काकासोबतच राहिलं पाहिजे आणि अखंड भारताचं स्वप्न कसं पूर्ण होईल ते पाहिलं पाहिजे. Sam काका आगे बढो ! हम तुम्हारे साथ है !!"
बिच्चारे बंड्या-पम्या, त्यांच्या डोक्याचा भुगा झाला अन् गुरुजीला नमस्कार करून ते चालते झाले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment