आयुष्यातले सांगाती.... २९ प्रा. बी. टी. देशमुख

 आयुष्यातले सांगाती.... २९

प्रा. बी. टी. देशमुख



पत्रकार म्हणून विधिमंडळात वृत्त संकलन करताना लोकप्रतिनिधींचे काम जवळून बघण्याचा योग आला. मात्र सभागृहात आपले स्थान न सोडता फक्त सांसदीय आयुधांचा वापर करून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक  करून घेणारे अभ्यासू आक्रमक लोकप्रतिनिधी मी एकच पाहिले, ते म्हणजे प्रा.भाऊराव तुळशीराम उपाख्य बी. टी. देशमुख.

बी.टी. देशमुख हे विधिमंडळ परिसरात आणि प्रशासनातही बी. टी. सर म्हणूनच ओळखले जात होते. लोकप्रतिनिधी त्यांना बी. टी. भाऊ म्हणायचे. आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे त्यांचा अगदी पिठासीन अधिकाऱ्यांवर सुद्धा वचक असायचा.  प्रशासनावर तर त्यांचा धाक होताच. एखाद्या मुद्द्यावर बी.टी. सर सभागृहात बोलायला उभे राहिले की समोर अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसलेले सर्वच अधिकारी सावरून बसलेले आम्ही पत्रकार आमच्या गॅलरीतून बघायचो.

बी.टी देशमुख हे प्राध्यापकांचे नेते म्हणून पुढे आले होते. सुरुवातीला विदर्भात नागपूर विद्यापीठ हे एकच विद्यापीठ होते. त्यावेळी नागपूर  युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन म्हणजेच नुटा ही प्राध्यापकांची संघटना कार्यरत होती. बी.टी. सर या संघटनेचे संस्थापक सदस्य होते. नंतर बरीच वर्ष त्यांनी या संघटनेचे नेतृत्व देखील केले होते. 

बी. टी. देशमुख हे नाव मी आधी ऐकून खूप होतो. मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता. तो योग आला १९८१ मध्ये. त्यावेळी अकोल्यात विद्यापीठाशी संलग्नित ग्रंथपालांचे अधिवेशन होते. त्याच्या समारोपाचे दूरदर्शनसाठी चित्रीकरण करण्यासाठी मी अकोल्याला गेलो होतो. तिथे समारोप समारोहाचे बी टी सर प्रमुख अतिथी होते, तर नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्राध्यापक वासुदेवराव काळमेघ हे अध्यक्ष होते. तिथे बी टी सरांचा माझा पहिला परिचय झाला. त्या दिवशी त्या कार्यक्रमात सरांचे भाषण ऐकून मी चांगलाच प्रभावित झालो होतो. 

नंतर वर्षभरात म्हणजेच १९८० च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी अमरावती पदवीधर मतदार संघातून बी टी देशमुख पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांचा जनसंपर्क लक्षात घेता ते दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर मग पुन्हा कधीमधी आमच्या भेटी होऊ लागल्या. मात्र फारसा परिचय असा झाला नव्हता. 

१९९६ पासून मी विधिमंडळात वृत्त संकलन करू लागलो. त्यावेळी विधान परिषदेतच वृत्त संकलन करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मग तिथे बी टी देशमुख यांचा आक्रमक बाणा मी दररोजच अनुभवू लागलो. त्या काळात नागपुरात तर मी वृत्त संकलन करतच होतो. मात्र त्याचवेळी त्याचबरोबर मी दै. गावकरीसाठी मुंबईतही विधान परिषदेचे वृत्तसंकलन करायला जात असे. त्यावेळी घरी माझे वृद्ध आई-वडील असल्यामुळे मी दर शुक्रवारी कामकाज संपले की रात्रीच्या विदर्भ एक्सप्रेस ने नागपूरला यायला परत निघत असे आणि रविवारी दुपारच्या विदर्भाने परत मुंबईला जायला निघायचो, जेणेकरून सोमवारपासूनचे कामकाज मला कामकाजात मला उपस्थित राहून वृत्तसंकलन करता येत असे. गाडीत माझे आरक्षण थ्री टायर मध्ये असायचे. याच गाडीत आमदारांसाठी एक विशेष एसी टू टायरचा कोच लागत असे. बहुतेक सर्व आमदारांशी मैत्री असल्यामुळे ते आमदार मला त्यांच्या कोच मध्ये बोलावून घ्यायचे आणि तिथेच माझी सोय करून द्यायचे. मग या सर्व मंडळींशी गप्पा मारत, रात्री आपापले डबे उघडून सहभोजन करत माझा प्रवास होत असे. याच कोचमध्ये बहुतेक वेळा बी टी देशमुख सर असायचे. 

बी.टी. देशमुख सर हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. त्यामुळे आमदार कोच मध्ये चालणाऱ्या राजकीय गप्पांमध्ये त्यांना फारसा रस नसायचा. मग बरेचदा ते आमदार कोच मध्ये आरक्षण न करता एसी टू टायरचा जो रेग्युलर कोच असे, त्यात आपले आरक्षण करत असत. मग तिथे जाऊन मी त्यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारत असे. सरांजवळ माहितीचा अक्षरशः खजिनाच होता असे म्हटले तरी वावगे ठरू नये. सभागृहात उपस्थित करावयाच्या प्रत्येक समस्येमध्ये ते अगदी खोलात जात आणि अभ्यास करत असत. त्या काळात वेगळ्या विदर्भाची मागणी अधून मधून डोके वर काढत असे. बी टी सरांचा वेगळ्या विदर्भाला ठाम विरोध होता. मी मात्र वेगळ्या विदर्भाचा समर्थक, मग एकदा गाडीत असाच आमचा विषय निघाला तेव्हा बी टी सरांनी शांतपणे त्यांची भूमिका मला समजावून दिली होती." त्याचं काय आहे अविनाशराव, विदर्भ विकासात मागासला आहे यात वादच नाही. त्यामुळे विदर्भ वेगळा करा असे तुम्ही विदर्भवादी म्हणता, मात्र विदर्भ वेगळा झाला तर विकासासाठी तुम्ही पैसा कुठून आणणार?" त्यावर मी उत्तर दिले "अविकसित राज्य म्हणून केंद्र सरकार निधी देईलच ना." "तुमचे उत्तर एकदम मान्य अविनाशराव, पण तो निधी पुरेसा राहणार नाही, आणि महाराष्ट्राने आतापर्यंत विदर्भावर जो अन्याय केला आहे, त्याचा अनुशेष बघितला तर तो त्या केंद्राकडून मिळणाऱ्या निधीपेक्षा खूप कमी राहील. त्यापेक्षा महाराष्ट्रातच राहून महाराष्ट्र सरकारकडून भांडून जास्तीत जास्त निधी कसा मिळवून घेता येईल याकरता आपण प्रयत्न का करू नये" सरांचे हे उत्तरही कुठेतरी पटणारे होते.  सर फक्त एवढे बोलूनच थांबले नव्हते, तर त्यांनी राज्यातील मागास भागाच्या विकासासाठी राज्य सरकारने पुरेसा विधी द्यावा यासाठी त्यांनी सभागृहातील सर्वपक्षीय आमदारांचा एक मंच स्थापन केला होता. त्यात बी टी देशमुखांसह नितीन गडकरी, दिवाकर रावते, रणजीत देशमुख अशी सर्व दिग्गज मंडळी होती. ही सर्व मंडळी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुद्धा विविध संसदीय आयुधांचा वापर करून सरकारचे लक्ष वेधत असत, आणि विदर्भाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करत असत. सरांच्याच प्रयत्नातून तत्कालीन राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांनी घटनेचे ३७१ कलम वापरून मागास भागांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत आदेश काढले होते आणि राज्य सरकारची अडचण निर्माण केली होती. त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे रिमोट कंट्रोल असणारे शरद पवार यांनी देखील आता राज्यपालांना असे अधिकार असावेत का हा विचार करून घटना दुरुस्ती करावी लागेल असे विधान केले होते. 

या मुद्द्यावर सर सत्ताधारी पक्षाला कायम अडचणीत आणत असत एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागास भागासाठी पुरेशी तरतूद नाही या कारणासाठी त्यांनी विरोधकांना एकत्र आणत चक्क राज्य सरकारचे नियोजन विधेयकच फेटाळले होते नेमका तो अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि त्या वेळेपर्यंत विधानसभेचे कामकाज संपून गेले होते मग राज्य सरकारला नियोजन विधेयक पुन्हा नव्याने पारित करून घेण्यासाठी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे लागले होते.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे बी टी सरांचे जीवनातले तत्व होते. एकदा प्रवासात बी टी सर आणि मी एसी टू टायर मध्ये अगदी समोरासमोरच्या बर्थवर होतो सरांची जेवणाची वेळ जरा लवकरची होती. मलाही त्यांनी जेवायचा आग्रह केला. मात्र मी नंतर जेवतो असे सांगून थोडा फिरायला गेलो. त्यावेळी सरांनी सांगितले माझ्या डब्यात साधी ज्वारीची भाकरी आणि झुणका असतो ते तुम्हाला चालणार नाही का? मी हसूनच माझी जेवणाची वेळ थोडी उशिराची असते असे सांगून बाजूला झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी सर पहाटेच उठले होते. उठल्यावर त्यांनी आपल्या बॅगमधून एक पाऊच काढला त्यातून कडुलिंबाची काडी काढून तिने आपले दात घासले मग बॅग मधूनच इलेक्ट्रिक शेविंग मशीन काढून तिने गाडीतच आपली दाढी करून घेतली. मी बर्थवर लोळूनच गंमत बघत होतो. त्यावर सर म्हणाले आता सात वाजता गाडी सीएसटीला पोहोचेल. तिथून आमदार निवासात गेलो की आंघोळ करून पुढल्या कामाला तयार होता येते. एका जवळ जवळ पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीचा इतका साधेपणा बघून मी निश्चितच आश्चर्यचकित झालो होतो. 

आयुर्वेदिक डॉक्टर्सच्या काही समस्यांबाबत बीटी सरांनी सभागृहात प्रदीर्घ लढा दिला होता. मात्र सरकार त्या मुद्द्यावर मानायला तयार नव्हते. त्यातही वैद्यकीय शिक्षण विभाग तयार झालाही होता मात्र अर्थ खाते त्याला मंजुरी देत नव्हते. त्या मुद्द्यावर बी टी सरांनी अनेकदा तारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना अशा मांडल्या. शेवटल्या लक्षवेधीच्या वेळी सरकारने काहीही उत्तर द्यायचे नाकारले तेव्हा सर अक्षरशः संतापले. संतापाच्या भरात त्यांनी जाहीर केले की या प्रकाराचा निषेध म्हणून मी सभागृहात पिठासीन अधिकाऱ्यांकडे म्हणजेच सभापतींकडे आता पाठ करून उभा राहणार. त्याप्रमाणे ते लगेच तसे उभे राहिले. ते बघून विरोधी पक्षातील इतर सदस्य सुद्धा तसेच उभे राहिले. परिणामी त्यादिवशी वारंवार सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. 

१९८० पासून विधान परिषदेचे सदस्य असलेले बीटी देशमुख हे सर्वात जास्त काळ सदस्य राहिले होते. ते पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून गेले आणि तीस वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळाला. १९९८ मध्ये सभागृहात अशी परिस्थिती निर्माण झाली की सभापती आणि उपसभापती दोघांचीही पदे रिक्त झाली होती. या दोन्ही पदांची निवड होण्यासाठी काही वेळ जाणार होता. दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार होते. त्यावेळी मग सभागृहात किमान सभापती तरी हवा म्हणून मग सर्वात ज्येष्ठ असलेल्या बी टी देशमुख यांना सभापती म्हणून शपथ देण्यात आली. त्यांनी हंगामी सभापती म्हणून सहा दिवस सभागृहाचे कामकाज सांभाळले होते. मग त्यांनी सभापतींची निवडणूक घेतली. प्रा. ना स फरांदे यांना सभापती म्हणून विराजमान केले आणि मगच त्यांनी आपले सदस्य म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर एकदा विदर्भ एक्सप्रेसनेच जाताना असाच विषय निघाला, तर गमतीत सर म्हणाले एरवी मी अपक्ष सदस्य, त्यामुळे मला कोण सभापती करणार होते. ज्येष्ठतेमुळे सहा दिवसाची संधी मिळाली. तिचे मी सोने करण्याचा प्रयत्न केला इतकेच. 

विधिमंडळात अनेकदा कधी सत्ताधारी तर कधी विरोधी सदस्य गोंधळ घालतात आणि सभागृहाचे कामकाज रोखून धरतात. बी टी सरांना या प्रकाराची अतिशय चिड होती. मला आठवतं नागपूर अधिवेशन सुरू असताना त्यावर्षी असे सभागृहाचे कामकाज रोखून धरण्याचे प्रकार सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांकडून वारंवार होत होते. त्यामुळे बी टी सर फार अस्वस्थ होते. एक दिवस असेच कामकाज तहकूब झाले असताना कॅन्टीन समोरच्या वरांड्यात सरांची माझी भेट झाली. तिथे सहजच कामकाज तहकूब होण्याबद्दल मी विषय काढला. तेव्हा सरांनी जवळजवळ दहा मिनिटे आपली स्पष्ट आणि परखड मध्ये मते मला ऐकवली होती. मग त्या चर्चेवरच आधारित मी लगेचच त्याच दिवशी एक बातमी बनवून पाठवून दिली. ती बातमी दुसऱ्याच दिवशी  वृत्तपत्रात प्रकाशितही झाली. दोन दिवसांनी त्या वृत्तपत्राची प्रत आल्यावर मी बीटी सरांना आवर्जून ते दाखवलेही होते. तेव्हा मग "काय अविनाशराव आपल्या सहज मारलेल्या गप्पांची तुम्ही बातमी बनवून टाकलीत" म्हणून त्यांनी माझे कौतुकही केले. 

विविध समस्यांवर सरकारला धारेवर धरण्यात बीटी सरांचा हातखंडा होता. कधी कधी ते संतापून जायचे. एकदा जयंत पाटील अर्थमंत्री असताना एका मुद्द्यावर जयंत पाटील यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले. त्यावेळी बीटी सर प्रचंड संतापले आणि त्यांनी सभात्याग केला. ते लगेचच घाईघाईने बाहेर निघून कॅन्टीन कडे जात असावेत. तितक्यात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. समोरच अमरावतीचेच एक मंत्री सुनील देशमुख यांचे दालन होते. तिथे सर जाऊन बसले आणि त्यांची अस्वस्थता एकदमच वाढली. शेवटी तिथल्या कर्मचाऱ्यांनी लगेचच डॉक्टरला बोलावले तेव्हा अति संतापाने सरांना हृदयविकाराचा झटका आला होता. लगेचच त्यांना डॉ. माहूरकरांच्या क्लिनिकमध्ये भरती करण्यात आले. तेथे लगेचच अर्थमंत्री जयंत पाटील त्यांना भेटायला गेले. योगायोगाने आम्ही काही पत्रकारही तिथे पोहोचलो होतो. तिथे जयंत पाटील यांना समोर बघून सर एकदम भावविव्हळ झाले. जयंतराव मी तुमच्यावर उगाच संतापलो पण काय करू? त्या मुद्द्यावर निर्णय घ्यायला हवा होताच, म्हणून माझा राग होता. तुमच्याबद्दल व्यक्तिगत काहीही नाही, असे सांगून सरांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जयंत पाटील यांनीही "सर तुम्ही मनात काहीही आणू नका. आधी तुमची प्रकृती सुधारू द्या" मग आपण या प्रश्नावर चर्चा करू. आता तुम्ही आराम करा असे सांगून शांत केले होते. 

१९८० ते २०१० असे जवळजवळ ३० वर्ष सर विधान परिषदेत सदस्य होते. विदर्भात काही चुकीचे होत असले तर ते लगेचच संतप्त व्हायचे. विदर्भात विशेषतः अमरावती अकोला परिसरात राज्य शासनाने खाजगी क्षेत्रात विद्युत निर्मिती प्रकल्पांना परवानगी दिली होती. त्यामुळे त्या भागातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती होती. बी टी सरांनी त्या मुद्द्यावर प्रचंड रान उठवले होते. परिणामी तत्कालीन काँग्रेसी मंत्री चांगलेच नाराज झाले होते. २०१० ची पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागली तेव्हा बीटी सरांचे विरोधक आणि ज्या उद्योगपतींना खाजगी क्षेत्रात परवानगी हवी होती असे उद्योगपती सर्व एकत्र आले आणि बीटी सरांना पराभूत कसे करता येईल हाच प्रयत्न केला गेला. त्यामुळे सर या निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले. हा निकाल साधारणतः दुपारी चार साडेचार च्या सुमारास जाहीर झाला. सरांनी लगेचच घरी येऊन बॅग भरली आणि संध्याकाळच्या विदर्भ एक्सप्रेस ने मुंबईला रवाना झाले. तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचताच त्यांनी राज्य शासनाकडून आमदार म्हणून मिळालेली खोली रिकामी केली आणि किल्ल्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवून संध्याकाळच्या गाडीने ते परत निघाले. दोन दिवसांनी सर नागपूरात भेटल्यावर त्यांनी मी लगेचच खोली सोडली ही माहिती दिली. अनेकदा मंत्री किंवा आमदार खासदार पदावरून मुक्त झाल्यावर देखील अनेक महिने सरकारी बंगले किंवा खोल्या रिकामे करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर सरांचे हे उदाहरण अगदी अनापेक्षित होते. 

त्यानंतर सरांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. कारण ते नागपुरात फारसे येत नाहीत. आले तरी एखाद दिवसासाठी आणि मी सुद्धा अमरावतीला गेलो तर असाच एका दिवसासाठीच जातो. त्यामुळे प्रत्यक्ष भेट नसली तरी अधून मधून फोनवर बोलणे होते. मला आजही विधिमंडळाच्या संदर्भात काही माहिती हवी असली तर मी हक्काने सरांना फोन करतो, आणि ते देखील मला कोणतेही आढेवाढे न घेता हवी ती माहिती पुरवत असतात. 

सर माझ्यापेक्षा वयाने बरेच ज्येष्ठ आहेत. बऱ्याच मुद्द्यांवर आमचे वैचारिक मतभेद देखील आहेत. तरीही त्यांनी आमचे हे मैत्र आजही जपले आहे. सरांच्या आक्रमक अभ्यासू वृत्तीमुळे सभागृहात विरोधकांशी देखील त्यांची चांगली मैत्री होती. मला आठवते सरांचा पराभव झाला त्यावेळी भाजपचा उमेदवार निवडून आला होता. मी नितीन गडकरींना प्रतिक्रिया विचारली, तेव्हा गडकरी म्हणाले भाजपचा उमेदवार निवडून आला याचा निश्चित आनंद आहे. मात्र बी.टी. देशमुख यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा पराभव झाला याचे निश्चित दुःख देखील आहे. यावरूनच संसदीय कामकाजातले सरांचे महत्त्व काय होते हे लक्षात येते. अशा या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची माझे मैत्र जमले आणि ते आजही टिकले याचा मला आनंदच आहे. 

        अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.