नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा चंद्रघंटा.
नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा चंद्रघंटा.
माहुरगडावरुन
शारदीय नवरात्रोत्सवाची आज तिसरी माळ. दुर्वा, झेंडु
आजची नवदुर्गा..चंद्रघंटा,
आजचा रंग निळा 🔵
पिंडजप्रवरारूढ़ा, चंडकोपास्त्रकैर्युता ।
प्रसादं तनुते मह्मं, चंद्रघंटेति विश्रुता ॥
आज देवीच्या चंद्रघंटा रुपाचे पूजन.. आराधना होणार. चंद्राची शितलता मनाला लाभणार. देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करणार.
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥
चंद्रासमान आभा असलेली, जिचे यश दैदीप्यमान आहे, तिन्ही लोकात देव जिची पूजा करतात, जी उदार, दारिद्र्य नष्ट करणारी ही देवी आहे, असे श्री सूक्त सांगते. गणेश भक्तीत जसे अथर्वशीर्ष महत्व आहे तसेच देवीच्या भक्तीत हेच श्री सूक्त. ऋग्वेदाचे हे खील अर्थात नंतर समविष्ट परिशिष्ट.
चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात आणतो. मन सतत चंद्राच्या कलांप्रमाणे आकुंचित प्रसारित होत असते. या देवी रुपाच्या आराधनेने आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात.. आपले मन, व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिकच. आज देवीला दुध.. दुधाचे पदार्थ याचा नैवेद्य अर्पण करणार.
जीवनात सगळेजण प्रामाणिकपणे कष्ट करतात. पण यशस्वी तेच होतात ज्यांना मातोश्रीने अर्थात आदिशक्तीने आपले म्हटले आहे. त्यांच्याकडे शुभ लक्ष्मी येते.. अलक्ष्मी येत नाही आणि त्यांचाच विकास होतो तेच सुख अनुभवतात असे महायोगी अरविंद म्हणतात.
आदिशक्तीने आपले म्हणून कुणावर कृपादृष्टी केली की जगाला तो चमत्कार वाटतो. विदर्भातील प्रज्ञाचक्षु अशा संत गुलाबराव महाराजांचे घडलेले व्यक्तीमत्व त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान निर्माण केलेले साहित्य हे अगदी कालपरवाचे उदाहरण. आईच्या कृपेचे उदाहरण.
सह्याद्रीतील माहुर गड. हे विदर्भ.. मराठवाड्याच्या सीमेवरचे गाव. देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक तिर्थस्थळ. त्रेता युगात असलेली ही श्री रेणुका माता म्हणजे भगवान परशुराम यांची माता. श्री रेणुका माता मंदिर म्हणजे देशातील लाखो परिवाराची कुलदेवी मंदिर.
तसेच माहुर हे श्री दत्तात्रयांचे निद्रास्थान.. निवासस्थान. रेणुका मातेच्या मंदिरासह जमदग्नी ऋषी, अत्री ऋषी.. अनुसया.. परशुराम यांचे वास्तव्य स्थान. दत्तशिखर.. अनसुया शिखर तसेच मातृतिर्थ.. सर्वतिर्थ प्रसिद्ध. आजही जिथे वाघ आहेत असे जंगल.. पहाडातील गाव.
या जंगलाने वेढलेल्या गडाच्या पायथ्याला एका झोपडीत रेणुका आईच्या नित्य दर्शनासाठी संत विष्णुदास राहायचे. अशा निर्जन ठिकाणी राहून उन.. वारा पावसाची पर्वा न करता रोज मोठे चढावाचे अंतर पार करुन आईचे आणि दत्ताचे दर्शन घ्यायचे. पण त्यांना कधीच कशाचे भय नव्हते. त्यांना आईचे दर्शन लाभले. त्यांनी अलौकिक प्रतिभेने लिहलेली देवीची आणि दत्तात्रयांची कवने हा भक्ती साठी मोठा ठेवाच आहे.
नवरात्राचा आनंद ज्याप्रमाणे नित्य नूतन रंगात न्हाऊन निघतोय तसाच देवीच्या आरती गायनाने हा आनंद व्दिगुणीत होतोय. नवरात्रात घरोघरी भक्त देवीच्या पाच, सात, अकरा आरती म्हणतात. कधी तर ताल संगतीसह. प्रत्येक घरात सुगम.. सुमधूर चालीच्या अशा साधूसंतांच्या अद्वितीय प्रतिभेची साक्ष देणाऱ्या आरती शेकडो वर्षे उपलब्ध आहेत.
प्रत्येक आई म्हणजे विश्वासाचा.. मायेचा प्रतिशब्दच !.. रेणुका देवी ही तर जगताची माता !.. हाच मातृभाव देवीच्या भक्तीत असतो.
ही जगन्माता मानवाला जगताना प्रचंड आत्मबळ देते. प्रसंग कसाही उदभवो, क्षणात मदतीला धावत येणार ही भक्ताला खात्री असते. जी काही इच्छा मनी धरली ती पुर्ण करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी आहे. भक्त आजन्म या आईच्या मायेच्या सावलीत सुरक्षीत राहतात. भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करणारी ही आई म्हणजे कल्पवृक्षच, असे स्वानुभवाने संत विष्णूदास म्हणतात.
माझी रेणुका माऊली,
कल्पवृक्षाची साऊली ।
जैसी वत्सालागी गाय
तैसी अनाथांची माय ॥१॥
हाकेसरशी घाई घाई
वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात,
नाही आळस मनात ॥२॥
खाली बैस घे आराम,
*मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने
वारा घाली पदराने ॥३॥
‼️या देवी सर्वभूतेषु माँ चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता‼️
‼️नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼️
*२४.०९.२०२५
संकलन -अभय बक्षी नागपूर
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment