संघ शताब्दी निमित्त स्मरण श्रीगुरुजींनी रचला राममंदिराचा पाया...
संघ शताब्दी निमित्त स्मरण
श्रीगुरुजींनी रचला राममंदिराचा पाया...
✍️विनोद देशमुख
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा आजच्या दिवशी २७ सप्टेम्बर १९२५ रोजी लागून संघाचा शुभारंभ झाला. त्याची तारखेनुसार आज शताब्दी, त्यानिमित्ताने. भारताच्या माथ्यावरील सर्वात मोठा कलंक ठरलेल्या अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या विध्वंसानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांनी अत्यंत दूरदृष्टीने विश्व हिंदू परिषद स्थापन करून या कार्याला चालना दिली. त्याची यंदा एकसष्टी नुकतीच झाली आहे.
मोठ्या माणसांची स्वप्नंही मोठीच असतात. आणि, श्रीगुरुजी यांच्यासारख्या महापुरुषाची स्वप्नं तर मोठी असणारच. एक सबल हिंदू समाज, हे त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं. या ध्येयासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. दिवसरात्र एक करून झपाटल्यागत काम केलं. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लावलेलं हिंदू संघटनेचं रोपटं मोठ्या वृक्षात परिवर्तित करण्यासाठी तब्बल ३३ वर्षे संपूर्ण भारत कितीदा तरी (वर्षातून किमान दोनदा) पायाखाली घातला, हजारो माणसांशी संवाद-संपर्क केला आणि हिंदूंचं एक मजबूत सामाजिक-सांस्कृतिक संघटन उभं केलं. त्याची फळं आपल्याला खायला देत तोच संघ आज शतकपूर्ती करीत आहे. याबद्दल समस्त हिंदू समाजानं श्रीगुरुजींचं कायम ऋणी राहिलं पाहिजे, एवढं त्यांचं योगदान आणि कर्तृत्व मोठं आहे.
असंच योगदान श्रीगुरुजींनी हिंदू धर्माच्या पातळीवर, स्वत: संत-महंत नसतानाही दिलं आणि आजच्या राममय भारतवर्षाचा पाया रचला, बरोब्बर ६१ वर्षांपूर्वी. त्या कर्तृत्वाची षष्ट्यब्दी गतवर्षी साजरी होत असतानाच अयोध्येत श्रीरामाचं बहुप्रतीक्षित, भव्यदिव्य मंदिर साकारलं, हा 'हीरक' योगच होता. श्रीगुरुजींच्या स्वप्नाची पूर्तता २२ जानेवारी २०२४ रोजी बालकरामाच्या (रामलला) नेत्रदीपक प्राणप्रतिष्ठेनं झालेली आपण सर्वांनी पाहिली.
हिंदूंचा स्वाभिमान शतपटीनं वाढविणारा हा सोहळा अनेक मान्यवरांच्या निश्चयामुळे आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शक्य झाला, हा आता इतिहास आहे. बाबरी मशिदीच्या जागीच पुन्हा राममंदिर झालं पाहिजे, या संकल्पाचे मार्गदर्शक बाळासाहेब देवरस (तत्कालीन सरसंघचालक), प्रमुख योजनाकार मोरोपंत पिंगळे, आंदोलनांचे सूत्रधार अशोकजी सिंघल (विश्व हिंदू परिषद), अंमलबजावणीकार चम्पत राय (विहिंप), न्यायालयीन लढ्याचे प्रमुख के. पाराशरन्, चळवळीचे प्रसारक लालकृष्ण अडवानी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा यांच्यासह शेकडो-हजारो कार्यकर्त्यांमुळे आणि लाखो-कोटी भाविकांमुळे हा सोनेरी क्षण हिंदूंना अनुभवता आला. परंतु, याचं बीजारोपण श्रीगुरुजींनी ६१ वर्षांपूर्वीच विहिंपच्या रूपात केलं, हेही विसरता येणार नाही.
विश्व हिंदू परिषद ही समस्त हिंदूंची पहिली आणि एकमेव प्रातिनिधिक धार्मिक संघटना आहे आणि तिचे संकल्पनाकार श्रीगुरुजीच होते. ते स्वत: आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू (रामकृष्ण परमहंसांचे शिष्य) स्वामी अखंडानंद यांचं शिष्यत्व त्यांनी काही काळ पत्करलंही होतं. संघात आल्यावर एवढा मोठा व्याप सांभाळत असतानाही हिंदूंच्या धार्मिक संघटनेचा विषय श्रीगुरुजींच्या मनात सतत घोळत होता. संघकार्याच्या दरम्यानच ते विविध पंथ-संप्रदायांच्या हिंदू धर्माचार्यांशी संपर्क साधून संघटनेचा विषय पुढे नेत होते. जातपातविरहित सर्व हिंदूंचंच नव्हे, तर उर्वरित तीनही भारतीय मुळाच्या धर्मांचं (बौद्ध, जैन, शीख) व्यापक आणि सक्षम धार्मिक संघटन उभारणं, हे त्यांचं ध्येय होतं. चारही धर्मांच्या कर्त्याधर्त्यांच्या गळी ही कल्पना उतरविण्यात ते यशस्वी झाले आणि १९ ऑगस्ट १९६४ रोजी मुंबईत विश्व हिंदू परिषदेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
श्रीगुरुजींच्या प्रयत्नांमुळे चारही धर्मांचे संत-महंत-आचार्य विहिंपच्या स्थापनेला आवर्जून हजर होते. स्वामी चिन्मयानंद, दादासाहेब आपटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, दलाई लामा, मास्टर तारासिंग आदींनी विहिंपच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं. एवढंच काय, के. एम. मुन्शी, रामस्वामी अय्यर यांच्यासारखे कॉंग्रेस नेतेही याचे साक्षीदार होते.
"विहिंप हे चारही भारतीय धर्मांचं महासंघटन आहे. कारण, हिंदू हे फक्त एका धर्माचं नाव नसून, भारतीय मुळाचे चारही धर्म, तसंच देशातील समस्त आदिम समाज यांचा तो व्यापक परिचय आहे," असं श्रीगुरुजींनी प्रास्ताविकातच स्पष्ट केलं. "मूळ भारतीयांचे धार्मिक अधिकार अबाधित ठेवणं, मठं-मंदिरांचं संरक्षण करणं, गोहत्या आणि धर्मांतर या अनिष्ट प्रथांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणं, त्यादृष्टीनं सरकारवर दबाव आणणं या कामांना विहिंपनं वाहून घेतलं पाहिजे," असं सांगत त्यांनी विहिंपच्या कार्याचा अजेंडाच सेट करून दिला.
-आणि, बरोब्बर २० वर्षांनी, १९८४ साली विहिंपनं पहिला मोठा प्रकल्प हाती घेतला; तो म्हणजे श्रीरामजन्मभूमीची मुक्ती ! त्यावर्षी कोसी यात्रा काढून शरयूतीरी प्रतीकात्मक रामपूजा करण्याच्या प्रयत्नातून विहिंपनं श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा शंखनाद केला. नंतर पुढे देशभर रामशिला पूजन, रामरथयात्रा, भाजपानेते लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा, पुढे अयोध्येत कारसेवा, बाबरी मशिदीचं पतन आणि न्यायालयीन लढाई या मार्गांनी जात विहिंपनं हा प्रश्न शेवटी धसास लावला आणि तब्बल ४० वर्षांनी, गेल्या वर्षीच्या २२ जानेवारीला रामलला (आता बालकराम) नव्या मंदिरात विराजमान झाले. हिंदूंसाठी गेल्या ५०० वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात झळाळणारा सुवर्णक्षण होता. आणि, त्याचं मूळ श्रीगुरुजींनी ६१ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या विहिंपमध्येच आहे, हे मान्य करावेच लागेल. त्या बीजाचा 'रामवृक्ष' होणं, ही श्रीगुरुजींच्या दूरदृष्टीची एकप्रकारे षष्ट्यब्दिपूर्तीच होय. संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त याची कृतज्ञतापूर्वक आठवण समस्त हिंदू समाजानं ठेवली पाहिजे. श्रीगुरुजींच्या या महान कार्याला शत शत नमन🙏
++++++++++
लेखकाचा खुलासा:-
स्थापनेनंतर सातव्या महिन्यात
झाले रा. स्व. संघाचे नामकरण
--------------------------
उद्या विजयादशमीला शताब्दी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली असली तरी, त्याचे बारसे मात्र सात महिने उशिराने १९२६ साली झाले ! २७ सप्टेम्बर १९२५ रोजीच्या स्थापनेनंतर १६ एप्रिल १९२६रोजी नव्या संघटनेचे नाव निश्चित करण्यात येऊन संघाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
नागपूरच्या महालातील जुनी शुक्रवारी भागात डॉ. हेडगेवार यांच्या घरी २७ सप्टेम्बर १९२५ रोजी १७ मान्यवरांच्या बैठकीत हिंदू संघटन स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परंतु, नाव आणि शाखा याबद्दल काही ठरले नव्हते. दररोज आखाड्यात तरुणांचा व्यायाम या रूपात संघ सुरू झाला होता. पुढील ६ महिने नाव आणि कार्यपद्धती यावर सतत विचारमंथन होऊन यावर निर्णय घेण्यासाठी पुन्हा एक बैठक १७ एप्रिल १९२६ रोजी झाली. त्यात "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हे नाव आणि दैनंदिन शाखा यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्याप्रमाणे पहिली शाखा, सध्याच्या संघ मुख्यालयालगत असलेल्या तेव्हाच्या मोहिते वाड्याच्या समोरील मैदानात २८ मे १९२६ रोजी भरली. याची आठवण म्हणून मोहिते वाड्याचे बुलंद प्रवेशद्वार आजही जोपासून ठेवले गेले आहे. अशा रीतीने स्थापनेपासून २०३ दिवसांनी शाखा सुरू होऊन संघाचे प्रत्यक्ष कार्य मार्गी लागले आणि उद्या शंभरी पार करून संघ दुसऱ्या शताब्दीत प्रवेश करीत आहे.
श्रीगुरुजींवरील २७ सप्टेम्बरच्या माझ्या लेखात "संघाची पहिली शाखा २७ सप्टेम्बर १९२५ रोजी लागून संघाचा शुभारंभ झाला" असा उल्लेख अनवधानाने झाला आहे. क्षमस्व.
दिनांक १ऑक्टोंबर २०२५.
@विनोद देशमुख
----------------------
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment