"खल"बत्ता !! विनोद देशमुख
"खल"बत्ता !!
विनोद देशमुख
हायड्रोजन (सल्फाईड) बॉम्बचा फुसका बारमाझं मूळ गाव राजुरा देशभर गाजवल्याबद्दल राहुल गांधींचे शतश: आभार ! मी ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो, त्याच शाळेतील आत्ताचे पोट्टे जाम खुश आहेत अन् मास्तरांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत बघा.
बंड्या : गुरुजी, आपल्या राजुऱ्याचं "नाव मोठं" करताना राहुलजी (बंड्याचं घर कॉंग्रेसवालं !) हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचं सांगत होते. ते काय असतं सांगा ना.
श्याम्या : अबे, ते मोठे मोठे देश हाय न अमेरिका-रशियासारखे, त्याइच्याकडं हाय हा बॉम्ब. दुष्मनी काढाले ते दुसऱ्या देशावर टाकून फोडत्यात हा बॉम्ब. खूप लोक मरत्यात म्हणे या बॉम्बनं.
गुरुजी : श्याम्यानं बरोबर सांगितलं बंड्या. हे बलवान देश साध्या बॉम्बपासून अणुबॉम्बपर्यंत मोठमोठी शस्त्रास्त्रे बाळगून इतर देशांवर दादागिरी करतात आणि आपला स्वार्थ साधून घेत असतात.
बंड्या : पण हा बॉम्ब आहे तरी काय गुरुजी ? आमाले त काहीच माहीत नाही. (हो, हो सांगा गुरुजी. रम्या, पम्या, दिग्या टोळीचा एकच गलका ! नंदू मात्र थोडा बाजूला उभा राहून हे सारं शांतपणे पाहत आहे. )
गुरुजी : अरे मुलांनो, हायड्रोजन बॉम्बमुळे मोठा विनाश होऊन गोंधळ उडतो. तसाच गोंधळ माझ्या आरोपानं उडेल, असा दावा करण्यासाठी राहुल गांधींनी तो शब्द वापरला असेल. खरा हायड्रोजन बॉम्ब ते कसा काय फोडणार ?
मुलांना गुरुजींचं म्हणणं पटलं. पण नंदू अस्वस्थ. त्याला वाटत होतं, गुरुजींनी रसायनशास्त्राच्या भाषेत हायड्रोजन मूलद्रव्याचे अणु-परमाणु वगैरे समजावून सांगावं. त्याऐवजी ते भलतंच सांगत होते. हे पाहून तोच स्वत:चं ज्ञान पाजळायला पुढे झाला.
नंदू : गुरुजी, हायड्रोजन बॉम्बचं सूत्र H2S तर नसेल ? 2 भाग हायड्रोजन आणि एक भाग गंधक यांच्या संयोगातून तयार झालेलं स्फोटक. गंधकामुळं हा बॉम्ब विनाशकारी होऊ शकतो, असं मला वाटतं.
गुरुजी : अबे नंद्या, लय हुशार झाला का बे ! H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड गॅस. कुजक्या, नासक्या, सडक्या वासाचा घाणेरडा वायू. (गावरान भाषेत...) त्याला तू हायड्रोजन बॉम्ब म्हणतो ? अन् मला रसायनशास्त्र शिकवतो का बे !
नंदू : राहुलबाबानं (नंदूच्या घरात सत्ताधारी भाजपाचं वातावरण) परवा असाच बॉम्ब फोडला ना गुरुजी. राजुरा विधानसभा निवडणुकीत भाजपानं 6 हजार बोगस मतदार घुसवले की कमी करवले, हेच समजत नव्हतं !
गुरुजी : निवडून आलेले आपले आमदार देवराव भोंगळे तर म्हणाले की, आम्ही आधीच तक्रार केली होती. मतदार वाढले किंवा रद्द केले, हे म्हणणं चुकीचं आहे. निवडणूक आयोग म्हणालं, आम्ही स्वत:च कारवाई करून या 6 हजार मतदारांची नोंदणी रोखली आणि पोलिस तक्रारही केली.
नंदू : याचा अर्थ, राहुलचा बॉम्ब फुसका निघाला अन् त्यानं विचका केला म्हणा ना. नेमकं काय घडलं हे राहुल नीट सांगू शकत नाहीये. "अगा जे घडलेचि नाही" नाटकाचा प्रयोग सादर झाला, असं म्हणावं का गुरुजी ?
यावर गुरुजी काही बोलायच्या आधीच सर्व पोट्टे ओरडले- "का घडलं ते समजलं आमाले. राहुल गांधीनं राजुऱ्याचं नाव देशभर चमकवलं खरं. पन त्याइचा बॉम्ब फुस्स झाला ! त्याइच्याच पार्टीचे मतं वाढले म्हणत्यात, तर आंगावरच आला ना बावा H2S चा कुजका-नासका-सडका वास ! आता कोनाले सांगता ?"
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment