इतिहास/विनोद देशमुख राजुरा तालुक्याची .. पाच जिल्ह्यात भ्रमंती.

 इतिहास/विनोद देशमुख

राजुरा तालुक्याची .. पाच जिल्ह्यात भ्रमंती.

राजुरा तालुका खासच आहे. अवघ्या ५५ वर्षांच्या कालावधीत दोन राज्ये आणि पाच जिल्ह्यांमध्ये फिरून गेली ६५ वर्षे तो चंद्रपूर जिल्ह्यात स्थिरावला आहे. त्या अफलातून भूतकाळाची ही गोष्ट...

प्रशासकीयदृष्ट्या २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश असलेल्या भारत देशात एकूण जिल्हे ८०० च्या वर आहेत आणि तालुक्यांची संख्या ७-८ हजारांवर आहे. यातील आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वीचा राजुरा (आता राजुरा, कोरपना आणि जिवती असे तीन तालुके) हा तालुका सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा लागेल. निझाम स्टेट मध्ये दोन जिल्हे, स्वातंत्र्योत्तर मराठी भाषिक राज्यात काही काळ स्वतंत्र जिल्ह्यासह आणखी दोन जिल्हे असा विचित्र प्रवास या तालुक्याने केला आहे. संपूर्ण देशात असा तालुका क्वचितच आढळेल. 

सतराव्या शतकातील गोळकोंड्याच्या कुतुबशाहीपासूनच राजुरा तालुक्याचा परिसर त्यांच्या ताब्यात होता. त्यावेळी कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील मामडा येथील आम्हा देशमुखांचे मूळ तेलुगू पूर्वज (गणेश त्र्यंबक मामडेकर) आदिलशहाकडे लढवय्ये सरदार होते. १६८६ मध्ये औरंगजेबाने आदिलशहाला हरविल्यामुळे ते बिदर सोडून गोळकोंड्याच्या कुतुबशाहीत स्थानांतरित झाले. तेव्हाच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना पश्चिम टोकावरील राजुरा भागाची (माथा) जहागीर सांभाळायला पाठवले. पुढे निझामशाहीतही जहागीरदार राहिलेल्या मामडेकरांना दोनशे वर्षांनी (१८८८) सहावा निझाम मिर महबूब अली खान सिद्दिकी याच्याकडून  देशमुखीची सनद मिळाल्याने त्यांचे आडनाव झाले देशमुख. याआधारेच आम्ही गणेश त्र्यंबक यांना राजुऱ्यातील देशमुखांचे पहिले मराठी पूर्वज मानतो. (सध्या आमची चौदावी पिढी सुरू आहे.) 

निझाम स्टेटचा संस्थापक पहिला आसफजाह चिन किलीच खान उर्फ निझाम उल् मुल्क याने १७२४ मध्ये आसफजाही राजवट सुरू केल्यानंतर पावणेदोनशे वर्षांनी, १९०५ मध्ये आसिफाबाद जिल्ह्याची निर्मिती होऊन राजुरा तालुका त्यात समाविष्ट करण्यात आला. (तोपर्यंत राजुरा कुठे होता, याची माहिती मिळत नाही.) पण, ४० वर्षांनी निझामानेच आसिफाबाद जिल्ह्याचा तालुका केला आणि नवीन आदिलाबाद जिल्ह्यात त्याच्यासह राजुऱ्याला घातले. हा राजुऱ्याचा दुसरा जिल्हा. (२०१६ पासून आसिफाबाद पुन्हा जिल्हा मुख्यालय झाले आहे. या जिल्ह्याचे नवे नाव कोमारम भीम.) 

हैदराबाद-मराठवाडा-राजुरा मुक्ती संग्रामानंतर १७ सप्टेम्बर १९४८ रोजी निझाम स्टेट खालसा होऊन भारतात विलीन झाले, तेव्हा राजुरा तालुका मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्याला जोडण्यात आला. हा तिसरा जिल्हा.‌ पुढे १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत राजुऱ्याचे भवितव्य अधांतरी झाले आणि १९६० पर्यंत हा तालुका स्वत:च एक स्वतंत्र जिल्हा होता. ("तालुके राजुरा, जिल्हे राजुरा" अशा महसुली नोंदी आहेत.) महाराष्ट्रात हा चौथा जिल्हाही जाऊन राजुरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट झाला आणि सध्या या पाचव्या जिल्ह्यात कोरपना, जिवती या तालुक्यांसह नांदत आहे !

एकच तालुका ५५ वर्षात पाच जिल्हे फिरल्याचे असे दुसरे उदाहरण वाचण्यात-पाहण्यात-ऐकण्यात आहे का कोणाच्या ? असे जिल्हा-पंचक साधणाऱ्या एकमेवाद्वितीय राजुरा तालुक्याचे पहिले आमदार (१९५२, मतदारसंघ आसिफाबाद) कोंडा लक्ष्मण बापूजी नंतर तेलंगणात स्थलांतरित झाल्यामुळे नव्या राजुरा मतदारसंघाचे पहिले आमदार (१९५७) बनले सुभाष धोटे यांचे वडील रामचंद्रराव धोटे. कोंडा लक्ष्मण वेगळ्या तेलंगणा आंदोलनात होते. वेगळ्या विदर्भासह दोन्ही आंदोलने संयुक्तपणे चालवावी, अशी त्यांची इच्छा होती व त्यांनी तसे प्रयत्नही केले. अगदी म्हातारपणी नव्वदीत त्यांनी तेलंगणासाठी दिल्लीत उपोषण केले होते. तेलंगणा वेगळा झाल्यावर त्यांच्या नावाने उद्यान विज्ञान (Horticulture) राज्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले. मात्र, संयुक्त आंदोलनाचे आणि वेगळा विदर्भ पाहण्याचे त्यांचे स्वप्न तसेच राहून गेले ना.

     विनोद देशमुख, नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.