हा खैळ राजकारणाचा..
हा खैळ राजकारणाचा..
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांच्या "शह- काटशह" या नव्या राजकीय कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज नागपुरात होत आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक कै. नीला उपाध्ये यांची प्रस्तावना लाभली आहे.
ही प्रस्तावना आज आमच्या वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
दीपक देशपांडे
संपादक
असे आढळते की सुस्थिती असली तर आपली परिस्थिती "जैसे थे" च राहावी अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. पण जीवनात "परिवर्तन" हे अटळ असते. निसर्गाप्रमाणेच माणसाच्या जगण्याचाही स्थायीभाव "बदल" हाच असतो. किंबहुना बदल हीच एकमेव गोष्ट जीवनात कायम असते. एकच वाटत राहते- प्रगतीसाठी कोणताही बदल करताना, ते बदल मूलभूत मानवी मूल्यांना डावलून कधीही केले जाऊ नयेत.
हे पथ्य पाळण्यासाठीच, आपल्या पूर्वजांनी जगताना समाजकारण, राजकारण यासारख्या निरनिराळ्या व्यवस्था निर्माण केल्या. राजेशाही, हुकूमशाहीनंतर जास्तीत जास्त व्यापक जनसमुदायाच्या कल्याणाकरिता लोकशाही व्यवस्था निर्माण केली गेली. लोकांचे, लोकांसाठीचे, लोकांनीच चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही- अशी तिची व्याख्या आपण अभ्यासक्रमात शिकलेले असतो. पण प्रत्यक्षात आजूबाजूला दिसतो तो निरर्गल राजकारणाचा खेळ. ज्याच्या हाती सत्ता- संपत्ती, त्यानेच हलवायची सत्तेच्या पटावरची प्यादी. मुळात ज्याच्यासाठी ती सत्ता राबवायची, तो सामान्य मतदार कोणाच्या खिजगणतीत तरी असतो का? 'सर्वदेवं नमस्कारम् , केशवम् प्रति गच्छती' या उक्तीनुसार, समाजातील बहुतेक साऱ्यांची हस्तकमळे राजकारण्यांच्याच पायाशी अटळपणे झुकलेली आढळतात.
राजकारण्यांमधल्या भ्रष्टाचाराबद्दल तावातवाने बोलणारे लोकच, स्वतःच्या शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये ध्वजारोहण करायला राजकारणी नेत्यांना, मंत्र्यासंत्र्यांनाच निमंत्रित करताना दिसतात. कारण त्यांच्याकडून काहीतरी मतलब साधायचा असतो. सन्मान्य अपवाद एकच. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मधकेपाडा या गावाचा. या गावातील जो (जी) विद्यार्थी इयत्ता दहावीतून गावातून पहिला येतो (येते), त्याला (तिला) २६ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या सोहळ्यात ध्वज फडकवण्याचा मान दिला जातो आणि बारावीत गावातून पहिला (पहिली) येणाऱ्या विद्यार्थ्याला १५ ऑगस्टचा ध्वजारोहणाचा मान दिला जातो. त्यामुळे आपल्याला तो मान मिळावा यासाठी गावातली मुले, मुली वर्षांपासूनच झटून अभ्यासाला लागतात. प्रत्येक गावाने, किंबहुना शाळेने ही प्रथा अनुसरली तर, गावागावातील राजकारण बंद होऊन, गाव समाजकारणाकडे वळेल आणि अभ्यासू पिढी निर्माण होईल.
हे आणि असे अनेक विचार मनात आले, त्याला कारण झाला, तो ख्यातनाम वैदर्भीय पत्रकार- साहित्यिक अविनाश पाठक लिखित 'शह- काटशह' हा राजकीय कथांचा नवा संग्रह. दृकश्राव्य माध्यमातील काही काळाच्या सेवेनंतर १९९५ पासून मुद्रित माध्यमात त्यातही राजकीय वार्ताक्षेत्रात पूर्ण वेळ कार्यरत राहिलेल्या अविनाशचा पहिला वैचारिक लेखसंग्रह २००८ साली प्रकाशित झाला. तेव्हापासून गेल्या चौदा वर्षात त्याची १४ पुस्तके आजतागायत प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये वैचारिक, ललित लेखसंग्रह, लघु कादंबरी समीक्षादि पुस्तकांप्रमाणेच 'डावपेच' व 'सत्तेच्या सावलीत' हे दोन राजकीय कथांचे संग्रहही अंतर्भूत आहेत. पण नागपूर ते मुंबई यातील प्रदीर्घ अंतरामुळे, ते दोन संग्रह माझ्याकडून अद्याप पाहून झालेले नाहीत. त्यामुळेच 'शह काटशह' या तिसऱ्या राजकीय कथासंग्रहाचा परामर्श त्या दोन कथासंग्रहांच्या संदर्भात मी घेऊ शकत नाही. म्हणून थेट 'शह काटशह' कडेच वळते.
या सुमारे १२५ पानी पुस्तकात पाच राजकीय कथांचा अंतर्भाव आहे. खरे तर यांना 'लघुकथा' म्हणता येणार नाही. कारण यातील प्रत्येक कथा सरासरी २५-३० पृष्ठांची अगदी लघुकादंबरीका म्हणण्याइतकी प्रदीर्घ आहे. कुठल्यातरी निवडणुकीत विजयासाठी प्रतिपक्षाला, क्वचित प्रसंगी स्वपक्षातील सहका-याला नमावण्यासाठी केल्या जाणाऱ्या खेळी-प्रतिखेळी हे या सर्व कथांचे मुख्य सूत्र आहे. तरीही प्रत्येक कथा आपापली स्वतंत्र पार्श्वभूमी आणि निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वांची पात्रे घेऊन येते. त्यामुळे वाचताना तोच तो पणा जाणवत नाही.
'प्रेमात आणि युद्धात' या पहिल्याच कथेत कोल्हापूरचे खासदार संग्रामसिंह शिंदे यांच्या आकस्मिक अकाली निधनामुळे उडवलेल्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या दोन बायका सवतीसुभ्याने एकमेकांसमोर दंड थोपटून उभ्या राहतात. तो संघर्ष अगदी निवडणूक अर्ज भरण्याच्या क्षणापासून जो सुरू होतो, तो त्या दोघींची विभिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्या उमेदवारी निश्चितीसाठी उभयतांच्या गोटातून खेळले जाणारे डावपेच हे सर्व तपशीलवार पार्श्वभूमीनिशी लेखक वाचकांना सांगत राहतो. त्यामुळे अंतिमतः कोण जिंकणार? त्यानंतर एकमेकींशी मिळते जुळते घेणार का? हे जाणून घेण्याच्या उत्कंठेने ती लांबलेली कथाही वाचक शेवटपर्यंत वाचत जातो.
मंत्रालय- विधिमंडळ परिसरात अहोरात्र वावरणाऱ्या राजकारण्यांचे संबंध तिथल्या प्रशासनिक अधिकाऱ्यांशी नेहमी येत असतात. स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्रीपदाकडे वाटचाल करणाऱ्या एखाद्या तरुण राजकारण्याचे भावबंध एखाद्या तडफदार आयएएस अधिकारी युवतीशी जुळले तर त्याचे घरगुती नातेसंबंध या उभयतांच्या व्यावसायिक हितसंबंधाच्या, प्रगतीच्या आड येतात का? याचा वेध घेणारी 'मिसेस मुख्यमंत्री' ही प्रदीर्घ कथाही आगळ्यावेगळ्या विषयामुळे लक्ष वेधून घेते.
झालंच तर लोकशाही राज्यव्यवस्थेचा एक मुख्य फायदा म्हणजे जर तुम्हाला दैव अनुकूल असेल तर टेम्पोवर हमाली करत महाविद्यालयीन शिक्षण घेतलेला एक सामान्य शेतमजुराचा मुलगा दिनेश तेलतुंबडे थेट कॅबिनेट मंत्री होण्याइतपतची लक्षणीय वाटचाल पक्षाशी इमानदारी जपून कशी करू शकतो, हे 'पक्षनिष्ठा फळाला आली' या कथेत आपण बघू शकतो.
एवमंच सत्तासंपादनासाठी राजकीय नेते एकमेकांवर पडद्याआडून कशी कुरघोडी करत असतात याचे सम्यक दर्शन सर्वसामान्य मतदार वाचकांना अविनाश पाठकांचे 'शह- काटशह' हे पुस्तक राज्याची राजधानी- उपराजधानी यातील राजकीय हालचालींच्या सर्व प्रमुख केंद्रस्थानी नेऊन प्रत्ययकारकपणे घडवते. एकूणच लेखकाची राजकीय बातमीदारी त्याच्या पदरी उत्तम वांङमयीन फळ टाकून गेली आहे, असे हे पुस्तक वाचताना जाणवते. मात्र तरीही, या कथांची लांबी थोडी आटोपशीर राहिली असती, तर हे पुस्तक अधिक वाचनीय वाटले असते, असे मनात आल्यापासून राहत नाही.
योगायोगाने या पुस्तकाची संहिता माझ्या हाती पडली, तेव्हाच सध्या सर्वत्र चर्चेत असलेला 'काश्मिर फाइल्स' हा चित्रपट बघून झाला. त्यातील दोन वाक्ये मनावर कायमची कोरली गेली. 'देश की तकदीर सिर्फ वो ही बदल सकता है, जिसके पास पॉलिटिकल पॉवर है.... लेकिन पॉलिटिक्स का रिझल्ट सिर्फ एकही होता है, विनाश! विनाश!! मौत!!!'. आपल्या देशात दीड- दोन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर आजतागायत राजकारणाचा जो चिखल राजकीय बातम्या मधून दररोज वाचायला मिळतोय, हे पाहिले की हे वाक्य किती पटते, नाही?
अविनाश पाठकांना शुभेच्छा देतानाच त्यांचा हा 'शह-काटशह' कथासंग्रह सर्वसामान्य मतदाराला आपला राजकीय प्रतिनिधी विचारपूर्वक निवडून देण्याची विवेकनिष्ठा शिकवील, अशी आशा व्यक्त करावीशी वाटते.
नीला वसंत उपाध्ये
चेंबूर मुंबई ४०००७१
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment