नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा सिद्धीदात्री.

  नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा सिद्धीदात्री



      *विश्वविख्यात विद्यानगरीच्या*

       *तांबडी जोगेश्वरी मंदिरातून*                   

     *आजची नवदुर्गा..'सिद्धीदात्री'*

              *आजचा रंग 💖*


        *हिरण्यवर्णां हरिणीं*

        *सुवर्णरजतस्त्रजाम् ।*

        *चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं*

        *जातवेदो म आ वह ॥*

        *नवरात्र. देवीच्या मंदिरात पहाटे संबळ.. चौघडा वाजतोय. पोतराज.. गोंधळी मंदिरात देवीची कवने गात आहेत. नित्य नव्या रंगाच्या वेशभूषेत अलंकारासह नटून थटून.. सुगंधी फुलांचे गजरे माळून.. प्रसन्नचित्त भाविक महिलांची पहाटेपासून देवीची ओटी भरायला गर्दी होत आहे.*

        *घरोघरच्या देवीची नित्य पूजा.. आरती.. उपवास.. आराधना, कुमारीका पूजन यामुळे भक्तमन प्रसन्न झालेय. घटाभोवती उगवलेली हिरवी सप्तधान्ये बघून आनंद व्दिगुणीत झालाय. काल अष्टमीला घागर फुंकण्याचा आनंद लुटला गेलाय. तर आज अष्टमीचा उपवास होणार.. होमहवन होणार.*

        *नवरात्रात आवर्जून केले जाते ते कुंकुमार्चन. सुशोभीत ताम्हनात देवीची मूर्ती किंवा श्री यंत्र वा प्रतिकात्मक वस्तू ठेवत कुंकुम अभिषेक केला जातो. देवीला १६ वेळा श्रीसूक्त.. देवीची नामावली म्हणत मृगी मुद्रेने चिमूटभर कुंकुम वाहले जाते. कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. देवी जागृत होते. अर्पण केलेलं कुंकू सिंदूर म्हणून लावले जाते.*

        *जगभरात विद्यावंतांची नगरी म्हणून सन्मान असलेल्या सांस्कृतिक नगरी पुण्याची ग्रामदेवता.. जिचे पुराणकालीन मंदिर आहे. तांबडी जोगेश्वरी देवी.. या देवीने महिषासुराचा सेनापती ताम्रासुराचा संहार केला म्हणून देवीची ओळख झाली तांबडी जोगेश्वरी. शिवकाळात ही स्वयंभू मूर्ती सापडली. जीव आणि ईश्वर यांची एकरुपता असलेली देवी. अनेक कोकणस्थ, कऱ्हाडेंची कुलदेवी.*

        *नवदुर्गाचे आजचे रुप म्हणजे सिद्धीदात्री. तपस्येनंतर प्राप्त होणारे यश नैपुण्य म्हणजे सिद्धी. ही सिद्धीदात्री देवी.*

        *पौराणिक संदर्भ नेहेमीच विज्ञानाला वैचारिक दिशा देतात. सिद्धी अठरा प्रकारच्या आहेत. अणिमा अर्थात शरीराला अणुसारखे आकुंचन करणे, महिमा म्हणजे शरीराचा आकार मोठा करणे, गरिमा म्हणजे शरीराचे वजन वाढवणे, लघिमा म्हणजे भाररहित करणे, प्राप्ति म्हणजे कुठेही केव्हाही जाण्याची क्षमता.. प्राकाम्य म्हणजे प्रत्येक इच्छापूर्तीची क्षमता, ईशित्व म्हणजे वस्तू.. प्राणी यावर अधिकार चालवणे, क्षमता तर वशित्व म्हणजे वश करणे इ. सिद्धी आहेत ज्या ऋषी योगींना प्राप्त होत्या. तर या सिद्धीदात्री देवीकडून प्रत्यक्ष शंकराने अष्टसिद्धी प्राप्त केल्या होत्या.*      

        *भोंडला.. नवरात्रात प. महाराष्ट्रात सर्वत्र भोंडल्याची धुम सुरु आहे. चूल.. मूल.. नोकरी यातून काही वेळ दूर होत मुक्त श्वासानंदाचा हा स्त्रियांचा खेळ. पाटावर हत्तीचे चित्र काढून अतिशय सुलभ पण लयबद्ध, चपलख.. नादमय शब्दांच्या गाण्यासह फेर धरुन उल्हासात खेळला जाणारा हा खेळ. यामध्ये स्त्रियांची सबलता.. चपळता.. गायकी.. नृत्यकौशल्य, विनोदबुद्धी याचे दर्शन घडविणारा हा भोंडला. मुलींनाच नाही तर समस्त महिलाना या आनंदी भोंडल्याचे आकर्षण आहे.*

        *तर विदर्भ.. मराठवाड्यात भुलाबाई मांडून भुलाबाईंची गाणी गायली जात आहेत. भुलाबाई आणि भुलोबा म्हणजे शंकर पार्वती. ही पार्वती म्हणजे आदिशक्ती, जगन्माता, आदिपराशक्ती. भूमीसारखी सर्जनशील म्हणून भुवनेश्वरी तिच्या सृजनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई पूजन.. खेळ.. गाणी म्हणणे.*

        *विश्वाची रचना या जगन्मातेने केलीय. तिच्याच छत्रछायेत.. तिच्या दयेने आनंदात आमचे जगणे सुरू आहे. सगळ्या दैन्य.. दुःख.. दैत्यांवर ती विजय मिळवून देते. आमच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारी म्हणून ख्यातीप्राप्त आहे. आमच्या जीवनी सर्व शुभंकर घटना ती पूर्णत्वास नेते.*

          

  *उधे ग अंबे उधे*

  *उधे ग अंबे उधे*


  *होऊ दे सर्व दिशी मंगळ*

  *चढवितो रात्रंदिन संबळ*

  *उधे उधे उधे उधे उधे उधे*


  *फुलवितो दिवटी दीपकळी*

  *आम्ही अंबेचे गोंधळी !*

  *उधे ग अंबे उधे !*


  *घरोघरी हिंडतो न्‌*

  *गोंधळ आईचा मांडतो*

  *आईचा मांडतो न्‌*

  *गोंधळ देवीचा मांडतो*

  *भवानी,भवानी,*

  *भवानी बसली ओठी गळी*

  *आम्ही अंबेचे गोंधळी !*

  *अंबेचे गोंधळी !*

  *आम्ही अंबेचे गोंधळी !*

  *उधे ग अंबे उधे !*


  *सान थोर नेणतो न्‌ आम्ही*

  *दैवाशी जाणतो*

  *दैवाशी जाणतो आम्ही*

  *दैवाशी जाणतो*

  *घावली, घावली, घावली*

  *मूळमायेची मुळी*

  *आम्ही अंबेचे गोंधळी,*

  *अंबेचे गोंधळी न आम्ही*

  *अंबेचे गोंधळी*

  *उधे ग अंबे उधे !*


  *बोला अंबाबाईचा.. उधो !*

  *रेणुकादेवीचा.. उधो !*

  *एकवीरा आईचा.. उधो !*

  *या आदिमायेचा.. उधो !*

  *जगदंबेचा.. उधो !*

  *महालक्ष्मीचा.. उधो !*

  *सप्तशृंगीचा.. उधो !*

  *काळुबाईचा.. उधो !*

  *तुळजाभवानी आईचा.. उधो !*


  *पारंपारिक भोंडला गीत* 

  *ऐलमा पैलमा गणेश देवा,*

  *माझा खेळ मांडून दे,*

  *करीन तुझी सेवा....*


      *या देवी सर्वभूतेषु माँ*

        *सिद्धिदात्री रूपेण संस्थिता ।*

        *नमस्तस्यै नमस्तस्यै*

        *नमस्तस्यै नमो नम: ॥*

                ३०.०९.२०२५

संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.