सहज सुचलं म्हणून आज लोकमान्य टिळक स्वर्गात ढसाढसा रडत असतील
सहज सुचलं म्हणून
आज लोकमान्य टिळक स्वर्गात ढसाढसा रडत असतील
गणेशोत्सव बुधवारपासून सुरू झाला आहे. आज आठ दिवस पूर्ण होतील,महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय .सुरुवातीला या उत्सवाचे स्वरूप घरगुती प्रकारचे होते. मात्र लोकमान्य टिळकांनी १९ व्या शतकाच्या शेवटी याला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून महाराष्ट्रात गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात उत्साहात साजरा केला जातो.
मात्र टिळकांनी ज्या संकल्पनेने हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केला होता, ती संकल्पना आज शिल्लक आहे काय याचे उत्तर शोधायला गेल्यास नकारार्थीच उत्तर मिळते. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. त्यामुळे समाजाला संघटित करून त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करणे, हे या उत्सवाचे प्रमुख ध्येय होते. त्या काळात तसे प्रबोधनात्मक कार्यक्रम गणेशोत्सवात होत होते.
गणेशोत्सवात प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा दीर्घकाळ सुरू राहिली. त्या काळात गणपतीचे दहा दिवस प्रत्येक गणेशोत्सव मंडळासमोर चांगल्या मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असायची. त्यावेळी गणपती समोर अनेक मान्यवरांची प्रबोधनात्मक भाषणे व्याख्याने प्रवचने होत असत. अनेक नव्या कलाकारांची संगीताची मैफिल गणपती समोर रंगत असे. अनेक स्थानिक कलाकार एकत्र येऊन चांगली चांगली नाटके गणपती समोर सादर करत असत. त्याशिवाय नकलाकार, गायक, वादक, जादूगार, यांचे देखील कार्यक्रम गणपती समोर आयोजित केले जात असत. ज्या वस्तीत गणेशोत्सव मंडळ आहे तिथल्या बाल कलाकारांंना व्यासपीठ देण्यासाठी देखील मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. बाल, तरुण आणि वृद्धांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जात असे. त्यातून स्थानिक कलाकारांना नवे व्यासपीठ मिळत असे. त्यांच्यातील कलागुण लोकांसमोर येत असत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत असत तसेच सहभागही घेत असत.
स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही परंपरा स्वातंत्र्यानंतर देखील सुरू राहिली. त्यामुळे अनेक मान्यवर वक्ते गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच पुढे आले तर अनेक मान्यवर गायक कलाकार या उत्सवाच्या माध्यमातून आपली कला सादर करत विकसित झाले आणि पुढे गाजले देखील. त्यामुळे समाजाचे प्रबोधन करणारा त्या योगे समाजाला संघटित करणारा आणि समाजातील विविध घटकांचे कलागुण समोर आणणारा एक उत्सव म्हणून या उत्सवाकडे बघितले जात होते. त्याचबरोबर त्या दहा अकरा दिवसात जनसामान्यांना निखळ दर्जेदार मनोरंजन देऊन मनोरंजनाद्वारे प्रबोधन करणारा हा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे बघितले जात होते.
मात्र हळूहळू परिस्थिती बदलू लागली साधारणपणे १९८२-८३ नंतर देशभरात घरोघरी टेलिव्हिजन पोहोचला. मग जनसामान्यांना घरातच दर्जेदार करमणूक उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे गणेशोत्सवातील कार्यक्रमांना उपस्थिती लावणे हळूहळू कमी झाले. गणेशोत्सव हे लोकाश्रयावरच होत असतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते घरी वर्गणी मागायला आले की लोक जे काही शक्य असेल ते देऊन मोकळे व्हायचे. मात्र मंडळातील कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नव्हते. मग उपस्थिती कमी होऊ लागल्याने हळूहळू कार्यक्रम सादर करणे कमी होऊ लागले.
त्यामुळे मग हळूहळू गणेशोत्सवाचे स्वरूप बदलू लागले. गणेशोत्सवात दहा दिवस गणपती समोर होणारे मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम कमी केले गेले, आणि दर्शनी सजावटीवरच भर दिला जाऊ लागला. गणेशोत्सव मंडळे मग भव्य मूर्ती विकत आणायची. आजूबाजूला भव्य अशी सजावट करायची. लोकांना आकर्षित करून घेणारे देखावे तयार करायचे. रोज गणपतीच्या बाजूला वेगवेगळे गाणे ध्वनिक्षेपकावर लावून वातावरण निर्मिती करायची. त्याचबरोबर स्थापनेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी डीजे लेझर ढोल ताशे लावून गणपतीची भव्य मिरवणूक काढायची. असाच कार्यक्रम सुरू झाला. आज तोच कार्यक्रम आज सर्व ठिकाणी सुरू झालेला दिसतो आहे. परिणामी कुठल्या गणेशोत्सव मंडळाकडे कोणता देखावा केला आहे, याचे वृत्त समाज माध्यमांवर इलेक्ट्रॉनिक मीडियात किंवा वर्तमानपत्रांमध्ये आले की तो गणपती बघायला जायचे , आणि घरी येऊन टीव्ही बघत बसायचे, असाच कार्यक्रम सुरू झाला. मग गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बघायला येणाऱ्यांचीच मोठी रीघ लागू लागली. त्यातून प्रबोधनाचा आणि लोकसंघटनाचा जो मूळ हेतू होता त्याला हरताळ फासला जाऊ लागला.
त्यामुळेच लोकमान्य टिळकांनी ज्या संकल्पनेने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या संकल्पनेपासून आजचा सार्वजनिक गणेशोत्सव शेकडो किलोमीटर दूर गेलेला दिसतो आहे. या उत्सवातून जनसामान्यांचे प्रबोधन किंवा मनोरंजन काहीही होत नाही, हे स्पष्ट दिसते आहे. फक्त तुमचा गणपती मोठा, की आमचा, तुमचा देखावा जास्त चांगला की आमचा, आणि तुमची विसर्जनाची किंवा स्थापनेची मिरवणूक जास्त दणदणीत झाली की आमची, याचीच जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली दिसते आहे. हे फक्त इतक्यावरच थांबलेले नाही, तर गणपतीच्याच मागे रात्री सामसूम झाले की कार्यकर्त्यांची ओली पार्टी होतानांही दिसते आहे. गणपतीच्या बाजूला ध्वनिक्षेपकावर जी गाणी लावली जातात, त्यांचा आणि सामाजिक प्रबोधनाचा किंवा धार्मिक भावना जागृत करण्याचा काहीही अर्थाअर्थी संबंध नसतो असेही दिसून आले आहे. एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना धुळीला मिळाली असून आज जे दिसते आहे ते एक विकृत स्वरूप आपल्यासमोर दिसते आहे, हे दुर्दैवी वास्तव मान्यच करावे लागते.
म्हणूनच आज या संदर्भात समाजातील सर्वच घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज गणपतीच्या नावावर पैसा जमवला जातो. मात्र त्यातून सामाजिक प्रबोधन काहीही होत नाही. होते ते फक्त श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन. हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन असे गणेशोत्सव बंद केले असते हे नक्की. आज देखील गणेशोत्सवाचे हे हिडीस स्वरूप पाहून लोकमान्य टिळक स्वर्गात ढसाढसा रडत असतील हे निश्चित.
म्हणूनच समाजाने आता याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. जर या सार्वजनिक उत्सवांमधून काही साध्य होणार नसेल तर असे उत्सव आता बंद करायला हवेत, हेच इथे सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

कटू सत्य असा वास्तवपूर्ण लेख ! 😔
ReplyDelete........