नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा..शैलपुत्री

  चैतन्योत्सवाची.. शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेची.

             आज पहिली माळ तुळजापुरहून



 आजचा रंग पांढरा   आजची नवदुर्गा..शैलपुत्री    

        *सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।*

        *शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॥*

        *प्रत्येक युगात असुर प्रबळ होतच राहतात. असाच एक असूर होता महिषासूर. त्याच्या अत्याचाराने देव त्रस्त झाले होते. देव म्हणजे समाजातील सत्प्रवृत्ती.*

        *हे सर्व देव खरं म्हणजे ज्ञानी.. शस्त्र अस्त्र संपन्न होते. पण अतिशय सहिष्णू होते. त्यांनी लढायचा आत्मविश्वास गमावला होता. ते हतबल झाले होते. यामुळे सगळे देव ब्रह्मा.. विष्णू आणि महेशाला शरण गेले. या त्रयींच्या पुण्यप्रकोपाने देवी प्रकटली. या त्रयींनी आपली आयुधे देवीला दिली. या देवीने महिषासूर राक्षसाला यमसदनी धाडले. हे युद्ध नऊ दिवस चालले. दैवी शक्तीची पुन्हा स्थापना झाली*

        *भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी देशात हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवप्रभूंना कुलदेवी श्री तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी आईला नमन.*

        *सर्व देवांनीही जिच्याकडून शक्ती प्राप्त केली त्या नवदुर्गेचे नवरात्र आज प्रारंभ होत आहे. श्रीकृष्णानं अर्जुनाला विजयासाठी देवीची प्रार्थना करायला सांगितली. लंका विजयासाठी प्रभू श्रीरामानी देवीची प्रार्थना केली.*

        *आजपासून परब्रह्मस्वरुपिणी देवीच्या नवरात्र उत्सवाचा सानंद प्रारंभ. नऊ दिवस दैवी शक्ती प्राप्तीसाठी घरोघरी घट बसणार. हे घट सृजनाचे प्रतीक. घटाची प्रत्येक घराची पद्धत वेगळी. कुठे पत्रावळीवर तर कुठे ताटात शेतातील ओली माती ठेवून त्यावर धान्य पेरले जाते. प्रत्येक घराण्यात कुलदेवीचे पूजन होते. ही कुलदेवी त्या कुटुंबाचे असूरापासून रक्षण करते.*

        *असूर ही प्रवृत्ती आहे. ही वृती प्रत्येकवेळी समाजात वेगवेगळ्या स्वरुपात बोकाळतेच. स्वार्थी, विलासी.. भोगात रमणारे.. निष्पापांना कष्ट देत हाल करणारे.. देशात अशांतता निर्माण करणारे हे सारे असूरच.* 

        *या असूरांवर विजयासाठी हवे कणखर मनोबल.. आत्मविश्वास देणाऱ्या शक्तीची साथ. या शक्तीशिवाय सज्जनशक्ती दुबळी ठरते. शक्तीच्या प्राप्तीसाठी हे नऊ दिवस भाविकपणे उपासना केली जाते. मग बलोपासनेने.. शौर्य पूजनानेच हे सामर्थ्य प्राप्त होते.*

        *मनामनात दडलेल्या महिषासूरावर या नवरात्रातील शक्तीउपासनेने विजय मिळतो. आसूरी शक्ती नाश पावतात. जीवनातील नैराश्य संपते. चैतन्य संचारते.* 

        *नवरात्र मंगलमय वातावरण निर्माण करणारे. गावोगाव देवीची मंदिरे सजणार. घरोघरी फुलांच्या माळा.. धूप.. आनंददीप.. अखंड आनंददीप.. रोज नवीन माळा, आरती.. जोगवा..  प्रार्थना होणार. यामुळे घर.. गाव प्रसन्नतेने नटणार. विड्याच्या पानांची पहिली माळ देवीला अर्पण करणार.*

        *महिला वर्गाचा उत्साह तर आगळाच. त्या देवीचे भागवत.. श्रीसुक्त.. भजन आदि उपासना करणार. नवरात्रात नऊ रंग भरणार. देवीच्या कृपेने भारतीय महिलांना सुबत्ता लाभलीय. मग या महिला रोज विशिष्ट रंगाच्या साड्या परिधान करुन.. रांगोळीत त्या रंगाचा ठळकपणे वापर करुन नवरात्रीचा आनंद व्दिगुणीत करणार. अनेक गावात यात्रा भरतात. फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो.*

        *नवरात्रात अनेक व्रतपालनही होते. एकभुक्त भोजन.. केवळ दशमीच खाणे किंवा फलाहार.. जेवताना मौन.. उपवास इ. व्रतपालन होते. उपवासात काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर विजयाचा कसोशीने प्रयत्न होतो.*

        *नवरात्रात आज  हिमालय कन्येच्या मुलीचे शैलपुत्री देवीचे पूजन होणार. मूलाधार चक्र जागृत करणारी.. सर्व सिद्धी प्रदान करणारी ही देवी. हिचा नैवेद्य म्हणजे गायीच्या तुपातील पदार्थ .*

        *आपणास नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा.. !!*

  *आदिमाया अंबाबाई,*

  *सार्‍या दुनियेची आई*

  *तिच्या एका दर्शनात*

  *कोटी जन्मांची पुण्याई*


  *उदे ग अंबाबाई,* 

  *उदे ग अंबाबाई*

  *हे उदे ग अंबाबाई*

  *आई उदे ग अंबाबाई*


  *सार्‍या चराचरीं तीच*

  *जिवा संजीवनी देते*

  *तीच संहार प्रहरी*

  *दैत्य-दानव मारीते*

  *उग्रचंडी रूपा आड* 

  *झरा वात्सल्याचा गाई*

  *आदिमाया अंबाबाई,*

  *सार्‍या दुनियेची आई*


  *क्षेत्र नामवंत एक,* 

  *नाव कोल्हापूर*

  *अगणित खांबावरी*

  *राहिले मंदिर*

  *नाना देव ते भोवती* 

  *देवी मधोमध राही*

  *आदिमाया अंबाबाई,*

  *सार्‍या दुनियेची आई*


  *तुळजापूरीची भवानी*

  *जणु मूळ आदिशक्ती*

  *घोर आघात प्रहार* 

  *तीने पचविले पोटी*

  *स्वत: तरली,*

  *भक्तांना स्वये तारुनिया नेई*

  *आदिमाया अंबाबाई,*

  *सार्‍या दुनियेची आई*


  *अमरावतीची देवता*

  *शाश्वत, अमर*

  *अंबेजोगाईत तिने मांडियले घर*

  *मुंबापुरीच्या गर्दीला*

  *दान चैतन्याचे देई*

  *आदिमाया अंबाबाई,*

  *सार्‍या दुनियेची आई*


  *कुणी म्हणती चंडिका,*

  *कुणी म्हणती भवानी*

  *दुर्गा दुर्घट यमाई,* 

  *अंबा असुर मर्दिनी*

  *किती रूपे, किती नावे*

  *परि तेज एक वाही*

  *आदिमाया अंबाबाई,*

  *सार्‍या दुनियेची आई*

        *‼या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता‼*

        *‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼*

                          २२.०९.२०२५

    संकलन -अभय बक्षी नागपूर 

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.