आयुष्यातले सांगाती... ३१ प्रा. सुरेश द्वादशीवार..

 आयुष्यातले सांगाती... ३१

प्रा. सुरेश द्वादशीवार..

प्राध्यापक असताना पत्रकार, मग लेखक आणि मग संपादक असा प्रवास करणारे महाराष्ट्रात काही मोजकेच लोक आहेत. त्यात आघाडीचे नाव आहे प्रा. सुरेश. द्वादशीवार. 

सुरेश द्वादशीवार सरांनी बरीच वर्षे चंद्रपुरात प्राध्यापकी केली. सोबतच ते दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुद्धा कार्यरत होते. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते नागपूरला दैनिक लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून आले. काही काळ तिथे काम केल्यावर दीर्घकाळ दैनिक लोकमतचे मुख्य संपादक म्हणून ते कार्यरत राहिले. 

त्याचवेळी ते विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, आनंदवन चळवळ अशा विविध सामाजिक क्षेत्रात देखील ते सक्रिय राहिलेले आहेत. एक प्रख्यात पत्रकार, साहित्यिक, राजकीय आणि सामाजिक विचारवंत म्हणून आज उभ्या महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. 

सुरेश द्वादशीवार हे नाव मी लहानपणापासूनच ऐकून होतो. त्यावेळी घरी नियमित तरुण भारत हे वृत्तपत्र येत असे. त्यात दर आठवड्याला सुरेश  द्वादशीवारांचे साप्ताहिक वार्तापत्र आणि इतर लेखदेखील असायचे. त्यामुळे ते नाव चांगलेच परिचित होते. १९७९ मध्ये चंद्रपूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दूरदर्शनसाठी वृत्तसंकलन करण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी पहिल्यांदा आमची तोंड ओळख झाली होती. 

त्यांच्याशी माझा खरा म्हणता येईल असा परिचय झाला तो बाबा आमटेंच्या आनंदवनात. १९८१ मध्ये आनंदवन येथे होणाऱ्या मित्र मेळाव्याचे चित्रीकरण करण्यासाठी मी गेलो होतो. बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ विकास आणि डॉ. प्रकाश यांची माझी आधीचीच ओळख होती. त्यांनीच माझी तिथे द्वादशीवारांची पुन्हा एकदा ओळख करून दिली. त्यावेळी दोन दिवस मी आनंदवन मध्येच मुक्कामी होतो. त्यामुळे सुरेशजींची माझी चांगली ओळख झाली. 

नंतर मग अधून मधून त्यांच्या भेटी होऊ लागल्या. याच दरम्यान द्वादशीवार सर विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून आले होते. मग ते अधून मधून नागपूरला आले की कार्यक्रमांमध्ये आमची हमखास भेट व्हायची. द्वादशीवार एकदम मोकळे व्यक्तिमत्व, त्यामुळे ते भेटले की गप्पा छान  रंगायच्या. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रामभाऊ उपाध्य नानासाहेब शेवाळकर यांचे आणि द्वादशीवारांचे अगदी कौटुंबिक संबंध होते. काही वर्षांनी शेवाळकर वणी सोडून नागपुरात स्थायिक झाले होते. त्यामुळे मग द्वादशीवारांच्या माझ्या भेटी वाढतच चालल्या होत्या. 

१९८३ ते १९९१ राम शेवाळकर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते.१९९१ मध्येच ते साठ वर्षाचे झाले. त्यावेळी त्यांनी साहित्य संघाचे अध्यक्ष पद स्वतःहून सोडले. मग त्यांच्या जागी सुरेश द्वादशीवार अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर मग विविध कार्यक्रमांमध्ये ते हमखास भेटू लागले. 

१९९१ मध्ये देशात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ झाले. त्यावेळी चंद्रपूरहून शांताराम पोटदुखे खासदार म्हणून निवडून आले होते. ज्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान म्हणून शपथ घेणार हे ठरले, त्यावेळी पहिल्याच मंत्रिमंडळात शांतारामजींचा नंबर लागणार हे भाकीत द्वादशीवार सरांनी केले होते. त्यावेळी सर्वच जण त्यांना काहीसे वेड्यात काढत होते. मात्र शपथविधी सुरू झाला. त्यात जसे शांताराम पोटदुखे यांचे नाव राज्यमंत्री म्हणून पुकारले गेले, तेव्हा सुरेश द्वादशीवारांच्या भाकीताची आम्हा सर्वांनाच आठवण झाली. मग लगेच त्यांना फोन करून मी अभिनंदन देखील केले होते. 

नंतर वर्षभरातच नागपुरात दै. लोकसत्ता या वृत्तपत्राची आवृत्ती सुरू झाली. तिथे निवासी संपादक म्हणून द्वादशीवार सरच रुजू झाले. मग ते नागपूरातच राहायला आले. त्या काळात धरमपेठेत माझा स्टुडिओ होता. तिथे आमच्या नियमित भेटी होऊ लागल्या.

त्या काळात मी दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले होते. त्या दृष्टीने बँकेने मला कर्ज देखील मंजूर केले होते. राज्य शासनाच्या काही परवानग्यांसाठी काम प्रलंबित होते. या काळात सरांच्या दोन कादंबऱ्यांवर दूरदर्शन मालिका किंवा मग टेली फिल्म बनवावी अशी माझी योजना होती. त्यासाठी सरांच्या धरमपेठच्या घरी आमच्या बऱ्याच भेटीगाठी होत होत्या. बरेचदा रवी नगर चौकातल्या लोकसत्ताच्या कार्यालयात देखील आमच्या भेटी होत होत्या. या प्रकल्पात मी विख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची देखील मदत घ्यायचे ठरवले होते. माझ्या आठवणीनुसार १९९३ मध्ये राजदत्तजी नागपुरात आले होते. तेव्हा या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या स्टुडिओतच मी, राजदत्तजी, द्वादशीवार सर आणि माझा सहकारी आनंद सहस्रबुद्धे अशी आमची चौघांची बैठकही झाली होती. तिथे दोन प्रकल्प हाती घेण्याचे आमचे निश्चित झाले. मात्र पुरेसे आर्थिक पाठबळ पाठ न मिळाल्याने शेवटी तो पूर्ण प्रकल्प भाषणात बासनात गुंडाळून ठेवावा लागला होता. मात्र या प्रकल्पाच्या संदर्भात द्वादशीवार सरांनी पूर्ण सहकार्याचा हात समोर केला होता. 

हा प्रकल्प गुंडाळून ठेवावा लागल्यामुळे मग मी स्टुडिओ देखील बंद केला. दूरदर्शनसाठी वृत्तसंकलनही बंद करावे लागले होते. मग मी मुद्रित माध्यमांकडे वळायचे ठरवले. या प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय दिनकरराव देशपांडे हे माझे मार्गदर्शक होते. सुरुवातीला काही काळ एका आमदार मित्राचे प्रसिद्धीचे काम देखील केले. त्या काळात सुरेश  द्वादशीवारांकडे वारंवार जात असे. दै लोकसत्ताकडून त्यांनी देखील मला भरपूर सहकार्य केले होते.

दिनकरराव देशपांडे आणि द्वादशीवार सरांची अगदी खास मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमीच गप्पांची बैठक जमायची. अनेकदा मी देखील या बैठकीत सहभागी होत असे. त्या काळात द्वादशीवार सर धरमपेठ सोडून श्रद्धानंद पेठ मध्ये राहायला आले होते. त्यांचे निवासस्थान माझ्या घरापासून अगदी जवळ होते. मग आमच्या भेटीगाठी वाढतच राहिल्या. 

द्वादशीवार सर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असतानाच विदर्भ साहित्य संघाचे मुख्यालय असलेली धनवटे रंगमंदिराची जुनी इमारत पाडून तिथे नवे सांस्कृतिक संकुल उभारण्याची योजना ठरली. १९९५ मध्ये जुनी इमारत पाडली गेली आणि या बांधकामाचे कंत्राट ज्याला दिले त्या कंत्राट दराने तब्बल आठ वर्षे इमारत पूर्ण केली नव्हती. २००२ च्या विदर्भ साहित्य संघाच्या वार्षिक आम सभेत या मुद्द्यावर खूप वादावादी झाली. त्यात मी देखील सहभागी होतो. नंतर साहित्य संघातील काही सदस्यांनी मिळून विद्यमान कार्यकारिणी विरोधात एक पत्र परिषद घेतली आणि त्या पत्र परिषदेत हे संकुल पूर्ण होण्यामागे कोणते राजकारण सुरू आहे याचा खुलासा व्हावा अशी मागणी केली. मला देखील त्या पत्रपरिषदेच्या आयोजकांनी सोबत बोलावून घेतले होते. त्यामुळे मग माझे नाव देखील साहित्य संघाच्या हिटलिस्टवर आले. आम्हा सर्व सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा साहित्य संघाकडून बजावल्या गेल्या. त्याला उत्तरे दिली गेली. तरीही आम्हाला साहित्य संघातून प्राथमिक सदस्य म्हणून निष्कासित केले गेले. त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात देखील गेलो आणि वार्षिक आमसभेत देखील आम्ही अपील करून आवाज उठवला. परिणामी ती आमसभा प्रचंड गाजली होती. बराच काळ न्यायालयात देखील खटला चालला. दरवेळी न्यायालयात आमच्या भेटी व्हायच्या. मात्र इतके असूनही  द्वादशीवार सरांचे आणि माझे संबंध पूर्वीसारखेच कायम राहिलेत. त्यांच्या त्या वेळच्या निर्णयाविरुद्ध मी त्यावेळी प्रकाशित करत असलेल्या रामटेकच्या गडावरून या नियतकालिकाच्या एका अंकात "तोंडघशी पडलेले प्राध्यापक द्वादशीवार" अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला होता.  त्या लेखात सरांवर मी भरपूर टीकास्त्र सोडले होत मात्र तो लेख वाचुनही द्वादशिवार सर माझ्यावर बिलकुल रागावले नाहीत. नंतर एकदा भेटल्यावर "गधड्या तू आजकाल चांगला लिहायला लागला आहेस" म्हणून माझ्यावर प्रेमळ तोंडसुख सुद्धा घेतले होते. 

आधी नमूद केल्याप्रमाणे आमच्या निष्कासनासंदर्भात जी आमसभा झाली, त्या आमसभेत जोरदार गोंधळ झाला होता. आमसभा संपल्यानंतर काही पत्रकार मित्र द्वादशीवर सरांशी बोलत होते. तिथे मी गेलो तेव्हा "काय रे निष्कासित गधड्या, काय म्हणतोस तू ?"असे म्हणून माझी थोडी मस्करी केली. मी त्यावर काही उत्तर देण्यापूर्वीच सरांनी मला

" हे जाऊ दे रे आता, आपले संबंध अजूनही पूर्वीसारखेच राहतील, तू देखील पूर्वीसारखाच वाग." असे मला सांगितले होते.

त्यावेळी "रामटेकच्या गडावरून" दिवाळी अंकासाठी मी त्यांना लेख मागायला गेलो. या वादावादीच्या पार्श्वभूमीवर ते लेख देतील किंवा नाही याबाबत मी साशंक होतो. मात्र त्यांनी मनात कोणताही किंतू न ठेवता मला लेख दिला. नंतर माझ्या आठवणीनुसार  दोन वर्ष दिवाळी अंकात त्यांनी मला त्यांच्या आगामी कादंबरीतील काही प्रकरणे देखील प्रकाशित करायला दिली होती. 

याच काळात द्वादशिवार सर लोकसत्ता सोडून लोकमत मध्ये मुख्य संपादक म्हणून रुजू झाले होते. मी माझ्या दिवाळी अंकासाठी लेख मागायला गेलो, तेव्हा लोकमतकडून तुम्हाला काही हरकत तर राहणार नाही ना? असा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा त्याची तू काळजी करू नकोस असे मला ठणकावत त्यांनी लेख सुद्धा दिला होता. दर वर्षी मी त्यांचा लेख घेत असे. सुरुवातीला अंकाचा खर्च  सांभाळून काम करायचे तर पैशाची चणचण भासायची. त्यामुळे कोणालाच मानधन देणे शक्य झाले नव्हते. नंतर जशी आर्थिक स्थिती सुधारली तसा एका वर्षी मी मानधनाचा चेक घेऊन द्वादशीवार सरांकडे गेलो. तर ते "याची काय गरज होती?" म्हणून मला रागवले. "तुला दिवाळी अंक काढणे आणि मग मानधन देणे परवडत असेल तरच मला मानधन दे, अन्यथा तू नाही दिलेस तरी मला चालेल, मी तुला दरवर्षी लेख देईन. आमचे लोकमत ठीक आहे. तिथे मालक पैसा आणतात. इथे तुलाच धडपड करावी लागते. म्हणून तुला सांगतोय" असेही त्यांनी वडीलकीच्या नात्याने मला सुनावले देखील होते. 

२००५ च्या दिवाळी अंकात मी "साहित्य संमेलन अध्यक्ष पदाची कारकीर्द" या विषयावर परिसंवाद घेतला होता. तर २००६ मध्ये मी वांङमयीन चळवळीचे नेतृत्व अवाङमयीन व्यक्तींकडे असावे काय? या विषयावर परिसंवाद आयोजित केले होते. दोन्हीमध्ये सहभागी होण्यासाठी मी सरांचे सहकार्य घेतले होते. या दोन्ही परिसंवादांचे संयोजक म्हणून ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना विनंती केली होती. त्यानुसार मनोहर सरच संयोजक होते. या प्रत्येक परिसंवादाची एक पुस्तिका काढावी अशी मनोहर सरांची इच्छा होती, तर पुस्तिका न करता काढता दोन्ही परिसंवाद एकत्र करावे या दोन्ही विषयांशी सुसंगत असे आणखी काही लेख जोडावे आणि दोन्हीचे मिळून एक पुस्तक तयार करावे असे माझे दुसरे एक मार्गदर्शक विख्यात साहित्यिक डॉ द. भि. कुळकर्णी यांनी सुचवले. त्यानुसार मी दोन्ही परिसंवाद आणखी चार-पाच सुसंगत असे लेख  असे मिळून मराठी वाङ्मय व्यवहार,- चिंतन आणि चिंता" या शीर्षकाचे एक पुस्तकच तयार केले. या पुस्तकाला द्वादशीवर सरांची प्रस्तावना असावी असे डोक्यात आले, आणि मी सरांकडे गेलो. आधी सर थोडे टाळाटाळ करत होते. मग मी चांगलाच हात धुवून मागे पडलो शेवटी त्यांनी प्रस्तावना देण्याचे मान्य केले. (हे त्यांनी प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच नमूद देखील केले आहे.) एक दिवस त्यांनी लोकमतच्या ऑफिसमध्ये मला बोलावले. तिथे मी गेलो तर सर ही प्रस्तावनाच डिक्टेट करत होते. मग मला अर्धा तास त्यांनी बसवून घेतले आणि माझ्यासमोरच ऑपरेटरला प्रस्तावना डिक्टेट केली. मग ऑनलाईन तपासून घेत ऑपरेटरला सूचना दिली. "आता याचे प्रिंटआऊट काढ आणि या गधड्याला देऊन टाक. याची पीडा काढ एकदाची, त्याशिवाय हा मला सोडणार नाही" असे सुनावले. लगेच मग त्यांनी मला "बेटा तुझ्या पुस्तकासाठी तुला ऑल द बेस्ट" म्हणून शुभेच्छा देखील दिल्या. 

पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाची प्रत  मी सरांना घरी पोहोचवूनही आलो. पुस्तक पाहिल्यावर पुस्तक छान झाले म्हणून त्यांनी कौतुकही केले. ही घटना २००८ ची, नंतर २००९  च्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अचानक मुंबईहून एका पत्रकार मित्राचा फोन आला. त्याच दिवशी राज्य शासनाचे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले होते, आणि त्यात उत्कृष्ट संपादित ग्रंथ म्हणून मराठी वाङमय व्यवहार चिंतन आणि चिंता ला रा.ना.चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाला होता. लगेचच मी फोन करून ही बातमी द्वादशीवार सरांना कळवली. ते नागपूरहून चंद्रपूरला निघाले होते. त्यांच्यासोबत कारमध्ये साहित्य संघाचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर देखील होते. सरांनी लगेचच माझे अभिनंदन केले, आणि असाच लिहित रहा असेही सुचवले होते. 

त्याच वर्षी माझी "पूर्णांक सुखाचा" ही कादंबरी देखील प्रकाशित झाली होती. या कादंबरीला पद्मगंधा प्रतिष्ठानचा सुधाकुसुम उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार जाहीर झाला होता. हे कळल्यावर मोबाईलवरच मला सरांचा अभिनंदनचा मेसेज आला. योगायोगाने त्याच दिवशी दुपारी हॉटेल सेंटर पॉईंट ला नितीन गडकरींनी नागपूर आतील सर्व संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांना एकत्रित बोलावले होते. तिथे सरांची माझी भेट झाली तिथे "आता तू कादंबऱ्या सुद्धा लिहायला लागला, आणि पुरस्कारही घ्यायला लागलास" म्हणून मिश्किलपणे माझी थट्टा देखील केली. 

सरांचा माझा दीर्घ स्नेहबंध असला तरी आमचे वैचारिक मतभेदही हो.ते मी उजव्या विचारसरणीचा तर द्वादशीवार सर हे डावीकडे झुकलेले, त्यामुळे मग कधी कधी थोडे वादही व्हायचे. सरांची वर्तमान आणि एकशेअकरावी दुरुस्ती या दोन्ही कादंबऱ्या वाचण्यात आल्या. त्या वाचून एकदा त्यांच्याच घरी झालेल्या भेटीत मी काही मुद्दे उपस्थित केले. तेव्हा सरांनी मला मी धार्मिक उन्मादाच्या विरोधात आहे, त्यामुळे माझी मते ही अशीच राहणार, हे मला स्पष्ट सुनावले होते. 

२००९ मध्ये माझ्या नव्या घराचा वास्तुपूजन समारंभ झाला. त्या दिवशी संध्याकाळी आयोजित स्नेहभोजनाला मी सरांना निमंत्रित केले होते. मात्र त्यावेळी त्यांचे येणे जमले नव्हते. आठवडाभरानेच सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेस सर मला भेटले. तेव्हा ते मला म्हणाले "वास्तूला आलो नाही, पण एकदा तुझ्या घरी यायचं आहे. तू असा गावभर उचापती करत करतोस. तुझ्या घरच्यांचे काय हाल होत असतील याची मला काळजी आहे. त्यामुळे एकदा त्यांच्याशी बोलायला मी येणार आहे. एक दिवस सकाळीच तुझ्या घरी चहाला धडकतो" मात्र गेली 15 वर्षात तो योग काही आलेला नाही. 

याच दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक गिरिजा कीर यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात आयोजित करण्यात आले होते. गिरीजाताईंचे माझे कौटुंबिक संबंध, त्या मला लहान भाऊच मानायच्या. त्या कार्यक्रमात मी देखील सक्रिय होतो. तिथे द्वादशीवार सर प्रमुख अतिथी होते. त्या कार्यक्रमात डॉ मंगेश कश्यप यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत गिरीजा ताईंनी माझा आवर्जून उल्लेख केला. तोच धागा पकडत  द्वादशीवार सरांनी देखील माझा माझा आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमानंतर देखील त्यांनी चर्चेत माझा उल्लेख केला होता. 

द्वादशीवार सर कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जात होते. आमच्या दोघांच्या मैत्रीचा हा देखील एक समान धागा होता. माझ्या वडिलांचे एक स्नेही प्रभाकर ठाकूर हे पुण्याहून आले होते. ठाकूर काकांनी सांगली सातारा परिसरात कृषी क्षेत्रात खूप काम केले होते. त्यामुळे त्यांना राज्य सरकारचा कृषिभूषण पुरस्कार बजाज फाउंडेशन चा पुरस्कार अशा विविध मान्यवर पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले होते. द्वादशिवार सरांना याबाबत कल्पना होती. त्यामुळे त्यांची आणि द्वादशीवार सरांची भेट घालून द्यायची असे ठरले. त्यानुसार काकांना घेऊन मी द्वादशीवार सरांच्या घरीच गेलो. त्या दोघांच्याही खूप गप्पा रंगल्या. निघताना द्वादशीवार सर म्हणाले "हा गधडा कधी कधी चांगली कामे सुद्धा करतो. आज तुमच्यासारख्या माणसाची याच्यामुळेच माझी ओळख झाली, हे चांगलेच काम झाले".

विदर्भवादी साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मंडळींना एकत्र करून संघटित करायचे आणि विदर्भासंदर्भात चांगले साहित्य निर्माण करायचे या हेतूने आम्ही काही मित्रांनी मिळून विदर्भवादी साहित्यिक आणि साहित्यप्रेमी परिषद गठीत केली होती. हे कळताच द्वादशीवार सरांनी मला फोन करून माझे अभिनंदन केले. तुला काय मदत लागेल ते सांग मी मदत करीन असेही त्यांनी त्यावेळी आश्वस्त केले होते.

२०११ मध्ये  गिरिजा ताई कीर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. गिरिजाताईंचे माझे कौटुंबिक स्नेहबंध लक्षात घेता नागपूर विदर्भात गिरीजाताई प्रचारासाठी आल्या तेव्हा इथली सूत्रे मीच हलवत होतो. सर देखील या निवडणुकीत एक मतदार होते. माझ्याच कारमधून मी गिरीजा ताईंना ठीक ठिकाणी घेऊन फिरत होतो. द्वादशीवार सरांकडे मी गेलो, तेव्हा त्यांनी गिरीजा ताई तुम्हाला मत निश्चित देणारच असे सांगून लगेच आपली मतपत्रिकाच त्यांच्या हवाली केली. 

मधल्या काळात अचानक सरांच्या पत्नी जया वहिनी यांचे निधन झाले. तेव्हापासून सर काहीसे अंतर्मुख झाले होते. मग कोरोना काळात त्यांनी नागपूर सोडले. लोकमत मधून निवृत्ती घेऊन ते चंद्रपूरला कायमचे राहायला गेले. तेव्हापासून भेटी खूप कमी झाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी मनोहर म्हैसाळकर गेले, तेव्हा त्यांची माझी भेट झाली होती. त्यानंतर आमची भेट नाही मात्र कधीमधी फोनवर आमचे बोलणे होते. नुकतेच नागपुरात त्यांचे महाभारतावर एक व्याख्यान झाले. मात्र प्रकृती  अस्वास्थ्यामुळे  मी जाऊ शकलो नव्हतो. लवकरच कधीतरी भेटीचा योग येईल आणि नेहमीच्याच बिनधास्त मिश्किल शैलीत सर माझी चौकशी करतील ही खात्री आहे. 

द्वादशिवार सर हे एक पत्रकार, साहित्यिक राजकीय आणि सामाजिक विचारवंत म्हणून सर्वमान्य आहेत. त्यांची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. तरीही माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराशी त्यांनी स्नेहबंध जपले हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे. 

     अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.