कालचक्र.... निवडणुकीत असे कंबरेखालचे वार अनुचितच..
कालचक्र
निवडणुकीत असे कंबरेखालचे वार अनुचितच..
बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे तिथले राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. त्यात भर पडली आहे ती सध्या काँग्रेस पक्षाने तयार करून व्हायरल केलेल्या एका व्हिडिओची. त्यामुळे बिहारमध्ये तर आरोप प्रत्यारोप झालेच. पण आता देशभरही हे वातावरण तापवले जाणार असे दिसते आहे.
काँग्रेसच्या आयटी सेलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक व्हिडिओ तयार केला. त्यात नरेंद्र मोदी झोपलेले आहेत, आणि झोपेत मोदींच्या दिवंगत मातोश्री त्याच्या स्वप्नात येऊन देशाच्या राजकारणात विशेषतः कथित मतचोरी प्रकरणात मातोश्री मोदींना चांगलेच दाटत असल्याचे दाखवले आहे. तसेच माझ्या नावाचा तू दुरुपयोग करतो आहेस, असेही मोदींच्या मातोश्रींनी म्हटल्याचे दाखवले आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण बिहारमध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे.
वस्तूतः नरेंद्र मोदींच्या मातोश्रीच काय पण त्यांच्या परिवारातील त्यांचे भाऊ पुतणे भाचे यांच्यापैकी कोणीही राजकारणात सक्रिय नाही आणि यातील कोणीही मोदींच्या राजकारणात प्रशासनात किंवा कोणत्याही व्यवहारात लक्ष घालत नाहीत, किंवा ढवळाढवळ करत नाहीत, हे वास्तव सगळ्या देशाला माहित झालेले आहे. त्यामुळे मोदींच्या आईंनी असे काही केले असेल यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. तरीही काँग्रेसने हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या बिहारमध्ये भाजप समर्थित नितिशकुमार यांचे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला हे सरकार नको आहे. विशेषतः काँग्रेसला आता संपूर्ण देशातच आपली सत्ता हवी आहे. त्याची सुरुवात ते आता बिहार पासून करू इच्छितात. त्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी एका काळात बिहारमध्ये लालूप्रसाद यादव परिवाराचे वर्चस्व होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव जाहीररित्या म्हणायचे की जब तक समोसे मे रहेगा आलू, तब तक बिहार मे रहेगा लालू. इतकी त्यांना तिथे सत्तेची खात्री होती. मात्र आज ती परिस्थिती राहिलेली नाही. तरीही लालू आणि त्यांच्या परिवाराला आपलीच सत्ता यावी असे कायम वाटत असते. ज्यावेळी लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यातील पुन्हा सिद्ध झाल्याने तुरुंगात गेले, त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला मुख्यमंत्री केले. पण आपल्या घरातून सत्ता जाऊ दिली नव्हती.
असे दोन सत्तापीपासू एकत्र आल्यामुळेच असे व्हिडिओ तयार होत असावे ही शंका घेण्यास निश्चित वाव आहे. जरी आज देशातील नागरिक या व्हिडिओवर विश्वास ठेवत नसले, तरीही काँग्रेसला गोबेल्सचे प्रचार तंत्र वापरून जनमानसाला भ्रमित करण्याची कला पूर्वीच अवगत होती. तिचाच उपयोग आज राहुल गांधी करू बघत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने खोटी का होईना पण अशी व्हिडिओ क्लिप बनवली आणि ती लोकांना एकदा दोनदा तीनदा दाखवली, तर लोक कदाचित विश्वास ठेवणार नाहीत, पण वारंवार दाखवली गेली तर एक दिवस त्यातले अर्धे तरी विश्वास ठेवू लागतील, आणि मग ते काँग्रेसकडे वळू शकतील असा राहुल गांधींचा होरा असावा. त्यामुळेच असे प्रकार ते करत आहेत, असे म्हणता येईल.
तरीही अशा प्रकारे कौटुंबिक स्तरावरून एखाद्याचे चारित्र्यहनन करणे आणि त्याचा फायदा निवडणुकीत करून घेणे हे नैतिकतेला धरून आहे का याचाही विचार व्हायला हवा. जे घडलेच नाही ते घडले असे भासवून उगाच खोटे चरित्र हनन करायचे हे उचित नव्हे.
प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालते अशा आशयाची एक म्हण आहे. आजकाल निवडणुका यादेखील युद्धासारख्याच लढल्या जातात. तिथे प्रेम केव्हाच संपलेले असते. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी असे उद्योग करण्याची प्रवृत्ती आताशा वाढीला लागलेली आहे. काही वर्षांपूर्वी विदर्भात एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराने दुसऱ्या विरोधी उमेदवाराच्या चेहऱ्याची रेखाचित्रे वापरून असाच अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला होता. तिथेही त्याने दिवंगत नेत्याच्या नावाचा वापर केला होता. मात्र तेव्हाही जनता शहाणी होती. जनतेने त्यांना द्यायचा तो झटका दिलाच. असे उद्योग करणारा उमेदवार जनतेने पुरता झोपवला. आज तो उमेदवार राजकारणात पूर्णतः संपलेला आहे.
प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालते असे म्हटले तरी भारतात पूर्वी धर्मयुद्ध लढले जात असे. रामायण महाभारत किंवा पौराणिक काळात युद्ध लढण्याचे देखील काही नियम ठरले होते. सूर्योदय होऊन दोन्ही कडल्या सेनापतींचा शंखानाद होईपर्यंत युद्ध सुरू होत नसे. आणि सूर्यास्त होताच युद्ध थांबवले जात असे. शत्रूवर वार करण्याबाबतही काही संकेत ठरवून दिले गेले होते. त्यांचा भंग केला जात नसे.
आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आल्यापासून निवडणुकीत देखील आचारसंहिता ठरवली गेली आहे. त्या आचारसंहितेचा वापर करून योग्य पद्धतीनेच निवडणुका लढवाव्यात असे अपेक्षित आहे. मात्र त्यातून पळवाटा काढून अशा प्रकारे विरोधकांना बदनाम करण्यासाठी कंबरेखाली वार करणे कितपत उचित आहे याचाही विचार व्हायला हवा.
काँग्रेसच्या या उद्योगांचा संपूर्ण देशातून निषेध होत आहे. ठीक ठिकाणी निदर्शने केली जात असून राहुल गांधींच्या नावाने शंख देखील केला जात आहे. महाराष्ट्रातही भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात पुण्यात आज निदर्शने झाल्याची बातमी आहे. इतरही ठिकाणी असे निषेध सुरूच आहेत.
हा विचार फक्त काँग्रेस पक्षानेच नाही तर या देशात राजकारणात येऊन निवडणूक लढवणारी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक राजकीय पक्षाने करायला हवा. निवडणुका या सर्व नैतिक संकेत पाळून नैतिकतेनेच लढल्या जायला हव्यात. तरच लोकशाहीचे रक्षण होईल. अशाप्रकारे कोणाचेही चारित्र्यहनन करणे अनुचितच आहे. सकस लोकशाहीच्या दृष्टीने राजकारणात नैतिकता पाळली जाते आज गरजेचे आहे. याचे भान सर्व संबंधितांनी ठेवायला हवे.
अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment