सहज सुचलं म्हणून.... माणसाने निसर्गाशी मैत्री तोडणे हितावह ठरणार नाही.

 सहज सुचलं म्हणून....

माणसाने निसर्गाशी मैत्री तोडणे हितावह ठरणार नाही.


ही बातमी बघता भारतात फक्त मानवी अवतार असलेले देवच श्रद्धास्थाने आहेत, असे नाही तर प्राणीमात्र सुद्धा मानवाचे श्रद्धास्थान राहिलेले आहेत असे दिसून येते. आपल्या भारतीय म्हणजेच हिंदू संस्कृतीत निसर्गातील अनेक बाबींना मानवाने श्रद्धास्थाने बनवलेले आहेत. 

आता बघा ना, इथे आदिवासींनी वाघाला आपले श्रद्धास्थान बनवले आहे. नाग किंवा साप हा विषारी प्राणी आहे. त्यापासून मानवी जीवाला धोका होऊ शकतो. तरीही आम्ही सापाला म्हणजेच नागाला देवरुप मानतो. दरवर्षी नागपंचमीला आम्ही नागाची पूजा करतो. भगवान शंकराच्या गळ्यातही नाग असल्याचे दाखवले जाते. 

आता कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवी जीवनात कुत्र्याचा उपयोग शिकारीपासून तर रक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी केला जातो. आज पोलीस खात्यात गुन्ह्यांची शोध करण्यासाठी देखील कुत्र्याची मदत घेतली जाते. मात्र हाच कुत्रा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्ता सोबत दाखवलेला असतो, आणि तिथे देखील आम्ही कुत्र्याची पूजा करत असतो. 

आता उंदराचेच बघा ना. उंदीर हा एरवी उपद्रवी प्राणी म्हणून ओळखला जातो. आठवडी बाजारात तुम्ही गेलात तर उंदीर मारण्याचे औषध लोक विकताना दिसतात. मात्र हाच उंदीर विद्यादाता श्री गणेशाचे वाहन आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात आम्ही श्री गणेशा सोबत उंदराची देखील पूजा करत असतो. 

 गाय हा तर सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहे. गायीच्या पोटात म्हणे तेहतीस कोटी देव बसलेले असतात, असे सांगितले जाते. त्यामुळे गाईला कायम श्रद्धेनेच बघितले जाते. दत्त मूर्तीच्या मागे देखील दत्तमूर्तीच्या मागे देखील गाय उभी असलेली दाखवतात. तसाच प्रकार बैलाच्या बाबतही आहे. बैल हा शेतीसाठी वापरला जायचा. मात्र त्याचा मान ठेवण्यासाठी वर्षातून एकदा आम्ही पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतोच ना. त्याला पुरणपोळीचा नैवेद्यही खाऊ घालतोच. 

आता घुबड हे अशुभ पाखरु म्हणून ओळखले जाते. पण महालक्ष्मीचे ते वाहन मानतात. कावळा हा सुद्धा अशुभच मानला जातो. मात्र पितृपक्षात त्याला महत्त्व येतेच ना. आजही आपल्या कुटुंबात कोणाचा मृत्यू झाल्यावर तेराव्या दिवशी पिंडाला कावळा शिवेपर्यंत घरातले कोणी जेवत सुद्धा नाहीत. 

सिंह हा हिस्त्र प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र आदिमायेचे रूप असलेल्या काही देवी या सिंहावर स्वार झालेल्या दाखवतात. मॉ शेरावाली म्हणून हिंदी टापूत तिचा उल्लेखही केला जातो. काही देव देवता आम्ही घोड्यावर स्वार झालेल्या देखील दाखवतो आणि त्यांचीही पूजा करत असतो.

खारुताई हा एक निरूपद्रवी प्राणी, मात्र याच खारुताईने रामायणात सेतुबंधनात खारीचा वाटा उचलला होता. त्यामुळेच अयोध्येत राम मंदिराजवळ खारुताईची देखील मूर्ती बसवण्यात आल्याची बातमी वृत्तपत्रात आली आहे. जटायू या पक्षाने देखील रामायणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

जो प्रकार पक्षी प्राणी आणि कीटकांबाबत आहे, तोच प्रकार वृक्षवल्लींबाबतही आहेच. आम्ही वडाची पूजा वर्षातून एकदा करतोच. त्याचबरोबर प्रत्येक पूजेत केळीचे खांब वापरले जातात. हरतालिकेच्या दिवशी वेगवेगळ्या झाडांच्या पत्र्या म्हणजेच पाने तोडून महादेवाला वाहण्याची आमची परंपरा आहे. गवत ही अत्यंत क्षुल्लक वस्तू, मात्र या गवताला म्हणजेच दुर्वांना सुद्धा गणपतीच्या डोक्यावर आम्ही स्थान दिलेच आहे. बेलपत्र हे महादेवाच्या डोक्यावर आम्ही कायम ठेवत असतो. सणासुदीला मंगलप्रसंगी आम्ही आंब्याच्या पानाचे तोरण लावतोच. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला तुळशीची मंजिरी देखील आम्ही आवर्जून वाहतोच. सर्व देवांना वेगवेगळी फुले तर आवडतातच. त्यामुळे प्रत्येक पूजेत फुलांचे स्थान महत्त्वाचे असते. तुळशीच्या लग्नाला चिंच बोर आवळा ही फळे वापरतो तर अक्षय तृतीयेला कैऱ्या या आवश्यक मानल्या जातातच. 

एकूणच काय तर ईश्वर हा चराचरात व्यापला आहे, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्या योगे माणसाला निसर्गाशी आणि सर्वच प्राणीमात्रांशी मैत्री करायला आपल्या संस्कृतीने शिकवले आहे. 

आज २१ व्या शतकात मात्र परिस्थिती बदलते आहे. आज सर्वत्र काँक्रीटची जंगले उभी झाली आहेत. त्यामुळे आम्ही निसर्गापासून दूर चाललो आहोत. पूर्वी घराच्या अंगणात काही वृक्ष असायचे तर काही फुलझाडे फळझाडे देखील असायची. आज आम्हाला ती दिसतीलच असे नाही. गणपतीसाठी लागणाऱ्या २१ दुर्वा शोधायच्या तर आम्हाला कुठेच त्या सापडत नाहीत. कारण आता सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनत आहेत. मग आम्हाला मॉल मधून ऑनलाईन दूर्वा विकत घ्याव्या लागतात. आज वन्य प्राण्यांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण जंगले आकुंचित होत जात आहेत. परिणामी माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. 

माणसाचे निसर्गापासून दूर जाणे हे कुठेतरी चिंताजनक म्हणावे लागेल. मानवाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आम्हाला निसर्गाशी मैत्री करावीच लागेल. त्यासाठी निसर्ग नव्याने विकसित करावा लागेल. आज वन्य प्राण्यांच्या पक्ष्यांच्या कित्येक जाती जमाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या नष्ट होण्यापासून वाचवाव्या लागतील. त्यातच मनुष्य जातीचे हित आहे, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.


      अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.